ब्रेकिंग न्यूज़
त्वचारोग ‘खरुज’  भाग – १

त्वचारोग ‘खरुज’ भाग – १

  • डॉ. स्वाती हेमंत अणवेकर
    (म्हापसा )

    खरजेपासून बचाव करायचा असल्यास सर्व कपडे चादरी टॉवेल हे गरम पाण्याने धुवावेत. अक्षरशः लहान मुलांची खेळणी सुद्धा धुवावी. खरुज झालेल्या व्यक्तीचे कपडे कायम वेगळे धुवावे. नखे कापावी ज्यामुळे नखांमध्ये हे जीव अडकून असल्यास ते नष्ट होतील. खाज येते म्हणून खाजवत राहू नये.

खरुज हा खाज उत्पन्न करणारा व बर्‍यापैकी एकमेकांमध्ये प्रसार पावणारा त्वचारोग असून ह्या त्वचारोगाचे प्रमुख कारण आहे जीवाणू ‘सार्कोपीस स्केबी’ डरीलेळिशी डलरलळशळ. ह्याला आठ पाय असतात व हे जीव फक्त १/३ मिमी लांब असून त्वचेच्या आत घुसून ते राहतात व भरपूर खाज उत्पन्न करतात. ही खाज रात्री वाढते. हा जीव स्त्रीजातीचा असून तो ०.३-०.४ मिमी लांब असतो. पुरुष जीव हा जरा मोठा असतो. हे जीव सूक्ष्मदर्शकाखाली आपण पाहू शकतो.
हे जीव फक्त घसरून चालू शकतात. पण ते उडू शकत नाहीत. ते २० डिग्री सेल्सिअस तपमानामध्ये निष्क्रिय असतात. पण ह्या तापमानात ते बराच काळ जिवंत राहू शकतात.

खरुज ही कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयात होऊ शकते. जगामध्ये ३०० मिलियन लोक ह्या व्याधीने ग्रस्त असतात. ह्या व्याधीचा प्रसार हा त्वचेचा त्वचेशी संपर्क आला की एकमेकांना होतो. ह्या व्याधी उत्पन्न करणारा जीव हा व्यक्तीच्या शरीरापासून वेगळे फक्त २४-३६ तास जिवंत राहू शकतात. बरेचदा ह्या व्याधीचे संक्रमण शरीरसंबंधातून देखील होताना आढळते.

काही वेळा काही पाळीव प्राण्यांच्या अंगावर असणारे सूक्ष्म कीटक हेदेखील माणसामध्ये खरुज उत्पन्न करण्याचे कारण बनू शकतात. काही प्रौढ व्यक्ती ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यांच्यामध्ये खाज अथवा खरुजेची काही दृश्य लक्षणे आढळून आली नाही तरीदेखील त्यांना ह्याची लागण झालेली असू शकते. ह्या व्याधीमध्ये आपण कितीही काळजी घेतली तरी देखील हा व्याधी एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये प्रसारित होऊ शकतो.

खरुजेच्या लक्षणांमध्ये शरीराच्या काही भागांवर बारीक लालसर पुळ्या येतात. ह्याची सुरुवात बोटांच्या बेचक्यामध्ये, मनगटावर, कोपरामागे, ढोपरांवर, कंबरेवर, बेंबीच्या ठिकाणी, काखेत, स्तनांवर, पावलांच्या मागे, तसेच जनन अंगांवर व पृष्ठ भागावर येतात. ह्यात एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की खरुजेचा जीव हा मनुष्याच्या शरीराशी संपर्कात आला कि २ महिन्यापर्यंत त्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण सुप्त अवथेत असूनदेखील ती व्यक्ती ह्या व्याधीचा प्रसार दुसर्‍या निरोगी व्यक्तीमध्ये करू शकते.

ह्या व्याधीमध्ये येणारी खाज अचानक येऊ लागते व ती न थांबता भरपूर येते व प्रत्येक आठवड्यास ती वाढतच जाते. ही खाज रात्री जास्त येते. खाज ही सुरुवातीला सहन होण्याइतपत असते पण हळूहळू तिची तीव्रता वाढत जाते व त्यामुळे रात्रीची झोपमोड होते.

खरुज होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये पाळीव प्राण्यांच्या शरीरावरील कीटकांशी आपला संपर्क येण्याने तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्याच प्रमाणे चिखल, माती अशामध्ये जर हे जीव असतील व त्याच्याशी आपल्या त्वचेचा संपर्क आल्यास हे होते. शरीराची अस्वच्छता, सांड पाण्याचा त्वचेशी संपर्क अथवा खरुज झालेल्या व्यक्तीच्या कपड्यांशी अथवा त्वचेशी संपर्क आल्यास निरोगी व्यक्तीला देखील हा होऊ शकतो.

खरजेपासून बचाव करायचा असल्यास सर्व कपडे चादरी टॉवेल हे गरम पाण्याने धुवावेत. अक्षरशः लहान मुलांची खेळणी सुद्धा धुवावी. खरुज झालेल्या व्यक्तीचे कपडे कायम वेगळे धुवावे. नखे कापावी ज्यामुळे नखांमध्ये हे जीव अडकून असल्यास ते नष्ट होतील. खाज येते म्हणून खाजवत राहू नये. ही सर्व काळजी खरुज झालेल्या व्यक्तीने लवकर बरे व्हायला घेणे आवश्यक आहे.
(क्रमशः)