ब्रेकिंग न्यूज़

दहावीनंतर काय?

– प्रा. रामदास केळकर

उद्या काय? ह्याची उत्सुकता, चिंता वृत्तपत्र अन्य मीडियासकट सर्वांनाच असते. म्हणून तर जगण्यात, जीवनात मजा असते. पण करिअरमध्ये मात्र हा प्रश्‍न खरोखरीच चिंतेचा असतो. खास करून जिथे सरकारी नोकरीचे दरवाजे जवळजवळ बंद होत आलेले, खाण उद्योगाला घरघर लागलेली, त्यात बाहेरील उमेदवारांची दिवसेंदिवस वाढत गेलेली संख्या. अशा अनेक समस्यांना तोड देत पुढच्या पिढीला आपले करिअर करायचे आहे. बारावीच्या परीक्षा मध्य बिंदूवर पोहोचल्या आहेत. बारावीतील विद्यार्थ्यांनी आपले क्षेत्र कुठच्या बाजूने असावे? ह्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेलाच आहे. पण येत्या एप्रिलपासून दहावीच्या परीक्षेला गोव्यातील विविध २७ केंद्रांतून बसणार्‍या २० हजार विद्यार्थ्यांची अजून दिशा नक्की व्हायची आहे. आपल्या आयुष्यातील पहिल्याच सार्वजनिक परीक्षेला ते सामोरे जाणार आहेत आणि त्यानंतर निकाल झाला की त्यांची पुढची दिशा ते नक्की करणार आहेत.

उद्योजकाची मानसिकता हवी
आपल्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य, व्यावसायिक, आय टी आय हे मार्ग निवडायचे आहेत. पण हे निवडताना पुढच्या पाच दहा वर्षात होणारे संभाव्य बदल लक्षात घेऊन आपल्या करिअरचा पाया पक्का करायचा आहे. आताचा जमाना हा अष्टपैलूचा आहे. त्यामुळे एकाच शाखेतील शिक्षण घेऊन दिवस काढायचे ही मानसिकता जशी आपल्याला बदलायची आहे तद्वत नोकरी नाही मिळाली तर स्वत:च नोकरी देणारे उद्योजक होण्याचे कौशल्य आपल्यात आले पाहिजे ही मानसिकताही आपल्यात रुजायला हवी. आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेताना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची दृष्टी हवी. सामान्य ज्ञान कसे वाढेल? ह्यावर कटाक्ष असायला हवा. केवळ पुस्तकी अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता आसपास काय घडत आहे ह्याचेही आपल्याला भान हवे. आपल्या गोव्यात सर्व तालुक्यात उच्च माध्यमिकचे चांगले जाळे पसरलेले आहे. सरकारी, सरकार मान्यता असलेल्या खाजगी उच्च माध्यमिक शाळांची संख्या शंभरावर पोचलेली आहे. कला तसेच विज्ञान शाखेत विविध विषयांची उपलब्धता किंबहुना शाळेतील परिचयाचे विषय ह्या शाखेत अभ्यासायला मिळतात. वाणिज्य, व्यावसायिक शाखेत नव्याने परिचय होणारे विषय असतात. ह्या सर्वांचा प्रवेश घेण्यापूर्वी अवश्य विचार करावा. ह्या अभ्यासासाठी तुम्हांला एप्रिलच्या महिन्यात परीक्षा दिली की निकाल लागेपर्यंत तुमच्याजवळ भरपूर वेळ असेल तो वेळ राखीव ठेवावा. आपली आवड काय आहे? ह्याची थोडीफार कल्पना तुम्हांला असेल. त्याप्रमाणे शाखेची निवड करावी. ज्या शाखेत तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिता त्या शाखेत असणारे विषय आणि तुमची आवड ह्यांचा मेळ बसवा. उगाच गावातच उच्च माध्यमिक विद्यालय आहे म्हणून त्यातीलच एखाद्या शाखेत प्रवेश घेऊन मोकळे होऊ नका. समजा गावात एखादे उच्च माध्यमिक आहे परंतु तिथे विज्ञान शाखा नाही आणि तुम्हांला जर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर जिथे ही शाखा आहे तिथे अवश्य प्रवेश घ्या.

आवडीला प्राधान्य द्या
आवडीला प्राधान्य देणे हा करिअरचा सुखमंत्र आहे. समजा तुम्हांला खेळात आवड आहे म्हणून शिक्षणाकडे त्यासाठी दुर्लक्ष करू नका. उलट शाळेतर्फे तुम्हांला विविध राज्यस्तरीय, विभागीय, सरकारमान्य स्पर्धेत भाग घ्यायची संधी मिळते. शिवाय गुणांची साथ मिळते ती वेगळीच. खेळ म्हटला की नियमित सराव आलाच. त्यासाठी वेळ द्यावा लागेल अशावेळी कुठल्या शाखेत गेल्यास आपल्याला वेळ मिळेल़? शिवाय अभ्यासही जमू शकेल? ह्याचा विचार करून प्रवेश निश्चित करावा. जर खेळाचा तुम्ही गंभीरपणे विचार करत असाल तर खेळासाठी प्राधान्य देणार्‍या शाळेचा प्रवेशासाठी जरूर विचार करावा. खेळ निवडतानादेखील क्रिकेट, फुटबॉलसारखे लोकप्रिय पण भरपूर स्पर्धा असलेल्या खेळांपेक्षा ऍथलॅटसारख्या दुर्लक्षित पण मागणी असलेल्या क्षेत्राचा विचार केल्यास अधिक चांगले.

मित्रांपेक्षा तुमचे मत ठरवा
दहावीनंतर आपण जे काही क्षेत्र निवडणार आहात ते अभ्यास करून आपल्या आवडीला, आपल्या कुवतीला झेपेल आणि पुढील वर्षांचा विचार करूनच निवडणे महत्वाचे. इथे मित्रांच्या आग्रहापेक्षा मचे मत महत्त्वाचे ठरते. जी काही शाखा निवडला त्यामध्ये अनेक करिअरची दारे दडलेली असतात. आपल्या शिक्षण क्षेत्रात अजून तेवढी लवचिकता नसल्याने विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला जेवढी मुभा आहे तेवढी मुभा कला, वाणिज्य शाखेला नाही ही वस्तुस्थिती आपण नाकारू नये. जास्त टक्केवारीच्या विद्यार्थ्याने अमुकच क्षेत्र निवडायला हवे हा सर्वसाधारण समज आपल्या निवडीला घातक ठरू शकतो. उदा. एखाद्याला गुण जास्त मिळाले आहेत पण त्याला अभिनयात आवड असेल तर त्याने अशी शाखा निवडावी की जिथे त्याच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी भरपूर वेळ मिळेल, अभ्यास तिथे अडचण ठरू नये. आजकाल सुरक्षित करिअर देणार्‍या शाखांना जास्त पसंती दिली जाते. मात्र ह्यातून तुमच्या आवडीवर तुम्ही अन्याय करीत असता.

सर्वसाधारणपणे गोव्यातील विद्यार्थी दहावीनंतर कला, वाणिज्य, व्होकेशनल, विज्ञान, आय टी आय, पॉलीटेक्निक शाखांचा विचार करू शकतात. ह्याशिवाय इंदिरा गांधी खुले विद्यापीठाचाही मार्ग ज्यांना नियमित शिक्षण घेणे शक्य नाही अशासाठी उपलब्ध आहे.

कला शाखा ः भाषेची जननी
कला शाखा ही भाषेची जननी आहे. भाषेवर प्रभुत्व असणार्‍यांना ह्या क्षेत्रात मोठी झेप घेता येईल. कला शाखेतील विद्यार्थी भविष्यात विविध विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात. डी.एड, बी एड, नेट/सेट सारख्या परीक्षा देऊन विविध स्तरावर शिक्षक म्हणून काम करू शकतात. वकिलीचे शिक्षण घेऊन वकिली करू शकतात. पुढे न्यायालयात संधी मिळवू शकतात. देशी-परदेशी भाषा, अनुवाद, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, समाजशास्त्र, समाजसेवा, राज्यशास्त्र, आर्कोलॉजी, पत्रकारिता, आदरातिथ्य, व्यवस्थापन, नागरी सेवा परीक्षा ह्याशिवाय नेव्ही सारख्या क्षेत्रात तुम्ही जर जाऊ इच्छिता तर पदवीनंतर संधी मिळू शकते. नागरी सेवा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र गोव्यात सुरू झाल्याने त्याचीही प्राथमिक तयारी दहावी झाल्यानंतर करू शकता.

नव्या विषयांसाठी वाणिज्य शाखा
वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणार्‍यांनी ह्या शाखेत जाण्यापूर्वी ह्या शाखेची माहिती घ्यावी. एक म्हणजे ह्या शाखेतील बहुतेक विषय हे नव्याने शिकावे लागतील. अकौंटंससारखा विषय हा ह्या शाखेचा कणा. गणिताशी नाते असलेला हा विषय. शिवाय अन्य विषय हे व्यवस्थापन तसेच व्यापाराशी संबंधित आहेत. ह्या शाखेतील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर, चार्टर्ड अकौंटंट, कंपनी सचिव, कॉस्ट एंड वर्क्स अकाउंटंट, शेअर बाजार, विमा, एम बी ए, वकिली, व्यवस्थापन, आदरातिथ्य, वृत्तपत्र, नागरी सेवा परीक्षा, बॅन्किंग परीक्षा आदीं क्षेत्रात त्यांना पुढे संधी मिळू शकते.

अनेक पर्यायांची व्होकेशनल
वाणिज्य शाखेशी जवळीक साधणारी शाखा म्हणजे व्यावसायिक (व्होकेशनल). ह्या विद्यार्थ्यांना ह्या शाखेतील अनेक पर्यायी अभ्यासक्रमांची निवड करता येते. परंतु आपल्या परिसरातील उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्याला योग्य असा अभ्यासक्रम मिळेलच असा नाही. उदा. नागझर पेडणे, सावईवेरेत शेती अभ्यासक्रमाचा पर्याय असे पर्याय समजून घेण्यासाठी जिथे प्रवेश घ्याल तिथे नीट चौकशी करावी लागेल. वाणिज्य शाखेतील करिअर ह्या शाखेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत.

आयटीआयची सर्वत्र सोय
आपल्याकडे बहुतेक सर्व तालुक्यात ज्या तंत्रज्ञान शिक्षणाची सोय आहे ते म्हणजे आय टी आय. औद्योगिक प्रशिक्षण संस्था. ह्यात सरकारी व सरकार मान्य खाजगी अशा केंद्रांचा समावेश आहे. फर्मागुडी, आल्तिनो -पणजी, पेडे-म्हापसा, बोर्डा -मडगांव, काकोडा -कुडचडे, तुये-पेडणे, व्हाळशी-डिचोली, होंडा- सत्तरी, मास्तीमळ – काणकोण, बोगदा -वास्को, आके -नावेली तसेच सेझा साखळी, डॉन बॉस्को मडगांव, सेझा पंचवाडी, आग्नेल आश्रम- वेर्णा, आय टी आय मोंट फोर्ट खोर्ली अशी आय टी आय केंद्रे आहेत. तसेच इथे अभ्यासक्रमांचे भरपूर काही केंद्रात १४ पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, टर्नर, ड्राफ्ट्समन, स्टेनोग्राफी, सुतार, फिटर ई. सारखी कौशल्ये ज्यांना अलीकडच्या काळात भरपूर मागणी आहे तसेच ह्या कौशल्यामुळे स्वत:चा उद्योग सुरू करायची जास्त संधी आहे, ह्यासाठी हे अभ्यासक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. नजीकच्या संस्थेत जाऊन त्याची माहिती मिळवा ह्यासाठी त्यांची वेबसाइटची मदतही घेता येईल.(ुुु.सेरळींळ.ेीस). पॉली टेक्निक अर्थात तंत्रनिकेतनमध्येही अभियांत्रिकीला जवळ असलेले अभ्यासक्रम शिकण्याची संधी विद्यार्थी घेऊ शकतात. ह्यांच्या शाखा पणजी, डिचोली आणि कुडचडे ह्याशिवाय खाजगी स्तरावर शीपबिल्डींग बोगदा वास्को, आग्नेल टेक्निकल वेर्णा, गार्डियन एंजल कुडचडे ह्या ठिकाणी सोय आहे. त्याची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. इच्छुकांनी (ुुु.वींश.सेर.र्सेीं.ळप) ह्या संकेतस्थळाला जरूर भेट द्यावी.

शाखांचा महामेरू ः विज्ञान
सर्व शाखांचा महामेरू असे वर्णन ज्याचे करता येईल अशी शाखा म्हणजे विज्ञान. गोव्यातच थेट आय आय टीसारख्या अग्रगण्य शाखेचा प्रवेश झाल्याने अभियांत्रिकीसाठी वेगळे दालन सुरू झाले आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची जास्त पसंती एकतर मेडिकल किंवा अभियांत्रिकी असते. ह्या शाखेच्या विद्यार्थ्यांना नियमित मंडळाच्या परीक्षेबरोबर अनेक प्रवेश परीक्षांचा अभ्यास करावा लागतो ह्यात नीट, जे ई ई मेन, जे ई ई ऍडव्हांस, नाटा, बीटसेट, व्ही आय टी, सिम्बोयसीस आदींचा समावेश आहे. नेवी, आर्मी, एअर फोर्समध्ये विविध स्तरावर नोकरीची संधी मिळते. ती विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्रासारख्या विषयांच्या विद्यार्थ्यांना. मेडिकल- ऍलोपथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, दंतवैद्यकमध्ये प्रवेश मिळू न शकणा़-याना फार्मसी तसेच पेरा मेडिकलचा पर्याय उपलब्ध आहे. आता शेतीतही पदवी घेण्याची गोव्यातच संधी उपलब्ध झाली आहे. ह्याशिवाय बी एससी नर्सिंग पदवी, पदव्युत्तर, नेट, सेट परीक्षेतून कॉलेजमध्ये अध्यापन करण्याची संधी, मूलभूत विज्ञानात पदवी घेतल्यास विशेषतः गणित, भौतिकशास्त्र म्हणजे नोकरीची १००% खात्री. ह्याशिवाय शिकवणी वर्ग उघडल्यास भरघोस प्रतिसादाची हमी. अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतल्यास गोव्यातील फर्मागुडी, वेर्णा, फातोर्डा, आसगांव तसेच शिरोडा येथील सरकारी, सरकारमान्य खाजगी महाविद्यालयात प्रवेशाची संधी. ह्या प्रवेश प्रक्रिया तांत्रिक संचालनालयातर्फे घेण्यात येतात ह्यासाठी अकरावीपासूनच प्रयत्न करणे जरुरीचे असते.

अपडेट रहा
मित्रांनो कुठल्याही शाखेत प्रवेश करण्यापूर्वी पुढील करिअरच्या माहितीवर आपल्या निवडलेल्या शाखेचा विचार करावा. आपल्या आवडीला प्रथम प्राधान्य द्या आणि नंतरच एखाद्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्या. केवळ घराच्या आसपास किंवा हाकेच्या अंतरावर आहे तसेच मित्र, मैत्रिणी तिथे जातात ह्या निकषावर प्रवेश टाळावा. निकालानंतर तुम्हांला थेट प्रवेश घेण्याची घाई असते म्हणून सुट्टीतच नीट चौकशी करून निर्णय पक्का करा. तसेच ज्या शाखेत प्रवेश करता त्याच्या पुढील शिक्षणाचा अभ्यासही अकरावीत गेल्या गेल्या आरंभ करावा. करिअर हा विषय न संपणारा त्यासाठी आपण अपडेट रहावे. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!