दिल्लीत रविवारी कॉंग्रेसचे म्हादई आंदोलन

कॉंग्रेस पक्ष म्हादई आंदोलन आणखीन तीव्र करणार आहे. येत्या १५ डिसेंबर २०१९ रोजी नवी दिल्ली येथे जंतरमंतरवर म्हादई प्रश्‍नी धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
कॉंग्रेस पक्षाने म्हादई जनजागृतीसाठी तालुका पातळीवर आंदोलन सुरू केले होते. तथापि, राज्यातील जमावबंदीच्या आदेशामुळे बर्‍याच तालुक्यातील आंदोलन स्थगित ठेवावे लागले. म्हादई प्रश्‍नी राजभवनावर मोर्चा नेऊ राज्यपालांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आता, नवी दिल्ली येथे धरणे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंडकार कायद्याखाली जमीन मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाबाबत स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून मुंडकार कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे वडील मुंडकार कायद्याखाली जमीन मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. मुख्यमंत्री डॉ. सावंत मुंडकार कायद्याखाली अर्ज करू शकत नाही, असा दावा चोडणकर यांनी केला.

राज्यात कूळ, मुंडकाराची सुमारे चार हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणाची सुनावणी रखडलेली दिसून येत आहे. मात्र, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या मुंडकार अर्जावर एका महिन्यात तीन वेळा सुनावणी घेण्यात आली आहे. राज्यात प्रलंबित असलेल्या कूळ, मुडकारांच्या प्रकरणांना हाच न्याय लावून प्रकरणे लवकर निकालात काढावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.