‘त्रिफळा’ः बहुगुणी औषध

‘त्रिफळा’ः बहुगुणी औषध

  •  डॉ. मनाली म. पवार
    गणेशपुरी-म्हापसा

त्रिफळा म्हणजे हरीतकी, विभितकी व आमलकी बहुगुणी तर आहेच पण एकेरी द्रव्येसुद्धा तितकीच बहुगुणी व विविध रोगांमध्ये वापरता येतात.

आवळा रसायन द्रव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच च्यवनप्राश अवलेहामध्ये याचा प्रचूर मात्रेत उपयोग केला जातो. नित्य आवळा सेवन केल्याने म्हातारपणाचा प्रभाव मनुष्यावर पडत नाही. मनुष्य निरोगी आरोग्यसंपन्न राहतो.

‘त्रिफळा’ हे एका फळाचे नाव नसून त्रिफळा म्हणजे हरीतकी, बिभितकी आणि धात्री. मराठी भाषेत सांगायचे झाले तर हरडा, बेहडा आणि आवळा. काही ग्रंथकारांच्या मते एक हरडा, एक बेहडा व एक आवळा यांच्या समभाग प्रमाणाला त्रिफळा म्हणतात. काहींच्या मते एक हरडा, दोन बेहडे व चार आवळे म्हणजे त्रिफळा. हे असे आयुर्वेदीय औषध आहे जे अनेक रोगांमध्ये उपयोगी आहे. बर्‍याच लोकांमध्ये, विशेषतः गोव्यातील जनतेमध्ये ‘त्रिफळा’ या औषधाबद्दल गैरसमज असल्याने आपण आज ‘त्रिफळा’बद्दल जाणून घेऊया….

* त्रिफलाचे गुणधर्म ः
त्रिफला कफ-पित्त, प्रमेह तथा कुष्ठनाशक, डोळ्यांसाठी हितकर, मलावष्टंभावर उपयुक्त, अग्निदीपक, रुचिवर्धक तसेच विषमज्वर नाशक.
हरडा, बेहडा व आवळ्याचा काढा कडू व मधुर रसयुक्त असतो.
* त्रिफळ्याचे औषधीय प्रयोग ः-
केश्य – २ ते ५ ग्रॅम त्रिफळा चूर्णात लोहभस्म मिसळून सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास केसगळती थांबेल.

नेत्र – १ चमचा त्रिफळा चूर्ण रात्री थंड पाण्यात भिजत ठेवून सकाळी त्या पाण्यात डोळे धुतल्याने नेत्रांचे रोग बरे होतात. चष्मा लागत नाही. चष्म्याचा नंबर वाढत नाही.
अरुचि – तोंडाला रुची नसल्यास, जेवण बेचव लागत असल्यास त्रिफळाचा प्रयोग करावा.
अम्लपित्त – त्रिफळा चूर्ण अर्धा चमचा दिवसातून दोन वेळा गरम पाण्याबरोबर सेवन केल्यास ‘ऍसिडिटी’मध्ये लाभ होतो.
मलावरोध – त्रिफळा चूर्ण सकाळी उठल्याबरोबर मधाबरोबर सेवन केल्यास मेदोरोग दूर होतात.

कृमी – त्रिफळा, हळद व निम्ब ही तिक्त व मधुर रसात्मक द्रव्ये कफपित्तज रोग नष्ट करतात. कुष्ठ व कृमिनाशक तसेच दूषित व्रण शोधक आहे.
कामला – त्रिफळा, गुडूची, वासा, कुटकी, चिरायता, निम्ब यांचे मिश्रण आठ-पट पाण्यात शिजवून त्याचा एक-चतुर्थांश भाग शिल्लक राहीपर्यंत काढा बनवावा. या काढ्यात मध घालून सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास काविळ रोग नष्ट होतो.
पाण्डुरोग – त्रिफळा पाण्डूरोग नाशक आहे.

बहुमूत्र – त्रिफळा, वाळा, नागरमोथा व पाठा यांच्या चूर्णांचे मिश्रण मधाबरोबर किंवा तूपाबरोबर घेतल्यास बहुमूत्रतेचा दोष नष्ट होतो.
तसेच दोन चमचे त्रिफळा चूर्णात थोडेसे सैंधव मीठ घालून सेवन केल्याने लघवीला जास्त वेळा जावे लागत असेल तर ते कमी होते.
प्रमेह – त्रिफळा, दारुहरीद्रा, देवदारु, नागरमोथा समान भाग घेऊन याचा काढा प्रमेह रुग्णांनी सकाळ-सायंकाळ घ्यावा.
शोथ – गोमूत्रामध्ये त्रिफळा क्वाथ सिद्ध करून सकाळ-सायंकाळ सेवन केल्याने वृषण स्थित वात, श्‍लेष्मल शोथ नष्ट होतो.

ज्वर – त्रिफळा ज्वरनाशक आहे. ताप येण्याअगोदर म्हणजेच तापाच्या पूर्वरूपातच त्रिफळ्याचा काढा सेवन केल्यास ताप येत नाही.
विषमज्वरात त्रिफळा क्वाथ विशेष लाभकारी ठरतो.
रसायन – त्रिफळा हे एक रसायन आहे. त्रिफळा नियमित सेवन केल्यास म्हातारपण लवकर येत नाही. त्रिफळा संपूर्ण रोगनाशक व आयुस्थापक आहे.
असे हे बहुगुणी त्रिफळा रसायन योग्य वैद्याच्या सल्ल्याने सेवन केल्यास आरोग्यदायी ठरेल. तसेच त्रिफळामधील असलेले हिरडा, बेहडा व आवळा या घटकद्रव्यांचा एकेरी प्रयोगही आरोग्यासाठी लाभप्रद आहे. आता त्रिफळामधील एकेरी द्रव्यांबद्दल पाहू.
हिरडा ः विशिष्ट गुण व कार्य –
चावून खाल्लेला हिरडा अग्निवर्धक, कुटून खाल्लेला हिरडा मलावरोधावर उपयुक्त, उकळून शिजवून खाल्लेला हिरडा अतिसार बंद करतो. तुपात तळलेला किंवा अग्नीवर गरम केलेले त्रिदोषहर असतो. तसेच जेवणाबरोबर खाल्ल्यास बुद्धीवर्धक व इंद्रियांना प्रसन्न करतो. भोजनानंतर खाल्लेला हिरडा मिथ्या आहार-विहाराने उत्पन्न झालेल्या विकारांचा नाश करतो.

औषधीय प्रयोग ः
शिरःशूल – हिरडा गरम पाण्यात उगाळून त्याचा लेप लावल्यास अर्धशिशीची डोकेदुखी थांबते.
हिरड्याचे सरबत करून प्यायल्याने डोकेदुखी व पित्तविकार नष्ट होतात.
दन्तप्रयोग – हिरड्याच्या चूर्णाने दातांवर मंजन केल्याने दात साफ व निरोगी होतात.
नेत्ररोग – हिरड्याचे चूर्ण रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळे साफ होतात व डोळ्यांची जळजळ थांबते.
मद-मूर्च्छा ः हिरड्याच्या क्वाथाने सिद्ध तुपाचे सेवन केल्याने मद-मूर्च्छा नष्ट होते.
कफ निष्कासनार्थ – हिरड्याचे चूर्ण २-५ ग्रॅमच्या मात्रेत सेवन केल्यास छातीत साठलेला कफ बाहेर पडतो.

कास – श्‍वास ः हिरडा व सुंठ चूर्ण समान भागात घेऊन २-५ ग्रॅमच्या मात्रेत मंदोष्ण पाण्याबरोबर सकाळ-सायं. सेवन केल्यास कास, श्‍वास बरा होतो.
व्रण – फार पसरलेला घाव हिरड्याच्या काढ्याने धुतल्यास घाव संकुचित होतो.
पाचन शक्ती – हिरड्याचे चूर्ण खडीसाखरेबरोबर भोजन खाण्याने पचनाची शक्ती वाढते.
उलटी होत असल्यास हिरड्याचे चूर्ण मधासोबत खावे. उलटी लगेच थांबते.
अण्डकोषवृद्धी – ५ ग्रॅम हिरडा, १ ग्रॅम सैंधव मीठ, ५० मिलि. गोमूत्र व ५० ग्रॅम एरंड तेल चांगले शिजवून, तेल मात्र राहिल्यावर गाळून घ्यावे. त्याने अण्डकोषवृद्धीला आळा बसतो.
प्रमेह – हिरड्याचे चूर्ण २-५ ग्रॅम, १ चमचाभर मधासोबत सेवन केल्यास प्रमेहात लाभ होतो.
अर्श – हिरड्याच्या क्वाथाने बस्ति किंवा धावन केल्यास अर्श व योनीस्रावामध्ये लाभ होतो.
कुष्ठरोग – कुष्ठरोगामध्ये गोमूत्र हे सर्वश्रेष्ठ औषध आहे. २० – ५० मिली गोमूत्राबरोबर २-५ ग्रॅम हिरड्याचे चूर्ण सकाळ-सायंकाळ सेवन केल्यास, निश्‍चित लाभ होतो.
श्‍लीपद रोग – १० ग्रॅम हिरडा ५० ग्रॅम एरंड तेलात भिजवून २ दिवस सेवन केल्यास श्‍लीपद रोग नष्ट होतो.

विशेष सेवन विधी – हरीतकी कफ रोगात सैंधवबरोबर, पित्तज रोगात खडीसाखरेबरोबर व वातविकारात तुपाबरोबर सेवन करावी.
रसायन म्हणून जे हरीतकी सेवन करतात त्यांनी वर्षाऋतुमध्ये सैंधवाबरोबर, शरद ऋतूत साखरेबरोबर, हेमंतात सुंठीबरोबर, शिशिरात पिंपळ्ळीबरोबर, वसंत ऋतूत मधाबरोबर व ग्रीष्म ऋतूत गुळाबहरोबर हिरडा सेवन करावा.
‘बेहडा’ ः-
गवणधर्म ः बेहडा हा त्रिदोषहर आहे परंतु याचा मुख्य प्रयोग कफप्रधान रोगांमध्ये होतो.

औषधीय प्रयोग –
केश्य ः फळाच्या मगजाचे तेल केसांसाठी अत्यंत पौष्टिक आहे.
नेत्रज्योती – बेहडा व साखरेचे समभाग मिश्रण सेवन केल्यास नेत्रज्योती वाढते.
हृदयवात ः बेहडाचे चूर्ण व अश्‍वगंधी चूर्ण समभाग घेऊन त्यात गूळ घालून उष्ण पाण्याबरोबर सेवन केल्यास हृदयवात नष्ट होतो.
लाळ गळत असल्यास – २ ग्रॅम बेहड्याच्या चूर्णात साखर घालून काही दिवस सेवन केल्यास तोंडातून लाळ गळणे बंद होते.
श्‍वास – बेहडा व हिरड्याचे चूर्ण नित्य सेवन केल्याने श्‍वास रोग बरा होतो.
मंदाग्नी – ३ ते ६ ग्रॅम चूर्ण भोजनानंतर सेवन केल्यास पाचनशक्ती तीव्र होते व आमाशयाला ताकद मिळते.
मूत्रकृच्छ – फळातील मगजाचे चूर्ण मधाबरोबर सकाळ-संध्याकाळ चाटल्यास मूत्रकृच्छ तसेच अश्मरीमध्ये लाभ होतो.
नपुंसकता – ३ ग्रॅम बेहडा चूर्ण ६ ग्रॅम गुळाबरोबर प्रतिदिवशी सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास लाभ होतो.
कण्डू – बेहडाच्या फळातील मगज रोगात लाभकारी आहे. तसेच दाहशामक ् आहे.
आवळा – आवळ्याच्या फळात विटामीन ‘सी’ प्रचूर मात्रेमध्ये असते.
गुणधर्म ः आवळा त्रिदोषहर आहे. अम्ल रसात्मक असल्याने वाताचे शमन करते. मधुर व शीत असल्याने पित्ताचे व वाताचे शमन करते, मधुर व शीत असल्याने पित्ताचे व रुक्ष व कषाय असल्याने कफाचे शमन होते.
कुष्ठघ्न, ज्वरघ्न, हृद्य, शोणितस्थापक आहे.
औषधीय प्रयोग –
केशकल्प ः आवळा व आंब्याच्या अठळीतील मज्जा एकत्र घोटून केसांा लावल्यास दृढमूळ, लांब केस होतात.
स्वरभेद ः आवळ्याचे चूर्ण २ चमचे मध व १ चमचा तूपाबरोबर चाटल्याने स्वरभेद दूर होतो.
उचकी ः आवळ्याचा १०-२० ग्रॅम रस आणि २-३ ग्रॅम पिंपळी चूर्ण मधाबरोबर सेवन केल्यास उचकी थांबते.

उलटी ः आवळ्याच्या रसात मिश्री मिसळून खाण्याने उलटी थांबते.
अम्लपित्त ः ताजे आवळे खडीसाखरेबरोबर खाल्ल्याने किंवा २५ ग्रॅम आवळ्याच्या रसात समभाग मध घालून सकाळ-संध्याकाळ सेवन केल्याने आंबट ढेकर, घशाकडे जळजळ अशा तक्रारी लगेच बंद होतात.
संग्रहणी ः मेथीच्या दाण्याबरोबर आवळ्याच्या पानांचा काढा करून सकाळ-सायं. प्यायल्यास संग्रहणी दोष नाहीसा होतो.
कामला ः काविळीमध्ये आवळा मधाबरोबर चटणी करून सकाळ-सायंकाळ खावी.
मूत्रकृच्छ्र ः आवळ्याच्या स्वरसात वेलची चूर्ण घालून २-३ वेळा दिवसातून सेवन केल्यास लघवी साफ होऊन वेदना कमी होतात.
रक्तातिसार ः यामध्ये रक्तस्राव जास्त होत असल्यास आवळ्याच्या रसात मध व तूप घालून प्यायल्याने रक्तस्राव थांबतो.

रक्तप्रदर ः आवळ्याचे चूर्ण रात्री भिजत घालून सकाळी सेवन करावे.
योनिदाह ः आवळ्याच्या रसात साखर व मध घालून पिण्याने योनिदाहामध्ये आराम मिळतो.
दीर्घायुष्यासाठी…
फक्त आवळ्याचे चूर्ण रात्री तूप, मध अथवा पाण्याबरोबर सेवन केल्यास नेत्र, कान, नासिकादि इंद्रियांचे बल वाढते. जाठराग्नी तीव्र प्रदीप्त राहतो. तसेच यौवन प्राप्त होते.
आवळा रसायन द्रव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच च्यवनप्राश अवलेहामध्ये याचा प्रचूर मात्रेत उपयोग केला जातो. नित्य आवळा सेवन केल्याने म्हातारपणाचा प्रभाव मनुष्यावर पडत नाही. मनुष्य निरोगी आरोग्यसंपन्न राहतो. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रात आवळ्याला अमृत फळ किंवा धात्री फळ असे म्हटले आहे.
त्रिफळा म्हणजे हरीतकी, विभितकी व आमलकी बहुगुणी तर आहेच पण एकेरी द्रव्येसुद्धा तितकीच बहुगुणी व विविध रोगांमध्ये वापरता येतात.