दिल्लीकडून खेळू शकतो रहाण

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आगामी आयपीएल मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. सध्या अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या संघ मालकांनी अजिंक्यला आपल्या संघात घेण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. अजिंक्यच्या हस्तांतरण प्रक्रियेबद्दल दिल्ली आणि राजस्थान या संघांमध्ये चर्चाही सुरु असल्याचे समजते. मागील मोसमात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिला कर्णधार करण्यासाठी राजस्थानने स्पर्धेच्या मध्यावरच अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढून घेतले होते. मुंबई इंडियन्सकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केलेला अजिंक्य २०११ सालापासून राजस्थानकडे आहे.

राजस्थानच्या निलंबनाच्या काळात तो दोन वर्षे पुणे फ्रेंचायझीकडूनही खेळला आहे. रहाणे संघात असताना राजस्थानने सहा पैकी तीन मोसमात प्ले ऑफ फेरी गाठली आहे. दुसरीकडे मागील मोसमात जिंदाल समुहाने दिल्लीच्या संघाची मालकी घेतली. यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नामकरण दिल्ली कॅपिटल्स असे केले. दिल्लीने हैदराबादकडून शिखर धवनला आपल्या संघात सहभागी करुन घेतले. इशांत शर्मा, धवनसारखे दिग्गज तसेच श्रेयस अय्यर व पृथ्वी शॉच्या रुपात युवांचा भरणा असलेल्या दिल्लीला रहाणेच्या रुपात परिपक्व खेळाडू मिळाल्यास त्यांचा संघ अधिक बलशाली होणार आहे. दिल्लीने नवीन नाव, नवीन कर्णधार, नवीन मालक, नवीन खेळाडूंसह बाद फेरीत प्रवेश करत चांगली कामगिरी केली. विजेतेपदाचे त्यांचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले होते. आता रहाणेला करारबद्ध करून या दिशेने त्यांनी मोठे पाऊल टाकण्याचे ठरविले आहे.