दररोज सापडणार्‍या कोरोना रुग्णांमुळे मुरगाव तालुका भीतीच्या छायेखाली

वास्कोत काल १३ कोरोना रुग्ण सापडल्याने वास्को शहराबरोबर संपूर्ण मुरगाव तालुका भीतीच्या छायेखाली आहे. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, आरोग्य सचिव नीला मोहनन तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी काल मांगोरहिल येथील प्रतिबंधित क्षेत्रात फेरफटका मारून एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी येथील नागरिकांनी त्यांना भासत असलेल्या अडचणीविषयी कैफीयत मांडली.

मांगोरहिल आणि आसपासच्या भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने वास्को शहरात तसेच मुरगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी कोरोनाचा संसर्ग झालेले नवीन रुग्ण सापडले होते. त्यापैकी २८ जण मांगोरहिल येथील आहेत. दरम्यान वास्कोत काल संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत १३ रुग्ण कोरोना संसर्ग झालेले सापडले.

यात बोगदा वीज खाते वसाहतीतील (४), मेस्तवाडा येथील कदंब कंडक्टर (१), खारीवाडा सरकारी पारिचारिका (१), मुरगाव नगरपालिकेत (१), शांतीनगर (१) तसेच वास्को पोस्ट ऑफिस मधील संसर्ग झालेल्या (५) मिळून एकूण १३ नवीन कोरोना संसर्ग झालेले रुग्ण सापडले. दरम्यान मांगोरहिल येथील प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांची रखडलेली स्वॅब चाचणी सोमवारपासून सुरू करण्याचे आश्वासन आरोग्य खात्याकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात चाचणी सुरू न झाल्याने रहिवाशी चिंताग्रस्त बनले आहेत. तरी उरलेल्या रहिवाशांची चाचणी करावी अशी मागणी होत आहे.

मुरगाव पालिका कर्मचार्‍यांना
दोन दिवस न येण्याचे आदेश
सोमवारी रात्री उशिरा मुरगाव नगरपालिकेची एक महिला कर्मचारी कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले. यामुळे संपूर्ण मुरगाव पालिकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी मुरगाव पालिकेतील याप्रसंगी उपस्थित पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी सांगितले की पालिकेतील प्रशासन कार्यालयातील कर्मचार्‍यांना पुढील दोन दिवस कामावर येऊ नये असे आदेश दिले आहेत. तसेच पालिकेतील सर्व कामगारवर्गाची कोविड चाचणी करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी बुगडे यांनी दिली.

नागरिकांनी कडधान्य नाकारले
दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील दुसर्‍या बाजूला म्हणजेच गुरुद्वारा रोड समोरील भागातील रहिवाशांनी मुरगांव आपत्तकालीन व्यवस्थापन समितीकडून पुरविण्यात आलेले कडधान्य स्वीकारण्यास नकार दिला व ते तसेच रस्त्यावर सोडून दिल्याने कडधान्यावर गाईगुरांनी ताव मारला. या रहिवाश्यांनी आम्हाला या भागात कोरोना संक्रमित नसताना बंदिस्त करून ठेवले असून आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटत नसल्याचे सांगितले. तसेच तुटपूंजी कडधान्य आम्हाला पुरत नसून महिन्याभराचा राशन कोटा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.