दाबोळी विमानतळावर ५६ लाखांचे सोने पकडले

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत ताझाकिस्तान – दुबईमार्गे गोव्यात आलेल्या तीन विदेशी महिला प्रवाशांकडून वेगवेगळ्या भागात लपवून ठेवलेले १७८७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या एकूण सोन्याची किंमत ५६ लाख ३८ हजार एवढी होत आहे.

कस्टम आयुक्त आर. मनोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताझाकिस्तान देशातील तीन महिला एअर इंडियाच्या एआय – ९९४ या विमानातून पहाटे गोव्यात दाबोळी विमानतळार उतरल्या होत्या. कस्टम अधिकार्‍यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्या बॅगेत, पर्समध्ये तसेच अंतर्वस्त्रात लपवून आणलेले सोने कस्टम अधिकार्‍यांच्या हाती लागले असता त्यांनी ते जप्त केले. तसेच त्या तीनही विदेशी महिलांना ताब्यात घेतले. सदर सोने १७८७ ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ५६ लाख ३८ हजार रुपये एवढी होत असल्याचे कस्टम आयुक्त आर. मनोहर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

एप्रिल २०१९ ते आतापर्यंत कस्टम अधिकार्‍यांनी दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत १०४.८५ लाख रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे.