ब्रेकिंग न्यूज़

दिल्लीत प्राथमिक शाळांची सुट्टी आठवड्याने वाढवली

देशाची राजधानी दिल्लीत तापमानात भयानक वाढ झाली असून काल येथील उष्णेतचा पारा ४३ वर पोचला होता. परिणामी दिल्ली सरकारने शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ८ जुलैपर्यंत वाढ जाहीर केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यानी तसे निर्देश सरकारी व खासगी प्राथमिक शाळांना दिले आहेत. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळांच्या सुट्ट्यांमध्ये एका आठवड्याने वाढ करण्यात आली आहे. ही अतिरिक्त सुट्टी ९वी ते १२ वीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी लागू नसेल. त्यांचे वर्ग ठरल्यानुसार आज सोमवारपासून सुरू होतील असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की हवामान खात्याने पुढील काही दिवस दिल्लीतील तापमान वाढू शकते असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य तापमान वाढीचा विचार करून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी ८ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.