ब्रेकिंग न्यूज़

दक्षिण आफ्रिकेचा शेवट गोड

शनिवारी झालेल्या विश्‍वचकातील शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा १० धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी आपला समारोप गोड केला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेल्या ३२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३१५ धावांमध्ये आटोपला.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शानदार शतकी खेळी करताना ११७ चेंडूंत १२२ धावा करत आपले सतरावे वनडे शतक झळकावले. यंदाच्या विश्‍वचषकातील त्याचे हे तिसरे शतक ठरले. याव्यतिरिक्त तीन अर्धशतकेदेखील त्याच्या नावावर आहेत. वॉर्नरने एक बाजू सांभाळलेली असताना दुसर्‍या बाजूने ठराविक अंतराने गडी बाद होत राहिले. आफ्रिकेने ताहीरच्या हाती नवीन चेंडू सोपवताना फिंचचा काटा काढला. त्यानंतर उतरलेल्या उस्मान ख्वाजा याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. अनुभवी स्टीव स्मिथ, मार्कुस स्टोईनिस व ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात बाद झाले. केरीने केवळ ६९ चेंडूंत ८५ धावांची धीरोदात्त खेळी करत आफ्रिकेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. परंतु, हाणामारीच्या षटकांत केरी परतल्याने द. आफ्रिकेने सुस्कारा सोडला.

कांगारूंना शेवटच्या दोन षटकांत २५ धावांची आवश्यकता असताना रबाडाने ४९व्या षटकांत केवळ ७ धावा देऊन २ बळी घेत संघाला विजयाच्या दारात आणून सोडले. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार फाफ ड्युप्लेसीने समयोचित खेळ दाखवताना आपले १२वे वनडे शतक लगावले. त्याला क्विंटन डी कॉक (५२) व रस्सी वेंडर दुसेन (९५) यांनी तोलामोलाची साथ दिली.