दक्षिण भारतात दहशतवादी हल्ला शक्य

>> लेफ्ट. जनरल सैनी यांनी दिली माहिती

दक्षिण भारतातील भागांवर दहशतवादाचे सावट असल्याची शक्यता लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सर क्रीक या गुजरात किनारपट्टी भागातून काही रिकाम्या सोडून देण्यात आलेल्या संशयास्पद स्थितीतील बोटी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सैनी यांनी दिली. दक्षिण भारतातील भागात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अशा कारवाया उधळून लावण्यासाठी आमची संरक्षण दले सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोडून दिलेल्या बोटी ताब्यात घेण्याच्या पार्श्‍वभूमीवर संभाव्य दहशतवादी हल्ल्यांना उधळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेत आहोत असेही ते म्हणाले. गुप्तचर यंत्रणांकडून संभाव्य हल्ल्यांबाबत विविध माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.

केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बहेरा यांनी या अनुषंगाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारतीय लष्कराने संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत सूचना दिल्यामुळे केरळमधील सर्व जिल्हा यंत्रणांना सावधगिरीचे आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देशही दिले आहेत.
भारत-पाक सीमा व आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेलगतचे भाग अशा ठिकाणांवर सुरक्षा दलांना सतर्क ठेवण्यात आले आहे. या भागांमध्ये सैनिकांची गस्त वाढविण्यात आली आहे, असे सैनी यांनी सांगितले.