दुःखदायक

सत्तरीतील गोळावलीच्या जंगलात नर, मादी व बछड्यांसह एकूण चार वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूची घटना अत्यंत धक्कादायक आणि त्याहून कैक पटींनी दुःखदायक आहे. या व्याघ्रकुटुंबाला विष घालून मारण्यात आले असावे असा संशय वनखात्याने व्यक्त केलेला आहे आणि यापूर्वी वाघाने ज्यांची दुभती जनावरे मारून टाकली होती, त्या स्थानिक धनगर कुटुंबावर संशय घेत चौघांना ताब्यात घेतले आहे. वाघाला विष घालून मारण्याची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह तर आहेच, परंतु ज्या धनगर कुटुंबाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असलेली दुभती जनावरे वाघाने मारल्यावर त्यांनी तक्रार करूनही ती बेदखल करणारे वन खाते व त्याचे अधिकारी हे नंतर जे काही घडले आहे, त्याला अधिक जबाबदार आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. वाघांच्या या हत्येनंतर एका बछड्याची नखे गायब असल्याचे आढळले, त्यामुळे हा सारा व्याघ्रतस्करीचा प्रकार असल्याचा आरोप काहींनी लगोलग केला, परंतु प्रत्यक्षात उर्वरित वाघांचे दात, नखे आणि कातडी तेथेच आढळून आली आहे. त्यामुळे तस्करीच्या हेतूने केलेही ही शिकार वाटत नाही. तसे असते तर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत असलेले हे सर्व अवयव एका रात्रीत गायब झाले असते. येथे तसे घडलेले नाही. एका बछड्याची गायब असलेली नखे अंधश्रद्धेपोटी काढून घेतलेली असू शकतात. शिकारीच्या शौकानेही ही हत्या झालेली नसावी, कारण येथे बंदुकीचा वापर झालेला अजून दिसलेला नाही. म्हणजेच ही हत्या वाघांपासून आपल्याला व आपल्या दुभत्या जनावरांना निर्माण झालेला धोका दूर करण्याच्या हेतूने सूडभावनेतून झालेली असू शकते. वन खात्याकडे जेव्हा गोळावलीच्या धनगर कुटुंबाने आपल्या पाळीव जनावरांची वाघाने हत्या केल्याची तक्रार आली, तेव्हा वन खात्याने काय केले? वाघाच्या बंदोबस्तासाठी, वाघ मानवी वस्तीत येऊ नये यासाठी कोणती कारवाई केली? काय खबरदारी घेतली? वाघाला रक्ताची चटक लागल्यावर तो पुन्हा मानवी वस्तीकडे पुन्हा फिरकू शकतो हे साधे गृहितकही वन खात्याला विचारात घ्यावेसे वाटले नाही? राज्याचे वन खाते स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या अंगाने संबंधित कर्मचार्‍यांची व त्यांच्या वरिष्ठांची चौकशी करणे आवश्यक आहे. आम्ही या व्याघ्रहत्येला त्या धनगर कुटुंबापेक्षा वन खात्यालाच अधिक जबाबदार मानतो. अर्थात, ज्यांनी या वाघांना विष घालून मारले तेही गुन्हेगार आहेत. आपण जे काही करतो आहोत, ते किती अमानुष कृत्य आहे आणि त्याचे राष्ट्रीय पातळीवर किती गंभीर पडसाद उमटू शकतात याची कल्पनाही या पावणे मंडळींना नसावी. वाघाची हत्या ही काही साधीसुधी बाब नाही. या पृथ्वीतलावरून नामशेष होत चाललेल्या, अत्यंत दुर्मीळ बनलेल्या एका प्राण्याचा वंश संपवण्याचा या मंडळींना काय अधिकार? ज्या अर्थी अवशेष मातीत पुरलेले होते, त्या अर्थी तेथे लपवाछपवीचा व पुरावे नष्ट करण्याचा प्रकार झाला. शेवटी माणूस आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष काही नवा नाही. पूर्वापार तो चालत आलेला आहे. मानवाने वनांवर अतिक्रमण केले आणि वन्य जीवांना मानवी वस्तीवर चालून येण्यावाचून गत्यंतर उरले नाही. पूर्वीच्या काळी गोव्यात डोंगरांमधून मोठ्या प्रमाणावर वाघ, बिबटे असायचे असे वयस्क मंडळी सांगतात. खाणींसाठी डोंगरा-डोंगरांतून बेछूट जंगलतोड झाली, डोंगर कापले गेले, तसे वाघांचे हे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. २००९ साली केरी सत्तरीत जेव्हा एका वाघाची शिकार उजेडात आली, तेव्हा गोव्यातील म्हादई अभयारण्यात वाघच नाहीत, एखादा चुकार वाघ कर्नाटकच्या हद्दीतून येथे शिरला असावा अशीच भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली होती. म्हादई अभयारण्य संरक्षित व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी जुनी आहे, तिला या लोकप्रतिनिधींनी आपल्या मतपेढ्यांना चुचकारण्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ही मागणी अजूनही अंमलात आलेली नाही. या अभयारण्यात वाघ आहेत हे मान्य करायला वनखाते देखील तयार नव्हते, परंतु दांडेलीमध्ये ज्या प्रकारे पर्यटनाच्या नावाखाली धिंगाणा सुरू झाला, तसे त्या परिसरातील वनक्षेत्रातील वाघ म्हादईच्या सुरक्षित अरण्यात शिरून वस्तीला आले असणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे जेव्हा कॅमेरा ट्रॅप लावले गेले, तेव्हा त्यामध्ये वाघांचे येथेच वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले. गेल्या महिन्याअखेर म्हादई अभयारण्यात वाघांचे एक कुटुंबच्या कुटुंब नांदत असल्याचे आढळल्याबद्दल आनंद व्यक्त होत असतानाच आता त्यांच्यावर अशा प्रकारे मानवी सूडभावनेतून घाला घातला जाणे ही घटनाच अतिशय विदारक आहे. २०१६ साली देशात १२२ वाघ मारले गेले होते. २०१७ साली ११५, २०१८ साली १०० आणि २०१९ साली ९५ असे हे प्रमाण खाली आल्याबद्दल केंद्र सरकारने नुकतीच आपली पाठ थोपटून घेतली होती. मात्र, आता गोव्यात नववर्षाच्या प्रारंभीच चार वाघांची हत्या झाल्याची वार्ता येणे ही घटना भीषण आहे. किमान आता तरी वन खाते जागेल आणि गोव्याच्या या शाही पाहुण्यांंच्या संरक्षणासाठी पावले उचलील अशी अपेक्षा आहे.