त्वचाविकार आणि आयुर्वेद भाग – ५

  •  वैद्य स्वाती हे. अणवेकर
    (म्हापसा)

भूक मंद होणे, पोटात टोचल्यासारखे होणे, अन्नपचन नीट न होणे, वारंवार तहान लागणे, मळमळणे या सर्व लक्षणांचा विचार करता, वारंवार पाहता आपल्याला असे वाटेल की ही लक्षणे आणि त्वचारोग ह्यांचा काहीच संबंध नाही. पण हीच लक्षणे पुढे जाऊन त्वचारोग उत्पन्न करणारी प्रमुख कारणे बनू शकतात.

कोणताही आजार हा जेव्हा शरीरामध्ये उत्पन्न व्हायचा असेल तेव्हा शरीरामध्ये विकृत दोष साचू लागल्यानंतर येणारी पुढची अवस्था म्हणजे दोषांचा प्रकोप. ह्या अवस्थेतदेखील आजार व्यक्तीच्या शरीरामध्ये पूर्णरूपाने निर्माण झालेला नसतो. पण पहिल्या संचय झालेल्या अवस्थेपेक्षा ही अवस्था थोडी अधिक गंभीर असते. ह्याचे साधे उदाहरण द्यायचे झाल्यास पूर्वीची बादली जी नळाच्या पाण्याने भरत आहे पण पाण्याच्या बादलीमध्ये जर चिखल असेल तर साहाजिकच बादलीमध्ये भरणारे पाणी हे त्या चिखलामुळे गढूळ होणार आणि हे गढूळ पाणी बादलीमधून बाहेर पडू लागते ती ही अवस्था. म्हणजे सर्व रोग पूर्ण व्यक्त अवस्थेत येण्याची दुसरी अवस्था असते.

वरील उदाहरणामध्ये असणारी बादली हे माणसाचे शरीर आहे तर चिखल हा तो करत असणारा चुकीचा आहारविहार आहे. तर नळातून पडणारे पाणी हे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये निर्माण होत असणारे चांगले दोष आहेत जे निर्माण होताना चांगले असतात पण ती व्यक्ती करत असणार्‍या चुकीच्या आहार-विहारामुळे ते प्रदूषित होतात व विकृत पद्धतीने वाढून हळूहळू शरीराच्या अन्य कमकुवत झालेल्या भागामध्ये जाऊ लागतात.
ह्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये निर्माण होणारी बिघाडाची लक्षणे ही पूर्वीपेक्षा थोड्या प्रखरतेने जाणवू लागतात. आता ह्या सर्व गोष्टींचा विचार जर आपण त्वचा रोगांच्या बाबतीत करायचे ठरवले तर शरीरामध्ये निर्माण होणारे दोष जे निर्माण होत असताना चांगले असतात, ते त्याने केलेल्या चुकीच्या आहार-विहारामुळे दुषित होऊ लागतात आणि त्यामुळे ती व्यक्ती जो आहार घेते त्यातून उत्पन्न होणार्‍या आहार रसातून जे धातू निर्माण होणार तेदेखील थोड्या प्रमाणात विकृत उत्पन्न होणार.
जर हे दोष व धातू चांगल्या प्रकारे निर्माण होऊ लागले नाही तर पुढे जाऊन ह्या दोष व धातूंचा एकमेकांशी संबंध येऊन शरीरामध्ये प्रखर लक्षणे उत्पन्न होतात. त्यामुळे असे झाल्याने पहिला धातू जो रसधातू आहे तोच चांगला निर्माण झाला नाही तर पुढील धातुसुद्धा चांगल्या प्रतीचे निर्माण होत नाहीत आणि मग आरोग्य बिघाडाच्या घटनेला सुरुवात होते. त्वचाविकारामध्ये रक्तधातू, मांस धातू व मेद धातू हे प्रामुख्याने बिघडू लागतात.

जसे त्वचेसंबंधी लक्षणे जी पूर्वी संचयाच्या अवस्थेत क्वचित उत्पन्न होऊन पुन्हा लुप्त होऊ लागतात व पंधरा दिवसातून अथवा महिन्यातून एकदाच दिसत असतील तर आता ती कमी कालांतराने दिसू लागतात व त्यांची तीव्रता पूर्वीपेक्षा वाढलेली असते. अर्थात आता त्या व्यक्तीला त्या लक्षणांचा त्रास जाणवू लागतो व त्याला आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे हे समजते.
आयुर्वेदामध्ये वात, पित्त व कफ ह्या तिन्ही दोषांना प्रकुपित करणारे आहारविहारामधील काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याची सविस्तर माहिती आपण इथे करून घेणे आवश्यक आहे. कारण ह्यापैकी बरीचशी कारणे ही सध्याच्या काळात पाहायला मिळणार्‍या वेगवेगळ्या त्वचारोगांमध्ये प्रमुख असू शकतात.

वाताचा प्रकोप करणार्‍या कारणांमध्ये आपल्या शक्तीपेक्षा जास्त काम करणे, अतिव्यायाम, अति अभ्यास, उंचावरून पडणे, अतिधावणे, मार लागणे, एखादा अवयव मुरगळणे, अति उपवास, अति पोहणे, उड्या मारत चालणे, अति वजन उचलणे, रात्री जागरण, वाहनातून अतिप्रवास, भरपूर चालणे, कडू, तिखट, तुरट, कोरडे, हलके पदार्थ खाणे, जसे सुकलेल्या भाज्या, फरसाण, चाट, आंबवलेले पदार्थ, मोठ्या कडधान्यांचा अति वापर, तसेच संडास, अधोवायू, लघ्वी, शिंक, ढेकर, घाम हे नैसर्गिक वेग अडवून धरणे, तसेच थंड वातावरण, पावसाळा, पहाटे व संध्याकाळी २-६ ह्या वेळेत व अन्नपचन झाल्यावर देखील शरीरामध्ये वातदोष प्रकुपित होतो.
आता पित्तप्रकोप कोणत्या आहार, विहार व कारणांनी होतो ते जाणून घेऊया-
प्रामुख्याने वारंवार चिडणे, चिंता करणे, घाबरणे, अति परिश्रम, तिखट, आंबट, खारट पदार्थ जे तीक्ष्ण व उष्ण असतात ते वारंवार खाणे ह्यात गरम मसाला, हिरवी मिरची, चाट, आंबवलेले पदार्थ, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ, कुळीथ, मोहरीचे तेल, दही, आंबट फळे, ह्यांचा समावेश होतो. तसेच उष्ण पदार्थ खाण्याने, गर्मीमध्ये, शरद ऋतूमध्ये, दुपारी व मध्यरात्री १०-२ ह्या वेळात व अन्न पचन सुरु असताना शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होतो.

आता शरीरात कफ प्रकोप करणारी कोणती कारणे आहेत ते जाणून घेऊया- दिवसा झोपणे, व्यायाम न करणे, आळस, गोड, आंबट, खारट, थंड, जड व चिकटपणा उत्पन्न करणारे पदार्थ जसे उडीद, गहू, पीठाचे पदार्थ, मैदा, तीळ, दही, दुध, गुळ, खीर, उसाचे पदार्थ, साखर, मासे, मांस, गोड फळे ह्यांच्या सेवनाने तसेच थंड वातावरण, वसंत ऋतू, सकाळी व संध्याकाळी ६-१० ह्या काळात तसेच जेवल्यावर लगेच शरीरात कफ दोषाचा प्रकोप होतो.

साधारणतः वरील सर्व कारणांनी प्रकुपित झालेले दोष हे पुढे जाऊन धातू उत्पत्ती देखील दूषित करतात. आणि ह्या अवस्थेत उत्पन्न लक्षणांची तीव्रता अधिक असते. आता त्वचा रोगाचाच विचार करायचा झाल्यास त्वचेवर कोरडेपणा येणे, त्वचेवर पुरळ उठणे, त्वचा लालसर होणे, त्वचेवर लालसर काळसर अथवा पांढरे डाग येणे, अंगाला खाज येणे, अंगावर चट्टे उठणे, हे त्वचारोग उत्पन्न होताना दिसणारी स्थानिक लक्षणे झाली. पण आपल्याला पुढे जाऊन एखादा त्वचा विकार होणार आहे हे समजायला काही सर्वदैहिक लक्षणेदेखील शरीरामध्ये उत्पन्न होतात- जसे भूक मंद होणे, पोटात टोचल्यासारखे होणे, अन्नपचन नीट न होणे, वारंवार तहान लागणे, मळमळणे, या सर्व लक्षणांचा विचार करता, वारंवार पाहता आपल्याला असे वाटेल की ही लक्षणे आणि त्वचारोग ह्यांचा काहीच संबंध नाही. पण हीच लक्षणे पुढे जाऊन त्वचारोग उत्पन्न करणारी प्रमुख कारणे बनू शकतात. त्यामुळे ह्या अवस्थेतदेखील पथ्यपालन व काही किरकोळ उपचार घेऊन आपण पुढे उत्पन्न होणारे त्वचा विकार नक्कीच टाळू शकतो.
(क्रमशः)