ब्रेकिंग न्यूज़

थायलंडमधील थरार ः शोध आणि बोध

  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

थायलंडच्या थाम लुआंग गुहेमध्ये अडकलेल्या ङ्गुटबॉल टीमला यशस्वीपणे आणि सुखरूप बाहेर काढण्याची घटना प्रशंसनीय तर आहेच; पण त्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा थरारही जाणून घेण्यासारखा आहे. तसेच या सर्व व्यवस्थापनातून अनेक धडे आपण घेण्याची गरज आहे.

ङ्गुटबॉलचा वर्ल्ड कप रशियामध्ये सुरू असतानाच २३ जून रोजी उत्तरी थायलंडच्या चिरांग राई प्रांतातील मू पा (वाईल्ड बोअर) फुटबॉल टीम आपली मॅच खेळल्यावर प्रशिक्षक इकॉपोल चांगथ्वांग यांच्याबरोबर तेथील थाम लुआंग गुहेमध्ये श्रम परिहारासाठी गेली. थायलंडचे पर्यटनस्थळ असलेली थाम लुआंग गुहा थायलंड – म्यानमार सीमेवरील डोई नांग नॉन/मे साई पर्वत शृंखलेमध्ये आहे. या पर्वत शृंखलेमधून सहा पर्वत रांगा निघतात. गुहेकडे जाणार्‍या आठ किलोमीटर लांब बोगद्याचे प्रवेशद्वार पहिल्या पर्वतरांगेच्या तोंडाशी, तर गुहा सहाव्या रांगेच्या तोंडाशी आहे. पर्वत शृंखलेमधून पर्वतरांग निघते तेथे बोगद्यात उंचवटा पाहायला मिळतो आणि बाकी वाट उंच सखल भागातून जाते. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून गुहेपर्यंतची संपूर्ण वाट दोन-तीन तेे ३०-३२ फूट उंच आणि केवळ दीड दोन ते सहा सात फूट रुंद आहे.

या नैसर्गिक बोगद्याचा पूर्ण नागमोडी रस्ता खडकांच्या अतिशय तीक्ष्ण व टोकदार सुळ्यांनी भरलेला आहे. फुटबॉल टीम आत जात असताना बोगदा कोरडा आणि आकाश निरभ्र होते. पण अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि काही तासांतच तुफान पाउस पडू लागला. टीम परतीच्या वाटेवर असतांना त्यांना संपूर्ण बोगदा पाण्याने तुडूंब भरलेला आढळला. पाण्याची पातळी सतत वर वर सरकत असल्यामुळे इकॉपोल चांगथ्वांग आपल्या टीमला घेउन वरच्या पातळीवर गेला. ते चेंबर प्रवेशद्वारापासून ४.५ किलोमीटर आत होते. रात्रीपर्यंत मुले घरी न आल्यामुळे पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि दुसर्‍या दिवशी पडत्या पावसात झालेल्या तपासादरम्यान, पोलिसांना गुहेकडे जाणार्‍या प्रवेशद्वारावर १३ सायकली आढळून आल्यावर पाणी भरलेल्या बोगद्यात टीम अडकली आहे, हा निष्कर्ष काढण्यात आला. संध्याकाळपर्यंत थाई टीव्हीच्या माध्यमातून ही बातमी जगभर पसरली आणि गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीमला बाहेर काढण्यासाठी सुरू झालेल्या आपत्ती व्यवस्थापन थराराचा आरंभ झाला.

थायलंड सरकारकडे गुहा व बोगद्याचा संपूर्ण नकाशा उपलब्ध होता. पण टीम नेमकी कुठे आहे याची कोणालाच कल्पना नसल्यामुळे थायलंडमधील ३० जंगल ट्रेकर टीम्सनी डोई नांग नॉन पर्वत शृंखलेवरून आत जाणारी एखादी वाट सापडते का याचा शोध घेण्याची मोहीम उघडली. पुढच्या दोन तीन दिवसांमध्येच थायलंड सरकारने केलेल्या विनंतीला मान देउन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, नॉर्वे, फिनलंड, जर्मनी आणि चीन येथील १५० वर पाणबुड्ये चिरांग राईमध्ये दाखल झाले आणि त्यांनी बोगद्यात फसलेल्या फुटबॉल टीमपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू केला. सतत ९ दिवस चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर सोमवार, ०२ जुलै रोजी रिचर्ड स्टॅन्सन आणि जॉन व्होलंथेन या ब्रिटिश द्वयीला ही सर्व मुले त्यांच्या प्रशिक्षकाबरोबर बोगद्यातील एका उंच जागेमध्ये बसलेली आढळली. टीमने जी जागा पकडली होती तेथे पोचल्यावर या मुलांना फ्ल्युईड रिप्लेसमेंट, नाश्ता, उजेड आणि थंडीपासून बचावासाठी हीटर्स लागतील याची कल्पना त्या द्वयीला आली. आपल्या प्रशिक्षकाच्या सांगण्यानुसार ही मुले योगसाधना करीत होती आणि त्यांनी उर्जाबचतीसाठी मागील अनेक दिवस हालचालही बंद केली होती. त्यांच्या शारिरीक स्थितीमुळे पुढचे २४ तास त्यांना बोगद्याबाहेर काढणे शक्य नव्हते.

या दरम्यान, थायलंड सरकारने एलॉन मस्कच्या स्पेस एक्स बोअरिंग कंपनी या अमेरिकन फर्मला त्यांची हेवी ड्युटी ड्रीलिंग मशिनरी आणि वॉटर एक्सट्रक्टिंग पंप्सद्वारे पर्वतशृंखलेवर जाऊन बोगद्याच्या दिशेने व्हर्टिकल ड्रील करण्याची आणि बोगद्यामधून पाणी बाहेर काढण्याची विनंती केली. मस्कने पर्वत सपाटीवर १३४ ठिकाणी ड्रील केले आणि सरते शेवटी जेथे टीमची जागा सुनिश्‍चित झाली त्या ठिकाणावरून बोगद्यात एयरपाईपद्वारे प्राणवायु आणि मिनिएचर कॅमेरा सोडण्यासाठी, १२४० मीटर्सचे ड्रीकेल पाडले. रेस्क्यु ऑपरेशन सुरू होउन संपेपर्यंत मस्कच्या वॉटर पंप्सनी १९२ दशलक्ष लिटर पाणी बोगद्यातून बाहेर काढले होते. या कार्यामध्येे भारतातील किर्लोस्कर कंपनीच्या दोन मराठी इंजिनीयर्सचाही हातभार लागला ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.

ज्यावेळी १३ विदेशी आणि पाच थाई तज्ज्ञ पाणबुड्ये पाण्याने तुडूंब भरलेल्या बोगद्यात प्रवेशकर्ते झाले, त्यावेळी त्यांच्या मागे केवळ थायलंडच नव्हे तर संपूर्ण जगाच्या शुभेच्छा व प्रार्थना होत्या. मुलांना बाहेर काढण्यासाठी, शारिरीकदृष्ट्या कमकुवत मुलांना आधी आणि बलदंड मुलांना नंतरच्या फेरीत बाहेर आणण्याची योजना आखण्यात आली. बोगद्यातील पाण्याची वाढती-घटती पातळी आणि वेळेच्या अभावावर मात करून मुलांना सुखरुप बाहेर आणण्याची जबाबदारी त्या १८ जणांवर होती. दोन पाणबुड्ये पुढे मागे आणि मुलगा मध्ये अशा रीतीने एकावेळी एकाच मुलाला आपल्या छातीशी कवटाळून धरत, चालत किंवा आधार देऊन आणण्यात येणार होते. मुले जेथे थांबली होती तेथपासून २ किलोमीटर पर्यंत मुलांना गलितगात्र करणार्‍या चढाई, उतराई, पोहोणे, रांगणे करत जाणे भाग होते. शिवाय हे सर्व गुडघाभर किंवा छातीपर्यंत असलेल्या पाण्यात करावे लागणार होते. त्यानंतरचा टप्पा या मार्गावरील जवळपास ८०० मीटर लांब, अनेक उंचसखल पट्टे असलेला होता. साम याक नावाचा हा पट्टा सर्वात खोल व पार करायला कठीण भाग होता. तेथे तोपर्यंत पाणी भरले असल्यामुळे येणार्‍या – जाणार्‍या सर्वांना वरील प्रत्येक गोष्ट पाण्याच्या आत करावी लागणार होती. प्रत्येक मुलाला ते जेथे होते त्या शेल्फपासून बोगद्यातील रस्त्याद्वारे जेथे त्यांचे सामान पडलेले होते, तेथपर्यंत आणल्यानंतर दुसर्‍या पाणबुडे द्वयींच्या हवाली करण्यात आले. तेथून कमांड सेंटर होते त्या चेंबर-३ मध्ये आल्यावर त्यांना स्पेशालिस्ट टीमच्या हाती सोपवून बाहेर काढण्यात आले. बाहेर उभ्या ऍब्युलन्सद्वारे त्यांना जवळच्या हेलिपॅडपर्यंत आणि तेथून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

सर्व लोक बाहेर आल्यानंतर थायलंडच्या पंतप्रधानांनी ‘वुई आर नॉट श्युअर इफ धिस इज ए मिरॅकल, ए सायंस ऑर व्हॉट? ऑल द थर्टीन वाईल्ड बोअर्स आर नाऊ आउट ऑफ केव्ह’ अशी संयत प्रतिक्रिया दिली.
रेस्क्यु ऑपरेशन सुरू होण्या आधी एका ऑस्ट्रेलियन डॉक्टरने मुलांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांना ‘फिट फॉर इव्हॅक्युएशन’ प्रमाणपत्रर दिले. प्रवेशद्वारापाशी बाहेर येणार्‍या प्रत्येक मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी एक डेडिकेटेड ऍम्ब्युलन्स, दोन डॉक्टर्स, दोन नर्सेस आणि एक पॅरा मेडिक तैनात केला गेला होता. चियांग राई हॉस्पिटलमध्येे ५ इमर्जंसी रिस्पॉंस डॉक्टर्स आणि ३२ विविध प्रणालीच्या डॉक्टरांचा ताफा त्यांची काळजी घेण्यासाठी हजर होता. मानसोपचारतज्ञही उपस्थित होते.

या रेस्क्यु ऑपरेशनच्या कारवाईचा आढावा घेतल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विश्‍लेषक म्हणून केलेल्या मीमांसेत खालील मुद्दे स्पष्ट होतात.
१) थायलंड सरकारने मुलांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी देश आणि जगभरातील तज्ज्ञांना लगेच बोलवण्याची प्रक्रिया सुरू केली. २००५ची त्सुनामी किंवा २०११ मध्ये उत्तरांचलच्या बद्रिनाथ केदारनाथ क्षेत्रात आलेल्या आकस्मिक पुरानंतर झालेल्या भूस्खलनाच्या वेळी आपण असे केले असते तर त्या वेळी डिझास्टर मिटिगेशनचे वेगळेच परिणाम दिसले असते.
२) या संपूर्ण रेस्क्यु ऑपरेशनची कमांड, परिस्थितीचे गांभीर्य जाणून, संयत समन्वयाने काम करणार्‍या एक प्रशासकीय व एक सैनिकी अधिकार्‍याकडे दिल्यामुळे ‘जॉईंट कमांड फॉर ऑपरेशनल रिझल्ट’ची संकल्पना योग्यरित्या अमलात आणली गेली.त्यांच्या कामात किंवा अंगिकारलेल्या कार्यपद्धतीत कोणीही लुडबूड अथवा हस्तक्षेप केला नाही. आपल्याकडे बहुतांश वेळा ४-५ संस्था एकमेकांशी समन्वय न साधताच आपत्ती व्यवस्थापन करण्याचे कार्य करतात आणि ओ का ठो माहीत नसलेले तज्ज्ञ कसा सल्ला देतात, हे २००५ च्या सुनामीत उजागर झाल होते.
३) टीम सुखरुप आहे आणि त्यांना गुफेतून बोगद्यामार्गे बाहेर काढावे लागणार आहे याची कल्पना आल्याबरोबर थाई सरकारने लगेच साधनसामुग्री व संसाधनांची जमवाजमव सुरू करून दुर्घटना झालेल्या जागेजवळ ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे गोंधळाला वाव नव्हता, याउलट ज्यावेळी आपण नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाच्यावेळी सामुग्री पाठवली त्याचा लेखाजोखा कोणापाशीही नसल्यामुळे सगळ्यांनी एकच प्रकारचे सामान पाठवण्याच्या घटना समोर आल्या होत्या.
४) थायलंड सरकारकडे गुहा आणि बोगद्याचा संपूर्ण नकाशा असल्यामुळे तेथपर्यंत जाण्यासाठी पाणबुड्यांना फारसे नेव्हिगेशन करावे लागल नाही. २००८च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी प्रख्यात ताज हॉटेलचा नकाशा ना मुंबई महानगर पालिकेकडे, ना हॉटेल व्यवस्थापनाकडे उपलब्ध होता.
५) या संपूर्ण रेस्क्यु ऑपरेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप झाला नाही. कारवाई सुरू झाल्यानंतर फक्त पंतप्रधानच एकदा घटना स्थळी आले. याउलट आपल्याकडे दुर्घटना घडल्यानंतर विनाकारण भेट देऊन घेत फोटो सेशन करण्यासाठी नेत्यांची झुंबड उडते आणि त्यांची सरबराई करण्यात आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होते. मागील वर्षी मुंबईत एलफिस्टन पूल दुर्घटनेच्या वेळी हे दिसून आले.
६) थायलंडमधील सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांनी या मोहिमेच्या बातम्या देतांना अत्यंत संयत भूमिका अंगिकारली. रडणार्‍या पालकांच्या भावविवश मुलाखती घेण्याचा पोरकट प्रकार दिसला नाही.
७) इकॉपोल चांगथ्वांगहा उत्तम योग शिक्षक होता. हा २५ वर्षीय तरुण स्वत:वर ताबा कसा ठेवायचा,कठीण परिस्थितीत स्वत:ला कसे सांभाळायचे, शारिरीक ऊर्जा नियोजन कसे करायचे, एकमेकांचा साथ कसा द्यायचा याबद्दल सतत मुलांचे प्रबोधन करुन त्यांचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न त्याने केला. आपल्या येथील प्रशिक्षकांची स्थिती राम भरोसे असते, योगभ्यास आणि त्याचा सुतराम संबंध नसतो. केवळ स्वार्थ साधण्यासाठी बहुतांश जण आपल्याकडे प्रशिक्षक बनतात.
८) या १९ दिवसांमध्ये राजकीय पक्ष, माध्यमे आदी कोणीही कसलीही टीका केली नाही. सर्वजण एकजुटीने सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहून प्रार्थना करत होते.
९) थायलंड सरकारने त्याच्या समोरील तीन पर्यायांचा साधकबाधक विचार करुन, कोणाच्याही दबावखाली न येता, त्वरित सर्वोत्कृष्ट पर्याय निवडला. अशी त्वरित निर्णयक्षमता आपल्याकडे अभावानेच आढळते.

१०) बोगद्यातून मुलांना बाहेर काढण्याच्या धोरण प्रणालीची सखोल विचार करून अतिशय बारकाईनी मांडणी करण्यात आली. सर्व प्रकारच्या संभाव्य आपत्तींचा विचार करून, प्रत्येक जण कुठे काय, कसे आणि केव्हा करील याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्यामुळे सर्व ऑपरेशन बिना विघ्न पार पडले. आपल्याकडील आपत्तीच्या वेळी कशा हंगामी योजना आखल्या जातात आणि त्यांची अमलबजावणी कशी होते हे २००८ च्या मुंबई हल्ल्यात ताज हॉटेल व छाबड हाउसमधील कारवाई आणि अक्षम नियोजनामुळे तीन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या अकाली मारले जाण्यातून दिसून आले होते.

प्रत्येक आपत्ती माणसाला व प्रशासनाला काही शिकवून जाते. देशातील आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञांनी जगभरात आलेल्या आपत्तींचा आढावा घेत त्या पासून काही धडा घेतला तर आपल्या येथे तशा प्रकारची किंवा कुठल्या दुसर्‍या प्रकारची आपत्ती आल्यास त्याचे निवारण सुलभ होईल.