तेलगू देसमचे राज्यसभेतील चारही खासदार भाजपात

>> चंद्रबाबू नायडू विदेशात असताना केले बंड

तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांना ते विदेश दौर्‍यावर असताना त्यांच्या पक्षाच्या ४ राज्यसभा खासदारांनी काल जोरदार हादरा दिला. वाय. एस. चौधरी, सी. एम. रमेश, जी. मोहन राव आणि टी. जी. व्यंकटेश हे तेलगू देसमचे राज्यसभा खासदार नाटयमय घडामोडीत भाजपात दाखल झाले. तसेच या चौकडीने राज्यसभेचे अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन आपण आपल्या पक्षाचा संसदीय गट भाजपात विलीन करीत असल्याचे पत्र त्यांना सादर केले. नंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सदर खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याची घोषणा करण्यात आली.

भाजपमध्ये तेलगू देसम संसदीय गटाच्या विलिनीकरणाचे पत्र व्यंकय्या नायडू यांना सादर करतेवेळी या खासदारांबरोबर भाजपचे राज्यसभेतील गटनेते थावरचंद गेहलोट हेही उपस्थित होते. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्या चौघांच्या गटाचे भाजपात विलिनीकरण करण्यास भाजपची हरकत नसल्याविषयीचे पत्र गेहलोट यांनी नायडू यांना यावेळी सादर केले. त्यानंतर चारपैकी तीन तेलगू देसमचे खासदार भाजप मुख्यालयात जाऊन नड्डा व गेहलोट यांना भेटले व भाजपात प्रवेशाची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली.

भाजप मुख्यालयातील पत्रकार परिषदेत नड्डा यांनी सांगितले की भाजप सकारात्मक राजकारणावर व सर्वसमावेशकतेवर विश्‍वास ठेवतो याबाबत या खासदारांना आपण आश्‍वस्त केले आहे. या खासदारांच्या भाजपला पाठिंब्यामुळे राज्यसभेत एनडीएचे बळ वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला.

असे पेचप्रसंग पक्षाला
नवीन नाहीत ः चंद्रबाबू
या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना तेलगू देसमचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी असे पेचप्रसंग पक्षाला नवीन नाहीत असे म्हटले आहे. नायडू सध्या युरोप दौर्‍यावर असून त्यांनी या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर फोनवरून अमरावती येथील आपल्या पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. राज्याचे हीत नजरेसमोर ठेवूनच आपल्या पक्षाने निवडणुकीत भाजपविरोधात दोन हात केले असेही नायडू यांनी म्हटले आहे.