दिल्लीत सलग तिसर्‍यांदा केजरीवाल सरकार

दिल्लीत सलग तिसर्‍यांदा केजरीवाल सरकार

>> विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर विजय; भाजप, कॉंग्रेसचे घडवले पानिपत

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत विविध एक्झिट पोलनी केलेली भाकिते अखेर खरी ठरली. एकूण ७० जागांपैकी ६२ जागा जिंकत अरविंद केजरीवाल यांचे सरकार दिल्लीत सलग तिसर्‍यांदा सत्तेवर आले. अतिशय प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत कॉंग्रेसबरोबरच भाजपाचेही पानिपत झाले. भाजपच्या वाट्याला नाममात्र ८ जागा आल्या. तर कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. यामुळे भाजपच्या मातब्बर नेत्यांनी एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे असल्याचा केलेला दावाही फोल ठरला. २०१५ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काही जागा जास्त मिळाल्या एवढेच समाधान भाजपला मिळाले आहे.

दरम्यान, दिल्लीतील या विजयाबरोबरच राष्ट्रीय पातळीवर आम आदमी पक्षाच्या रुपाने केजरीवाल यांनी नवे आव्हान उभे केले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचे संकेत देणारे पोस्टर दिल्लीत लागले आहेत. या पोस्टरमध्ये राष्ट्र निर्माणासाठी ‘आप’मध्ये सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले आहे.

२०१५ च्या निवडणुकीच्या तुलनेने यावेळी आपच्या घोंगावणार्‍या वादळाला भाजपने काही प्रमाणात कडवी झुंज दिली. मात्र त्याचे रुपांतर दोन अंकी जागा जिंकण्यात भाजप करू शकला नाही. भाजप व कॉंग्रेसला अखेर आपने लोळविले व इतिहास घडवला. त्याचबरोबर दिल्लीच्या राजकारणावरील आपले वर्चस्व आपने सिद्ध केले. भाजपच्या जाळ्यात न अडकता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविण्याचा आपला लाभ झाला.

दिग्गजांच्या प्रचाराचा
भाजपला लाभ नाही
दिल्ली विधानसभा जिंकण्याचे लक्ष्य ठेवून भाजप या रिंगणात उतरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या अनेक जाहीर सभा व रॅली यांचे आयोजन करुनही त्याचा कोणताही म्हणावा तसा लाभ भाजपला होऊ शकला नाही.

भाजपला प्रक्षोभक
वक्तव्यांचा फटका?
निवडणूक प्रचारा दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी संबोधले होते. तर दुसरे एक केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ‘गोली मारो’चे नारे जाहीर सभेत दिले होते. अन्य एक भाजप खासदार वर्मा यांनी अशीच वादग्रस्त विधाने केली होती. त्याचाही विपरित परिणाम होऊन मतदारांनी या प्रवृत्ती विरोधात मतदानाद्वारे आपली नाराजी प्रगट केली असा दावा आता आपच्या नेत्यांनी केला आहे.

दिल्लीचे भाजप प्रमुख मनोज तिवारी यांनी ४२ जागा भाजप जिंकणार असा दावा केला होता. मतमोजणी अर्ध्यावर आली असतानाही त्यांचा याबाबतचा हेका कायम होता. मात्र प्रत्यक्षात दुहेरी संख्याही भाजपला गाठता आली नाही.

कॉंग्रेसची वाताहत
या निवडणुकीत कॉंग्रेसची पुन्हा एकदा वाताहत झाली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपण पक्षाचा पराभव स्वीकारून जनादेशाचा आदर करीत असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे त्यांनी विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, या पराभवाने कॉंग्रेस निराश झालेली नाही. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीत बरीच मेहनत घेतली. तरीही यश मिळू शकले नाही.

हा भारत मातेचा
विजय ः केजरीवाल
‘हा दिल्लीचा विजय नसून भारत मातेचा विजय आहे’ अशा शब्दात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, ‘दिल्लीकरांनी तिसर्‍यांदा आपल्या मुलावर विश्‍वास दाखवला आहे. हा विजय माझा नसून दिल्लीकरांचा आहे. दिल्लीकर प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे, ज्याने मला आपला मुलगा समजून जबरदस्त समर्थन दिले. स्वस्त वीज, चांगले शिक्षण मिळत असलेल्या प्रत्येक दिल्लीकर कुटुंबाचा हा विजय आहे.

केजरीवाल म्हणाले, ‘आज देशात नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. जो शाळा उभारणार, मोहल्ला क्लिनिक बनवणार, जो २४ तास वीज देणार त्यालाच मत मिळणार हा संदेश दिल्लीकरांनी दिला आहे. हा पूर्ण देशाचा विजय आहे असे केजरीवाल यांनी सांगितले.

निकाल व ठळक वैशिष्ट्ये
दोन तृतीयांश बहुमताने विजयी होण्याची ‘आप’ची दुसरी वेळ ठरली आहे.
‘आप’ला यावेळी ५३.६ टक्के मते मिळाली. तर भाजपला ३८.५ टक्के मते मिळाली.
अभूतपूर्व विजय संपादन केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी समर्थकांसह कॉनॉट प्लेस येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले. त्यांच्यासोबत यावेळी पत्नी सुनिता व उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हेही होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, सीपीआयचे सीताराम येच्युरी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आदी नेत्यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांकडून केजरीवालांचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे व अन्य अनेक नेत्यांनी आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केजरीवाल यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दिल्लीवासियांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात केजरीवाल यांना यश मिळो असेही मोदी यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

अभूतपूर्व विजय ः देवेगौडा
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी अरविंद केजरीवाल यांनी अभूतपूर्व विजय नोंदविला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केजरीवाल यांच्या विजयामुळे देशात जातीयतेवर आधारीत राजकारणाला थारा नाही हे सिद्ध झाले आहे अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

दुही माजविणार्‍यांविरुद्ध
विजय ः आनंद शर्मा
कॉंग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी आम आदमी पक्षाच्या नेत्रदीपक यशाबद्दल अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. आम आदमी पक्षाने मिळवलेला विजय हा समाजात दुही माजविणार्‍यांवरील विजय असल्याचे म्हटले आहे.