दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची सामाजिक विचारसरणी

  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

पारंपरिक धर्माच्या ईश्‍वरभक्तीमधील बाह्योपचार नाकारून त्यांनी नीतिपूर्वक ईश्‍वरभक्ती हाच खरा पारमार्थिक धर्म आहे असे प्रतिपादन केले. पारंपरिक धर्मश्रद्धेला नीतीचे अधिष्ठान दिले. ईश्‍वरभक्तीचा मार्ग मानवाच्या लौकिक जीवनाशी निगडित असतो हे सत्य त्यांना उमगले होते.

 

एकोणिसाव्या शतकातील आधुनिक जीवनदृष्टी असलेल्या प्रज्ञावंतांमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. प्रबोधनकाळातील विचारमंथनप्रक्रियेत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक स्पंदनांविषयी त्यांनी सजग भान ठेवले. सामाजिक सुधारणेपुरते आपले कार्यक्षेत्र दादोबा पांडुरंगांनी मर्यादित ठेवले नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू होते. भाषिक आणि वाङ्‌मयीन क्षेत्रात त्यांचे कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणांचा सखोल अभ्यास करून मराठी भाषेच्या व्याकरणाची रूपव्यवस्था लावून द्यावी या उद्देशाने त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण लिहिले. शिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘शालोपयोगी लघुव्याकरण’ लिहिले. मोरोपंतांच्या ‘केकावली’वर ‘यशोदा पांडुरंगी’ ही गद्य टीका लिहिली. या टीकेला इंग्रजी व मराठी प्रस्तावना जोडल्या. मराठी प्रस्तावनेत आपले वाङ्‌मयविषयक विचार मांडले. त्यांनी आत्मचरित्र लिहिले. त्यात त्या काळाचा समग्रतेने धांडोळा घेण्याचे कार्य यशस्वीरीत्या केले आहे, तेही प्रारंभीच्या काळात हे विशेष. त्यांच्या विविधांगी लेखनात त्यांची समाजमनस्क वृत्ती प्रकट झाली आहे. ‘परमहंस मंडळी’च्या कार्याशी ते एकरूप झाले. प्रपंचमार्गी विरक्ती आणि ईश्‍वरभक्ती ही पारमार्थिक धर्माची सारभूत तत्त्वे असून प्रायः ईश्‍वरभक्तीचा मार्गच पारमार्थिक धर्माने प्रतिपादला आहे, अशी परमहंसिक धर्माची श्रद्धा होती. त्याला दादोबांनी मुरड घातली. पारंपरिक धर्माच्या ईश्‍वरभक्तीमधील बाह्योपचार सर्वस्वी नाकारून त्यांनी नीतिपूर्वक सप्रेम ईश्‍वरभक्ती हाच खरा पारमार्थिक धर्म आहे असे प्रतिपादन केले. पारंपरिक धर्मश्रद्धेला नीतीचे अधिष्ठान दिले. ईश्‍वरभक्तीचे श्रेयस जरी पारलौकिक विश्‍वाशी संबंधित असले तरी ईश्‍वरभक्तीचा मार्ग मानवाच्या लौकिक जीवनाशी निगडित असतो हे सत्य त्यांना उमगले होते. यात त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. या ठिकाणी त्यांच्या सामाजिक विचारसरणीचा ऊहापोह प्रामुख्याने करायचा आहे.

ईश्‍वरी ज्ञानासाठी सृष्टिज्ञानाबरोबर आत्मज्ञानाचा मार्ग दादोबांनी आवश्यक मानला होता. मानवाच्या ठायी उत्पन्न होणारे सद्विचार व सद्वासना या ईश्‍वरी प्रेरणा होत अशी त्यांची श्रद्धा होती.
दादोबांनी मानवी समतेचे तत्त्व ईश्‍वरनिष्ठेतून निष्पन्न केले. ईश्‍वर हा सर्व मानवमात्रांचा पिता आहे. मानवमात्र एकमेकांचे बंधू आहेत या तात्त्विक अधिष्ठानावर त्यांनी समतेचा व्यवहार उभा करण्याचा प्रयत्न केला. दादोबांची ईश्‍वरविषयक संकल्पना अशी की ते एक सर्जक व नियामक तत्त्व आहे. सर्व विश्‍वाचे आदिकारण आहे ः
विश्‍वकुटुंबी जो| सर्वादिकारण| बाबा त्या शरण| जावे तुम्ही॥
बंधुच्या नात्याने| वागा मानवाशी| उदार मनाशी| ठेवोनिया॥
जातिभेद सर्व| सोडा अभिमान| द्यावे अलिंगन| एकमेकांस॥
भूतदयेनी ती| करा देवपूजा| हीच अधोक्षजा| आवडते॥
भारतातील जातिव्यवस्थेची दादोबा पांडुरंगांनी केलेली परखड मीमांसा आजच्या समाजस्थितीच्या संदर्भात अंतर्मुख करणारी आहे.
‘‘जातिबंधनामुळे एकदेशीय, एकधर्मीय समाजातील ऐक्य नाहीसे होऊन जातींच्या स्वरूपात समाजाचे सहस्रावधी तुकडे पडत गेले. मूळचा धर्म नाहीसा होऊन जातीजातींचे कुलाचार, चालीरीती व दुष्ट व्यवहारांचे प्रस्थ माजले. शास्त्रव्यवहारविपरीत अशा या दुष्ट रूढी, चालीरीती, कुलाचार यांना नष्ट करणेही जातिव्यवस्थेमुळे अशक्य बनले; कारण जातपरंपरेलाच जातिव्यवहाराचे प्रमाण मानले जात होते. परिणामी प्रज्ञावंत शास्त्रेवेत्त्यांची मातब्बरी चालेनाशी झाली आणि जातिनिहात दुष्ट चालीरीती व कुलाचार चालूच राहिले.’’
जातिबंधनांमुळे विवाहसंस्थेवर विपरीत परिणाम कसे झाले, कन्याहत्येची क्रूर रूढी कशी निर्माण झाली आहे हेही दादोबांनी विशद केले आहे. व्यवहारामध्ये ‘मनुष्याची योग्यता आणि मान्यता जातींवर अवलंबून नसते. प्रामुख्याने ती ज्ञान, सत्ता, वैभव आदी गोष्टींमुळे ठरते,’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

‘‘जातिबंधनामुळे देशात द्वेषभावना वाढीस लागते. अज्ञान, अनाचार यांमध्ये वृद्धी होते. समाजाला दुःसह क्लेश भोगावे लागतात, जातींचा आचार आणि कुळधर्म यांचे पालन करावे लागते. त्यामुळे अनेक अडचणी आणि दुःखाचा पसाराच वाट्याला येतो.’’
याचे पर्यवसान राष्ट्रविघातक घटनांत होते असे दादोबांना वाटते. त्यातील कार्य-कारण-भाव स्पष्ट करताना ते म्हणतात की जातिसंस्था ही राष्ट्रीय ऐक्याला नष्ट करणारी, पारतंत्र्याला आमंत्रण देणारी, राष्ट्रहितविरोधी संस्था आहे. राष्ट्रहितासाठी जातिसंस्था नष्ट केली पाहिजे.

दादोबांचे मूर्तिपूजाविरोधाचे व अंधश्रद्धाविरोधाचे सूत्र आयुष्याच्या अखेरीपर्यंत कायम राहिले. ते ईश्‍वराची प्रचिती सृष्टिव्यवहारामध्ये पाहत होते. हिंदू धर्म हा प्रामुख्याने कर्मकांडप्रधान धर्म बनला होता. हिंदू धर्मातील अनेक देवतांमुळे व संप्रदायांमुळे कर्मकांडांचा पसारा वाढला होता. मूर्तिपूजा हाच कर्मकांडाचा मूलस्रोत होता; याची जाण दादोबांना होती म्हणून त्यांनी मूर्तिपूजेवर हल्ला चढविला. त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनाला त्यांनी भावात्मक अनुभूतीची जोड दिली. चित्तशुद्धी, सहृदयता आणि अनासक्ती ही त्रिसूत्री त्यांनी सुचविली. अशा प्रकारे नीतिविचारांची सांगड ईश्‍वरकल्पनेशी त्यांनी घातली. समष्टी-व्यष्टिरूप नैतिक स्वरूपाची परमकारुणिक ईश्‍वरविषयक संकल्पना ही दादोबांच्या नीतिविचाराची आधारस्तंभ ठरली. ते म्हणतात ः
‘‘तसेच सर्व प्रकारचे ज्ञान संपादन करणे, सत्य, दया, शांती, क्षमा, विनय, तितिक्षा, न्याय, परोपकार इत्यादी गुणांनी युक्त असणे, ईश्‍वरगुणानुवाद म्हणजे त्याचे अगाध महत्त्व, अगाध ज्ञान, अगाध शक्ती, न्याय, भक्तवात्सल्य, इत्यादी सुंदर गुणांचे वर्णन ज्यांत केले असेल असे ग्रंथ वाचणे, श्रवण करणे अथवा इतर जनांशी त्या गुणांचे कीर्तन करणे, त्याच्या गुणांचे गायन करणे आणि अनन्यभावेकरून त्यास शरण असणे हीच काय ती मुख्य सात्त्विकी भक्ती, मुख्य उपासना आणि मुख्य पूजा जाणावी.’’
वैवाहिक जीवनातील सौख्याची दादोबाप्रणीत संकल्पना उदारमतवादी होती. एकेश्‍वरवाद व मनुष्यमात्रांमधील पारमार्थिक बुद्धीचे अस्तित्व ही दोन तत्त्वे. मनुष्यमात्रांचा पारमार्थिक धर्म एक होय हे सूत्र दादोबा पांडुरंग यांनी प्रतिपादले. मानव तितुका एक आणि समान आहे ही भूमिका त्यांनी एकेश्‍वरी श्रद्धेतूनच स्वीकारली आहे. ईश्‍वरपूजची सम्यक् दृष्टी दादोबांनी दिलेली असली तरी माणसाच्या व्यक्तिगत व सामूहिक जीवनात किमान काही विधींची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले आहे. आजच्या काळाच्या संदर्भात त्यांची ही तडजोडवादी भूमिका जशीच्या तशी स्वीकारणे जड जाते. पारमहंसिक धर्मश्रद्धेतून त्यांनी तत्त्वे स्वीकारली होती असे दिसून येते.

भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक वारशाची पुरेपूर जाणीव दादोबा पांडुरंग यांना होती. प्राच्यविद्या म्हणजे भारतवर्षातील कालप्रवाहातील विविध वैचारिक प्रभावांची ती परिणती होय अशी त्यांची धारणा होती. ती त्यांच्या लेखनातून वेळोवेळी व्यक्त झाली आहे.