त्वचा विकार  भाग – २

त्वचा विकार भाग – २

  • डॉ. स्वाती अणवेकर  (म्हापसा)

अन्य शास्त्रामध्ये त्वचेला एक अवयव मानले आहे पण आयुर्वेद हा त्वचेला रस ह्या शरीरातील पहिल्या धातूचा उपधातू मानते. अर्थात शरीरातील रस धातूच्या सार भागातून त्वचा उत्पन्न होते. आयुर्वेद सांगते कि त्वचा ही पांचभौतिक आहे. अर्थात त्यात पंचमहाभूते आहेत ती म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायु,आणि आकाश. तर आता आपण ह्या पाच महाभूतांचे त्वचेमधील घटक तसेच त्यांचे कार्य जाणून घेऊयात.
१) पृथ्वी : त्वचा, त्वचेवरील केस व रोम हे ह्या महाभूताचे अधिक्य असलेले घटक आहेत.
२) जल ः त्वचेमधील रस धातू तसेच लसिका ह्यात जल महाभूत अधिक असते.
३) तेज : त्वचेची कांती, आभा, प्रभा तसेच त्वचेचा वर्ण हा तेज महाभूतावर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्वचेतील उष्णता हीदेखील ह्या महाभूतावर अवलंबून असते.
४) वायू : त्वचेचे अधिष्ठान असणारे हे प्रमुख महाभूत असून ह्यामुळे त्वचेला स्पर्शज्ञान व संवेदना ग्रहण करण्याचे कार्य त्वचा नीट करू शकते.
५) आकाश : ह्यात त्वचेवरील रोमकूप व संवेदना वाहक नलीकाची मुखे येतात म्हणजेच त्वचा ही पांचभौतिक आहे.

कारण ह्याचा जर सखोल विचार करायचा झाला तर त्वचेचे प्राकृत असणे व रोग होणे हे देखील ह्या पंचमहाभूतांच्या कमीअधिक होण्यावर असते हे आपण म्हणू शकतो. जसे काही व्यक्तींच्या त्वचेवर भरपूर केस असतात तर काही व्यक्तींच्या त्वचेवर कमी केस असतात. हे त्यांच्या त्वचेवरील पृथ्वी महाभूताच्या प्रकृतीवर अवलंबून असते. कधी कधी काही रुग्णांमध्ये काही त्वचाविकारात हे केस अथवा रोम गळून पडतात तर त्यात त्वचेतील ह्या महाभूतामध्ये बिघाड झाला असे आपण म्हणू शकतो. आपण असेदेखील पाहिले असेल की काही व्यक्तींची त्वचा ही मऊ मुलायम व तुकतुकीत असते तर काही व्यक्तींची त्वचा ही रुक्ष कोरडी असते. ह्याचाच अर्थ त्या व्यक्तीच्या त्वचेमध्ये ह्या जल महाभूताचे प्रमाण हे कमी-अधिक आढळते. तर काही त्वचा विकारात आपण असे पाहतो की एखाद्या व्रणामधून अथवा पुरळातून सतत स्त्राव वाहत असतो तर कधी कधी एखाद्या त्वचा रोगात त्वचा अगदी कोरडी रुक्ष निस्तेज होऊन जाते. हे घडते त्वचेमधील जल महाभूताच्या बिघाडामुळे होय.

बरेचदा आपण असे पाहतो की प्रत्येक व्यक्तीचा रंग हा वेगवेगळा असतो तर त्यावरील चमक, तजेलदारपणा हा वेगळा आढळतो. ह्यात महत्वाची भूमिका बजावते तेज महाभूत. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीमध्ये हा रंग, वर्णभेद आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे बर्‍याच त्वचा रोगांमध्ये त्वचेचा वर्ण किंवा कांती ही आपल्याला बिघडलेली आढळते जसे काढी त्वचा जास्त काळसर व निस्तेज दिसते तर कधी कधी त्वचा फिकट पण निस्तेज वाटते ह्याचे कारण ह्या तेज महाभूतामधील बिघाड होय.
आता अंतिम महाभूत म्हणजे आकाश महाभूत. ह्यामध्ये प्रामुख्याने रोम कूप ज्यातून रोम उगवतात व स्वेद वाहक नलिका ह्या समाविष्ट असतात तर आपल्या काय लक्षात येते की आपण पाहतो- बर्‍याच व्यक्तींना पुष्कळ घाम येतो तर काही व्यक्तींना घाम कमी येतो. ह्याचे कारण म्हणजे त्या व्यक्तींच्या त्वचेवर असणारी स्वेद वाहक व रोम कुपांची संख्या होय. त्यात देखील बरेचदा आपण असे पाहतो की काही आजार असे असतात ज्यात रुग्णाच्या अंगावर गरजेपेक्षा अधिक केस उगवतात अथवा त्यांना गरजेपेक्षा अधिक घाम येतो. तसेच काही रुग्णांमध्ये त्वचेवर केस उगवणे अचानक बंद होते अथवा त्यांना घाम येणे पूर्णपणे बंद होते. ह्याला आपण त्या व्यक्तीच्या त्वचेमधील आकाश महाभूतामध्ये बिघाड झाला आहे असे जाणावे.

जसे त्वचा ही पांचभौतिक आहे तशीच ती त्रिदोषयुक्तदेखील आहे. अर्थात ह्यात वात, पित्त व कफ हे तिन्ही दोष उपस्थित असतात. त्वचेचे प्रमुख कार्य आहे स्पर्श ज्ञान. पण ह्यात स्पर्श म्हणजे फक्त आपण एकमेकांना करतो तोच स्पर्श इथे अपेक्षित नसून कानांना होणारे श्रुतीज्ञान तसेच डोळ्यांना होणारे रूपज्ञान जिभेला होणारे चवीचे ज्ञान तसेच नाकाला होणारे गंधज्ञान ह्या सर्वांचा समावेश होणार हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण हे ज्ञान करून देणार्‍या वाहक नाड्या ह्या त्या त्या अवयवाच्या स्थानिक त्वचेमधून निघत असतात. म्हणूनच त्वचा व स्पर्श ह्याचा विचार करताना फक्त आपल्या हाताला अथवा शरीरावर सर्वत्र पसरलेल्या त्वचेचा विचार करून भागत नाही तर आयुर्वेदिय वैद्याला त्याचा असा सखोल विचार करणे गरजेचे असते. स्पर्शज्ञान हे कार्य त्वचेमध्ये असणारा वातदोष करतो. तसेच त्वचेला ओलावा देणे, तिची लवचिकता टिकवून ठेवणे हे कार्य त्वचेमधील कफदोष करतो तर ही लवचिकता, ओलावा हा त्वचेला स्निग्ध मुलायम तर ठेवतोच पण आघातापासूनदेखील त्वचेचा बचाव करतो. त्वचेमधील पित्तदोष हे त्वचेमधील उष्णता कायम ठेवण्यास मदत करते तसेच त्वचेचा वर्ण कांती ही त्वचेमधील पित्ताच्या आरोग्यावर अवलंबून असते. ह्याचाच अर्थ त्वचा निरोगी व चांगली राहण्यासाठी त्वचेतील हे त्रिदोष योग्य प्रकारे कार्य करत असणे आवश्यक आहे.

आता त्वचेचे कार्य कोणते ते देखील जाणून घेणे आवश्यक आहे…
– त्वचा ही आपल्याला स्पर्श ह्या संवेदनेचे योग्य ज्ञान करून देते.
– त्वचा आपल्या शरीरातील प्रमुख अवयवांचे संरक्षण करते.
– आपल्या शरीराचे तापमान हे घामाला गरज असल्यास शरीराबाहेर काढून अथवा शरीरात कोंडून ठेवून मदत करते.
– आपण त्वचेवर लावलेले एखादे औषध अथवा लेप हा शरीरात शोषण करण्यास त्वचा मदत करते.
– बाहेरील बदलणार्‍या वातावरणाशी शरीराला जुळवून घ्यायला त्वचा मदत करते.

अर्वाचीन वैद्यक शास्त्रात त्वचेबद्दल काय सांगितले आहे ?…
आधुनिक मताने त्वचेचे दोन स्तर असतात- बाह्य स्तर ज्याला बाह्य त्वचा अथवा एपिडर्मिस असे म्हणतात तर अन्तःत्वचा जिला डर्मिस असे म्हणतात. डर्मिस ह्या त्वचेच्या स्तराखाली सुपरफिशियल फेशिया व डीप फेशिया असतो.

एपिडर्मिस – हा स्तर आघातापासून काही रासायनिक द्रव्यांपासून, जीवाणुपासून आपले संरक्षण करतो. ह्या त्वचेवर आघाताने अथवा व्रण झाला असल्यास त्याची पुनर्निर्मिती लगेच होते. तसेच नियमित होणार्‍या घर्षणाने अथवा आघाताने मृत त्वचा गळून पडते व नकळत नवीन त्वचा त्या ठिकाणी तयार होत असते.
डर्मिस- ह्यात असणार्‍या संयोजग तंतुमुळे ती जास्त मजबूत होते व त्यात लवचिक तंतूदेखील असतात. ह्यात रक्तवाहिन्या असतात ज्यामुळे तिथे सतत रक्ताचा पुरवठा होत असतो. बाह्य त्वचेला पौष्टिक पदार्थ व रक्ताचा पुरवठा ह्यासाठी अंतस्त्वचेवर अवलंबून राहावे लागते.
मात्र नाडीचे तंतू दोन्ही त्वचेपर्यंत पसरलेले असतात.

सुपरफिशियल फेशिया – ह्यात देखील संयोजग तंतू, वसा असल्यामुळे आघातापासून संरक्षण होते. तसेच हा स्तर उष्णतारोधक आहे. रक्त्‌वाहीन्यांच्या प्रक्रियेमुळे शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवले जाते.
हा स्तर तळहात, तळपाय ह्यावर सर्वात जाड असतो. शरीराच्या समोरच्या भागापेक्षा मागील भागावर ही जाड असते. हातापायावर सुद्धा बाहेरच्या भागावर आतील भागापेक्षा ही जाड असते. मात्र पापण्या, पुरुषांचे जननांग ह्यात ही त्वचा सर्वात पातळ असते.

डीप फेशिया – हा घन तंतुमय संयुक्त पेशी जी स्नायू,अस्थि, नसा व रक्तवाहिन्या ह्यांच्याशी सलग्न असते. हा स्तर तंतुमय जाड असतो. हा स्तर सुपरफिशियल फेशियाखाली असतो. ह्यात चरबी नसल्याने तो लवचिक नसतो पण हा दृढ असतो.
(क्रमशः)