त्यागाचा फुगा

संजय बारू यांच्या ‘द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाचा वाद शमतो न शमतो तोच माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंग यांच्या ‘वन लाईफ इज नॉट इनफ’ या आत्मकथनपर पुस्तकातील काही तपशिलातून नवा वाद सुरू झाला आहे. नटवरसिंग हे गांधी घराण्याचे निष्ठावंत सेवक होते, त्यामुळे अनेक आतल्या गोष्टी त्यांना ठाऊक असणे हे ओघाने आले. पुढे इराकमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका प्रकल्पात नटवरसिंग यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळाल्याचा ठपका पॉल वॉल्कर समितीने ठेवला आणि त्या वादात नटवरसिंग यांचे परराष्ट्रमंत्रीपद गेले आणि त्यासरशी गांधी घराण्याशी असलेले त्यांचे संंबंध बिघडले. त्यात दुरावा आणि कडवटपणाही आला. नटवर आणि त्यांच्या मुलाने मग बसपात प्रवेश केला. तेथून त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल हाकलण्यात आले. सध्या त्यांचा मुलगा भाजपचा खासदार आहे. नटवरसिंग यांच्या एकेकाळचे सोनियानिष्ठेचे चित्रण संजय बारूंच्या पुस्तकातही आहे. सोनियांनी नटवर यांच्याकडे एक वडीलधारी व्यक्ती म्हणून पाहिले आणि त्यातून त्यांच्यात जवळीकही निर्माण झाली होती. मात्र, आपल्याला राजकारणातून संपवण्यास सोनिया जबाबदार आहेत हा राग आज नटवरसिंग यांच्या मनात आहे आणि या ताज्या पुस्तकातून आधी घडून गेलेल्या घटनांकडे त्यांनी त्याच कलुषित दृष्टीतून पाहिल्याचे दिसते. सध्या या पुस्तकातील एका प्रसंगाची सर्वत्र चर्चा आहे ती सोनिया यांनी आपल्याकडे चालून आलेले पंतप्रधानपद नाकारून ते डॉ. मनमोहनसिंग यांना दिले त्याविषयी. सोनियांच्या त्या निर्णयाला आजवर ‘त्यागा’चा मुलामा दिला गेला असला, तरी प्रत्यक्षात तो त्याग नव्हता, तर त्यांच्या जिवाला अपाय होईल अशी भीती राहुल गांधी यांना वाटल्याने त्यांनी त्यांना हे पद स्वीकारण्यास तीव्र विरोध केला आणि आपले ऐकले गेले नाही तर कोणत्याही थराला जाण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे निरुपाय होऊन सोनियांनी चालून आलेले पंतप्रधानपद त्यागले असे नटवरसिंग यांचे एकंदर सांगणे आहे. राहुल गांधींनी पंतप्रधानपदावर असलेली आपली आजी गमावली, वडील गमावले, त्यामुळे सोनियांना ते पद स्वीकारू नकोस असे त्यांनी कळकळीने सांगणे यात वावगे काही नाही. जेव्हा हे सगळे घडले तेव्हा राहुल ‘राजकारणी’ बनलेले नव्हते. त्यामुळे एका मुलाने भावव्याकुळ होऊन आईला घातलेली ही गळ होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जेव्हा देशाचे नेतृत्व कोण करणार अशी पोकळी निर्माण झाली होती, तेव्हा राजीव यांनी पंतप्रधानपद स्वीकारू नये अशी गळ सोनियांनीही पतीला घातली होती. त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन पी. सी. अलेक्झांडर यांच्या आत्मकथनात आहे. राजीव यांना सोनिया पंतप्रधानपद न स्वीकारण्याबाबत कशा पदोपदी विनवीत होत्या आणि राजीव यांनी त्यांची समजूत कशी काढली त्याचे ते वर्णन आहे. मनुष्यस्वभावाचा विचार करता आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून हिरावली जाऊ नये असे वाटणे स्वाभाविक म्हणावे लागेल. त्यामुळे जी विनंती सोनियांनी राजीव यांना केली होती, तीच पुढे राहुल यांनी सोनियांना केली हे मानवी भावभावनांना धरून आहे. पण सोनिया पंतप्रधानपद नाकारत असताना त्या नकाराला ‘त्यागा’चा मुलामा दिला गेला. स्वतः सोनियांनी त्या नाट्यमय दिवशी जे भाषण केले, त्यामध्ये आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाला स्मरून आपण सदर निर्णय घेतल्याचे म्हटले होते. कॉंग्रेसमधील गांधी घराण्याच्या भाटांनी त्यागाचे पोवाडे रचले. खरे तर सोनियांच्या विदेशी होण्याच्या मुद्द्यावरून तेव्हा कमालीचा विरोध सुरू झाला होता. त्यांना पंतप्रधानपदी बसवू नये यासाठी आपल्याला शेकडो पत्रे आणि ईमेल येत होत्या असे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी आपल्या ‘टर्निंग पॉईंटस्’ या आत्मचरित्रात लिहिले आहे. सोनियांनी पंतप्रधानपद डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे सोपविले त्या दिवशीचा सारा घटनाक्रम त्यांनी नमूद केलेला आहे. एकाच घटनेकडे वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या नजरेने पाहता येते. दृष्टी तशी सृष्टी असे म्हटले जाते. नटवरसिंग यांनी आपले परराष्ट्रमंत्रीपद जाण्यापूर्वी हे पुस्तक लिहिले असते तर ते वेगळ्याच अंगाने लिहिले गेले असते. आता एका अस्वस्थ आत्म्याचे हे आत्मकथन आहे. त्यामुळे त्यातली घटना आणि प्रसंगांकडे पाहण्याची नजर वेगळी आहे. सोनियांच्या त्यागाचा फुगा मात्र त्याने पुरता फोडला आहे.

Leave a Reply