…तो पयर्र्ंत वीज दरवाढ नाही ः वीजमंत्री काब्राल

जोपयर्र्ंत राज्यभरातील लोकांना २४ तास अखंडितपणे वीजपुरवठा करण्यास वीज खात्याला यश येणार नाही तोपर्यंत वीज दरवाढ करण्यात येणार नसल्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. वीज खात्याने वेर्णे, साळगांव व तुयें अशा तीन ठिकाणी अतिरिक्त उच्च दाबाची वीज उपकेंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यापैकी वेर्णे व तुयें येथील वीज उपकेंद्रे न बांधण्याचा व केवळ साळगांव येथेच अतिरिक्त उच्च दाबाचे वीज उपकेंद्र बांधण्याचा वीज खात्याने निर्णय घेतला असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

वरील तिन्ही ठिकाणी अतिरिक्त उच्च दाबाची वीज उपकेंद्रे बांधायची झाल्यास त्यावर १४० कोटी रु. एवढा खर्च होणार आहे. मात्र, एवढे पैसे खर्च करुन ही तीन वीज उपकेंद्रे बांधून त्यांचाम्हणावा तेवढा फायदा होणार नसल्याचे दिसून आल्याने खात्याने आता या तीन पैकी केवळ एकच अतिरिक्त उच्च दाबाचे वीज उपकेंद्रे साळगांव येथे उभारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काब्राल यांनी दिली.

२०१० साली कुंकळ्ळी येथे अतिरिक्त उच्च दाबाचे वीज उपकेंद्र खात्याने उभारले होते. मात्र, आता पर्यंत या केंद्राचा केवळ ३० टक्के एवढाच वापर झाला असल्याचे काब्राल म्हणाले. कोट्यावधी रु. खर्चून बांधण्यात येणार्‍या अशा केंद्राचा एवढा कमी वापर होत असेल तर ती बांधून फायदा नसल्याचे दिसून आल्याचे वरील तीनपैकी दोन केंद्रे न उभारण्याचा निर्णय खात्याने घेतल्याचे ते म्हणाले.

उत्तर गोव्यातील कांदोळी, कळंगुट, आसगांव, शिवोली, हणजूण, बागा, पर्रा, मांद्रे या भागात वीज समस्या आहे. साळगांव येथे अतिरिक्त उच्च दाबाचे वीज उपकेंद्र उभारल्यानंतर या गावांतील वीज समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुमारे दीड महिन्यापूर्वी वीज खात्याने वेर्णे, तुयें व ताळगांव अशा तिन्ही ठिकाणची अतिरिक्त उच्च दाबाची वीज उपकेंद्रे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यात बद्दल करुन साळगांव येथील केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले.

वेर्णे येथील सध्याच्या वाहिन्या बदलण्यात आलेल्या आहेत. तसेच तेथे ११० केव्ही ६३ एम्‌व्हीए ट्रान्सफॉर्मरची सोय करण्यात आली असल्याची माहिती वीज मंत्र्यांनी दिली.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात उद्योगांसाठीच्या वीजेत किरकोळ दरवाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती वापरासाठीच्या वीजेत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती असे ते म्हणाले.

आधुनिक कंडक्टर्स आणणार
राज्यातील वीज पुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी खाते नवे आधुनिक कंडक्टर्स विकत घेणार असल्याची माहिती काब्राल यांनी दिली.

१४ नवी वीज उपकेंद्रे
नावेली, कळंगुट, हणजुण, आल्तिनो आदीसह राज्यभरात आणखी १४ वीज उपकेंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बोगदा येथे नवे टान्सफॉर्मर लवकरच बसवण्यात येणार असून म्हापसा येथेही नव्या ट्रान्सफॉर्मसची सोय केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
वीज खात्यावर आपण यापूर्वीच श्‍वेतपत्रिका काढली असल्याचे ते सांगून ती काढणारे हे एकमेव खाते असल्याचे त्यांनी नमूद केले.