त्वचाविकार आणि आयुर्वेद भाग – ६

  • डॉ. स्वाती हे. अणवेकर
    (म्हापसा)

रोगाच्या प्रसर अवस्थेत लक्षणांची तीव्रता अधिक असते कारण ह्या अवस्थेत दोष त्यांच्या स्थानिक जागेतून अर्थात ते जिथे वाढलेले असतात तिथेच न राहता अन्य भागात पोहोचतात व तिथे तीव्र स्वरुपाची लक्षणे उत्पन्न करतात.

व्याधी उत्पन्न होण्यापूर्वीची तिसरी अवस्था म्हणजे प्रसर होय. या अवस्थेचे वैशिष्ट्य असे की प्रकोप अवस्थेत जे दोष असतात ते पुढे जाऊन शरीरातील एका भागातून दुसर्‍या भागात प्रसार पावतात ती ही अवस्था. ही अवस्था प्रकोप अवस्थेपेक्षा गंभीर असते. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपण जेव्हा आम्बोळ्यांचे पीठ आंबवण्यास ठेवतो तेव्हा त्यात तांदूळ, उडीद डाळ व पाणी घालून ते वाटले जाते व रात्रभर ते आंबवायला ठेवले जाते. त्यामध्ये किन्विकरण होऊन ते पीठ जेव्हा फुगते व वर येते आणि ठेवलेल्या भांड्यातून बाहेर ओघळते ती अवस्था म्हणजे प्रसर अवस्था होय.
शरीरामध्ये दोष हे एका जागी साचून साचून जेव्हा प्रकुपित होतात तोपर्यंत ते शरीराच्या एकाच भागात असतात. पण प्रसर अवस्थेमध्ये हेच दोष शरीराच्या अन्य कमकुवत भागापर्यंत पोहोचून तिथे आश्रय घेतात. ह्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास एका तलावाच्या पात्रात पुष्कळ पाणी साठले आहे आता त्यात अजून पाणी साठायला जागाच शिल्लक नाही. आता पाऊस पडू लागला व त्या पावसामुळे साठलेल्या पाण्याचा स्तर भयंकर वाढला आणि त्या पाण्याने तलावाचा बंध फोडला व ते पाणी समोरच्या जलाशयात जाऊन मिळाले व पुढे वाहू लागले.

प्रसर अवस्थेत लक्षणांची तीव्रता अधिक असते कारण ह्या अवस्थेत दोष त्यांच्या स्थानिक जागेतून अर्थात ते जिथे वाढलेले असतात तिथेच न राहता अन्य भागात पोहोचतात व तिथे तीव्र स्वरुपाची लक्षणे उत्पन्न करतात. आता त्वचा रोगांच्या बाबतीत ही अवस्था जाणून घ्यायची असेल तर प्रकोप अवस्थेपर्यंत हे दोष ह्या धातूंच्या अगदी अलगद संपर्कात येत असतात. पण प्रसर अवस्थेत हेच दोष त्वचेशी संबंधित रक्त, मांस, मेद ह्या धातुंशी चांगलेच संलग्न झालेले असतात व त्यांना ते अधिक प्रमाणात दूषित करू लागतात.

संचय अवस्था ही म्हणजे गोठलेल्या तूपासारखी अवस्था असते ज्यात दोष तिथल्या तिथेच साचतात. प्रकोप अवस्था ही तापून पातळ झालेल्या तूपासारखी अवस्था असते, ह्यात दोष वाढीला लागतात तर तिसरी अवस्था प्रसर ह्यात हे तूप भरपूर तापते आणि अगदी पातळ होऊन ते भांड्यातून बाहेर पडून वाहू लागते. तसेच दोषांचे होते.
ह्याच कारणामुळे ह्या अवस्थेत शरीरामध्ये त्वचारोग होण्यापूर्वीची लक्षणे प्रचंड तीव्र स्वरुपात शरीरात दिसू लागतात व रुग्णाला त्याचा पुष्कळ त्रास देखील होतो. बरेचदा ह्या अवस्थेतील लक्षणे ही पूर्वीच्या दोन अवस्थांमधील लक्षणांपेक्षा वेगळीदेखील असू शकतात…

– ह्यात शरीराला खूप घाम येणे अथवा अजिबात न येणे, त्वचेला दुर्गंध येणे अथवा कोणताच गंध न येणे, भरपूर खाज येणे, सर्व अंग प्रत्यंग सुन्न होणे, त्वचा कठीण होणे, त्वचेवरील रोम ताठरणे, जर त्वचेवर एखादी साधी छोटी जखम झाली तर ती लगेच वाढून मोठी होणे, त्वचा काळपट, लालसर अथवा पांढरी होणे, त्वचेवर भरपूर जळजळ होणे, त्वचेचा एखादा भाग सुजून कडक होणे, त्वचेच्या एखाद्या भागात सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणे, त्वचेखाली चरबीच्या गाठी आल्याप्रमाणे वाटणे, स्नायू ताठरणे, त्वचा फाटणे, त्वचेचा एखादा भाग गरम होणे, त्या भागावर सूज येणे, तिथे सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणे, अंग तापणे, त्वचा फार थंड अथवा गरम होणे, त्वचा चुरचुरणे, त्वचेवर कोणताही स्पर्श नकोसा वाटणे, त्वचा बधीर होणे, इ. एक ना अनेक लक्षणे त्वचारोग प्रसर अवस्थेत असताना व्यक्तीच्या शरीरामध्ये उत्पन्न होतात.
या अवस्थेत असणारी लक्षणे ही पूर्वीच्या अवस्थेमधील लक्षणांपेक्षा गंभीर स्वरुपाची असल्याने ह्या अवस्थेतसुद्धा त्या व्यक्तीने योग्य प्रकारे काळजी घेऊन पथ्य पालन केल्यास व औषधोपचार घेतल्यास पुढे उत्पन्न होणारा त्वचाविकाराचा धोका टाळता येतो. म्हणून आजाराच्या या अवस्थेतदेखील योग्य काळजी घेऊन पुढे येणार्‍या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.
(क्रमशः)