ब्रेकिंग न्यूज़

त्वचा विकार आणि आयुर्वेद

  • डॉ. स्वाती हे. अणवेकर.
    (म्हापसा)

आपली रोगप्रतिकारशक्ती ही गरजेपेक्षा अधिक प्रबळ झाली की हा जीर्ण त्वचाविकार व्यक्तीच्या शरीरात उत्पन्न होतो. ह्या व्याधीमध्ये त्वचेच्या पेशी ह्या सामान्यपेक्षा १० पट जलद गतीने वाढू लागतात. त्यामुळे त्वचेवर लाल रंगाचे उंचवटेयुक्त चट्टे निर्माण होतात जे सफेद खवल्यांनी आवृत्त असतात.

सध्या आपण पाहत आहोत की दैनंदिन जीवनातील ताण, जेवणामधील अपथ्य, अनुवांशिकता, संक्रमण, शरीरातील हॉर्मोन्समधील अनैसर्गिक बदल ह्यामुळे आपले शरीर हे वेगवेगळ्या त्वचाविकारांनी ग्रस्त होते. ह्या नवीन लेखमालेमध्ये आपण वेगवेगळे त्वचा विकार व त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
प्रथम सर्वात जास्त आढळणारा व हल्ली पुष्कळ लोकाना भेडसावणारा क्लिष्ट त्वचा विकार ‘सोरीयासीस’ ह्याबद्दल माहिती पाहूयात.

सोरीयासीस ः भाग – १

दरवर्षी ह्या त्वचाविकाराचे १० अब्ज नवीन रुग्ण भारतात निर्माण होतात.
तर सर्वात आधी अर्वाचीन वैद्यक शास्त्रानुसार सोरीयासीस म्हणजे काय ते नीट समजून घेऊया :
– आपली रोगप्रतिकारशक्ती ही गरजेपेक्षा अधिक प्रबळ झाली की हा जीर्ण त्वचाविकार व्यक्तीच्या शरीरात उत्पन्न होतो. ह्या व्याधीमध्ये त्वचेच्या पेशी ह्या सामान्यपेक्षा १० पट जलद गतीने वाढू लागतात. त्यामुळे त्वचेवर लाल रंगाचे उंचवटेयुक्त चट्टे निर्माण होतात जे सफेद खवल्यांनी आवृत्त असतात. हे डोक्यातील त्वचेवर, कोपरावर, मांड्यांवर, पाठीच्या खालच्या भागात होतात. पण हा आजार सांसर्गिक नसतो. ह्याची सुरुवात ऐन तारुण्यात होते. बर्‍याच व्यक्तींमध्ये हा त्वचेच्या मोजक्याच भागांवर उत्पन्न होतो. हे चट्टे बरे होतात अन् पुन्हा उत्पन्न होतात. हे चक्र त्या व्यक्तीच्या आयुष्यभर सुरूच असते.

आता ह्याची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊयात :
ह्याची लक्षणे त्याच्या प्रकारानुसार बदलतात.
– त्वचेवर लाल रंगाचे चट्टे असतात जे चंदेरी रंगाच्या खवल्यांनी आवृत्त असतात. त्यांना खाज येऊ शकते किंवा त्यात वेदनादेखील होऊ शकतात. तसेच त्यात काही वेळेस कात्रेदेखील पडतात व त्यातून रक्तस्त्राव होतो. तीव्र अवस्थेत हे चट्टे वाढत जातात आणि एकमेकात मिसळून त्वचेचा मोठा भाग व्याप्त करू शकतात.
– ह्यात बोटांची नखे, अंगठ्याची नखे ह्यांचा वर्ण बदलतो. तसेच नखांमध्ये खड्डा पडतो. नखे चुरगळून ती नखाच्या मुळापासून सुटू शकतात.
– डोक्याच्या त्वचेवर खवल्या उत्पन्न होतात अथवा डोक्याची त्वचा फुटीर होते.
ज्या व्यक्तींना सोरीयासीसचा त्रास असतो त्यांना काही काळानंतर सोरीयाटिक आर्थ्रायटीस उत्पन्न होऊ शकतो. ह्यात सांध्यांमध्ये वेदना होऊन ते सुजतात. १० ते ३०% रुग्णांमध्ये ह्या प्रकारचा सोरीयाटिक आर्थ्रायटीस उत्पन्न होताना दिसतो.

आता आपण ह्याचे प्रकार जाणून घेऊयात :
१) पुस्चुलर सोरीयासीस :
ह्यामध्ये त्वचेवर लाल खवलेयुक्त बारीक पुरळ येतात जे जास्त करून हाताच्या व पायांच्या तळव्यावर येतात.
२) गट्टेट सोरीयासीस :
ह्याची सुरुवात लहान वयात किवा ऐन तारुण्यात होते. ह्यात त्वचेवर बारीक लाल पुळ्या येतात जे अंगठ्यांवर आणि पायांवर जास्त येतात. हे श्वसन विकार, मानसिक ताण, त्वचेवर जखम होणे, मलेरियाचे औषध घेणे अथवा ब्लड प्रेशरसाठी जे रुग्ण बिटा ब्लॉकर्स घेतात त्यांच्यात अधिक आढळतो.
३) इन्व्हर्स सोरीयासीस :
ह्यात त्वचा अगदी भडक व चमकदार चकचकीत अशा चट्टयांनी युक्त होते आणि हे ज्या भागात त्वचा सुरकुतलेली असते तिथे अधिक होते जसे काखेत, कंबरे खाली, स्तनाच्या खाली इ.
४) इरीथ्रोडर्मीस सोरीयासीस : ह्यात त्वचा अगदी लाल बुंद होते आणि त्यातून खवल्यांचे पापुद्रेच्या पापुद्रे सुटू लागतात. हे उन्हात त्वचा भाजल्यास, त्वचेवर काही संक्रमण झाल्यास, काही औषधे घेतल्यास अथवा सुरु असलेली सोरीयासीसचे उपचार बंद केल्यास हा प्रकार होतो. हा सोरीयासीस थोडा तीव्र स्वरूपाचा असून त्यावर लगेच उपचार सुरु न केल्यास आजार बळावू शकतो.

सोरीयासीसची कारणे :
ह्याचे नेमके कारण काय आहे हे समजू शकले नाही. पण काही तज्ञ म्हणतात की ह्यात बर्‍याच गोष्टींचा समावेश होऊ शकतो. काही वेळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती क्षीण होऊन त्यामुळे त्याभागात दुखापत होते आणि नवीन त्वचेच्या पेशी भराभर वाढू लागतात. सामान्यपणे त्वचेच्या पेशी ह्या १०-३० दिवसांमध्ये नवीन पेशी निर्माण होतात पण सोरीयासीसच्या रुग्णामध्ये ह्या नवीन पेशी दर ३-४ दिवसात निर्माण होऊ लागतात. ह्यात नवीन पेशी जुन्या पेशीची जागा घेतात त्यावर तयार होतात ज्यामुळे त्या भागात चंदेरी रंगाच्या खवल्या तयार होतात.

बरेचदा हा आजार अनुवंशिक असतो पण तरी तो एक पिढी सोडून दुसर्‍या पिढीत येऊ शकतो, जसे आजी व नातीला हा झाला तर तो नातीच्या आईला असेलच असे नाही.
आता काही अशा गोष्टींची माहिती करून घेऊयात ज्यामुळे सोरीयासीस झाले असेल तर ते बळावू शकते :

१) कात्रे, खरचटणे अथवा शस्त्रक्रिया
२) मानसिक ताण
३) स्ट्रेप्टोकॉकस इन्फेक्शन
४) बिटा ब्लॉकर्सचे सेवन
५) Aअँटीमलेरिया औषधांचे सेवन
सोरीयासिसचे निदान करण्यासाठी ज्या भागावर चट्टा आला असेल त्या भागाचा थोडा तुकडा काढून तो तपासणीसाठी पाठवला जातो ज्याला बायॉप्सी असे म्हणतात. तसेच जेव्हा असे चट्टे हे डोक्यात, कानामागे, कोपरावर, जांघेत, नाभिच्या ठिकाणी, नखांवर उत्पन्न होतात तेव्हा त्याचे निदान करणे डॉक्टरला सोपे जाते.
(क्रमशः)