ब्रेकिंग न्यूज़

‘तुळाभार’ ः चरित्रनायकाचे जीवनदर्शन

– प्रा. गोपाळराव मयेकर  (म्हापसा)

श्री. दामोदर केळकर यांच्यासारख्या साध्या परंतु सात्त्विक वृत्तीच्या माणसाचे चरित्र लोकांपुढे आणण्यात, त्यांचा वारसा प्राप्त झालेल्या चिरंजीवाकडून हे काम चरित्र लेखनाद्वारे झाले आहे आणि त्याबद्दल मला त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.

श्री श्रीकृष्ण दामोदर केळकर हे कथालेखन करणारे कथालेखक, त्यांनी ‘‘तुळाभार’’ या शीर्षकाखाली आपल्या वडिलांचे म्हणजेच श्री. दामोदर केळकर यांचे चरित्र लिहिण्याचे कार्य हाती घेऊन ते लिहिण्याचे काम फत्ते केले आहे. त्यांच्या कल्पक बुद्धीने यासाठी हिंदूधर्म व्यवहारातील ‘‘तुळाभार’’ ही संकल्पना मोठ्या कलात्मकतेने वापरून, त्या आधारे आपल्या वडिलांचे चरित्र लिहावयास प्रारंभ केला. त्यांचा नानोडा गाव अनेक देवदेवतांच्या लहान-मोठ्या मंदिरांनी गजबजलेला गाव. त्यामुळे त्यांना आपल्या प्रेमाचा आणि अभिमानाचा हा विषय वाटतो. त्याची प्रचिती त्यांनी यासंबंधी प्रारंभी जे वर्णन केले आहे त्यातून येते. तुळाभार या संकल्पनेचा जो धर्मविधी आहे तो त्यांनी अगदी सुंदर रीतीने आणि सविस्तरपणे सादर केला आहे. या धर्मविधीचे उत्तम वर्णन करताना त्यांचे ज्ञान कुठेही कमी पडत नाही आणि ते प्रत्येक शब्दामधून उत्तमरीत्या प्रकट होते. हा तुळाभार सादर करताना लेखकाचा विचार आश्‍चर्यजनक आणि कुतूहल वाढविणारा आहे. उजव्या पारड्यात बसलेल्या आपल्या वडिलांची तुळा करण्यासाठी डाव्या पारड्यात धान्य, गूळ, साखर ऐवजी आपल्या वडिलांच्या जीवनातील बर्‍या-वाईट घटनांची वजन टाकण्याची कल्पना अगदी मोठी मोहक आणि अर्थपूर्ण आहे आणि याच गोष्टींचा आधार घेत त्यांनी अ. गो. स्वा.सै. संघटना, अ. गो. हरिभक्त कीर्तनकार परिषद, अ.गो. शिक्षण शिक्षक संघ, अनेक ज्ञातींचे पदाधिकारी, अनेक राजकीय नेते मंडळी, अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी अशा कित्येक महनीय व्यक्तींनी तुळाभार प्रसंगी तुडुंब भरला होता, असे नमूद करून आपल्या चरित्रनायकाच्या कर्तबगारीची झलक दाखविली आहे.
या चरित्र नायकाच्या तुळाभारातील प्रवेश व त्यांनी काढलेल्या उद्गारातून लेखकाने त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या जीवनकार्याकडे अंगुलिनिर्देश केला आहे आणि लेखकाने नाट्यमयरीत्या प्रवेश करून ग.दि. माडगूळकरांच्या गीतरामायणाच्या शैलीनुसार, ‘‘स्वये श्री दामोदर बोलती, स्वजन, आप्तेष्ट मनोभावे ऐकती, दामोदरसुत श्रीकृष्ण तुळाभार लिखती’’ अशी आकर्षक गमतीदार प्रस्तावना केली आहे.
ज्या नानोडा गावात दामोदर केळकरांचे जीवन व्यतीत झाले, त्या आपल्या गावचे सुंदर शब्दचित्र रेखाटून वडिलांचे बालपण अतिशय आकर्षकरीत्या शब्दबद्ध केले आहे. १९२७ सालचे यथार्थ वर्णन त्यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने नमूद केले आहे. लहानपणी पाठ केलेली विविध सूक्ते, स्तोत्रे, चरित्रनायकाच्या अगदी २०१३ पर्यंत दीर्घकाळ कशी मुखोद्गत होती ती सांगताना चरित्रनायकाच्या आश्चर्यजनक प्रतिभेचे लेखक अचंबित व्यक्त करताना दिसतो. अनेक प्रकारच्या कवचांचे, स्तोत्रांची नामावली आणि संख्या लेखकाने तपशीलवार दाखवून त्या काळच्या ब्राह्मणवर्गाचे जीवन कसे विद्याविभूषित होते याची ओळख करून दिली आहे. १९२७ ते २०१३ पर्यंत त्यांच्या यशस्वी जीवनाचा पाया त्यांच्या आध्यात्मिक अभ्यासात आणि वृत्तीत होता. आयुष्यातील कंटकाकीर्ण मार्ग लीलया पार पाडण्यामागे त्यांचा आध्यात्मिक पाया उपयोगी पडला, असे लेखकाने जाणीवपूर्वक नमूद केले आहे. श्री. दामोदर केळकर यांच्या जीवनात झालेल्या स्थित्यंतरांचे आणि देशांतराचे प्रसंग सांगून लेखकाने त्यातील विविधतेकडे आपले लक्ष वेधले आहे आणि त्यामधून शब्दलेखनाची ताकद अधोरेखित होते.
मी स्वतः म्हापश्यात आल्यापासून त्यांना ओळखत होतो. कारण दामोदर केळकरांचे वास्तव्य त्या काळात म्हापश्यात होते. चरित्रनायकाच्या औपचारिक शिक्षणानंतर त्यांच्या जीवनातील कीर्तनकाराची भूमिका कशी आली, हा मनोरम इतिहास सांगताना लेखकाला उत्साहाचे भरते येते. तसेच पोर्तुगिजांविरुद्धच्या लढ्यात स्वातंत्र्य सैनिकाची जबाबदारी त्यांच्यावर कशी पडली, त्यासाठी त्यांना तुरुंगवास कसा झालेला इत्यादी तपशिलांमुळे वाचकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान जागविण्यात लेखक कमालीचा यशस्वी ठरला आहे.
हे चरित्र सजविताना लेखकाने अधूनमधून चरित्रनायकाच्या वेगवेगळ्या वचनांचा वापर केल्यामुळे या चरित्राची विश्वासार्हता वाढविण्यास मदत होते. या चरित्रलेखनात लेखकाची लेखनशैली विविध रूपे लीलया घेताना दिसते. वडिलांविषयीच्या प्रेमादरापोटी त्यांच्या भाषेला अंतरीचा जिव्हाळा आपोआपच प्राप्त झाला आहे. वडिलांचे जीवन उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आणि अनुभवलेले असल्याकारणाने या लिखाणाला सत्याचा स्पर्श झाला आहे. दामोदर केळकर यांनी आपल्या जीवनात कितीतरी प्रकारांनी समाजाची सेवा केली हे कळल्यानंतर खरोखर आश्‍चर्यच वाटले.
चरित्रातील या सर्व घटना तुळाभाराच्या एका पारड्यात ठेवल्यानंतर तुळाभार समसमान होण्यासाठी लेखकाने उत्कंठा शिगेला पोचवण्यासाठी आपल्या लेखन प्रतिभेचा परमोच्च बिंदू साधत, त्यांच्या पत्नीचा म्हणजेच सरस्वतीआईचा कौशल्याने प्रवेश सादर करून, त्यांच्या भावपूर्ण सहजीवनाचा एक आदर्श परिपाठ समाजासमोर ठेवून, तुळाभार संकल्पना फार मोहक, उत्तम करून ठेवली आहे. या तुळाभाराच्या शेवटी चरित्रनायकाच्या विविध प्रकारच्या कर्तृत्वाचा तपशील ग्रंथाच्या शेवटी ‘‘एक दृष्टिक्षेप’’ म्हणून दिला आहे, हे एका अर्थाने चरित्रनायकाच्या उत्तुंग जीवनाचे सारभूत जीवनदर्शन घडविले आहे.
गोमन्तकाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात भर घालून ते समृद्ध करणार्‍या व्यक्तींचा इतिहास समाजापुढे येणे गरजेचे आहे. या दृष्टीने श्री. दामोदर केळकर यांच्यासारख्या साध्या परंतु सात्त्विक वृत्तीच्या माणसाचे चरित्र लोकांपुढे आणण्यात, त्यांचा वारसा प्राप्त झालेल्या चिरंजीवाकडून हे काम चरित्र लेखनाद्वारे झाले आहे आणि त्याबद्दल मला त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. प्रति साने गुरुजी म्हणून ओळखल्या जाणार्‍या केळकर गुरुजींचे येणे-जाणे माझ्या सासुरवाडीला, तेथील मुला-मुलींना शिकविण्यासाठी येत असत.. असे मला स्मरते.
श्रीकृष्ण केळकर यांच्या या चरित्रलेखनातून मला त्यांच्याविषयी कितीतरी नवीन गोष्टी समजून आल्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर शतपटीने वाढला. उत्तम कथा प्रतिभा लाभलेल्या लेखक श्रीकृष्ण केळकर यांची लेखनशैलीची उत्तरोत्तर अशीच भरभराट होवो अशी शुभेच्छा व उत्तम चरित्र लिहिल्याबद्दल खरोखरच मनःपूर्वक अभिनंदन!!