ब्रेकिंग न्यूज़

तुम्हां तो श्रीगणेश सुखकर हो!

  • शंभू भाऊ बांदेकर

श्रीगणेशाला सूर्यमंडळाची ज्ञान प्रकाश देवता असे संबोधले गेले आहे आणि श्रीगणेशाचे वाहन ‘मूषक’ हे काळोखाचे प्रतीक ठरले आहे. मूषकारोहणाचा अर्थ असा की, अंधःकारावर ताबा ठेवून ज्ञानप्रकाशाचा प्रसार करणारी देवता म्हणजे श्रीगणेश!

मराठी हिन्याच्या प्रत्येक पक्षातील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी व कृष्ण पक्षातील चतुर्थीस संकष्टी म्हणतात. पण संकष्टी जर मंंगळवारी आली तर तिला अंगारकी असे म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थी म्हणजेच अर्थात श्रीगणेश चतुर्थी.

आपल्या भारत देशाचे एक धार्मिक वैशिष्ट्य हे की, येथील जवळपास प्रत्येक गावांत, खेड्यात, शहरात भले त्या ठिकाणी ग्रामदेवता कोणतीही असली तरी गणपती आणि मारुती यांची स्थापना मोठ्या भक्तीभावाने केलेली आढळते आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांना श्रीगणेश आणि हनुमान हे दोन देव विशेष श्रद्धेय वाटतात. आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे श्रीगजानन व श्री हनुमान हे दोन देव असे आहेत की, ज्यांची शरीरे मूर्तीतही सिंदूरवर्णी ठेवली जातात. या दोन्ही देवांचे एकत्र वास्तव्य अशासाठी की, श्रीगणपती हा मूळारंभ-अनादिअनंत आणि ज्ञानाचे अधिष्ठान मानला गेला आहे, तर हनुमंत हा ज्ञानवंत, पराक्रमी, निष्ठेचा उपासक व त्या गावाच्या आरोग्याची देखभाल करणारा शक्तीदाता मानला गेला आहे.
श्रीगणेशाला सूर्यमंडळाची ज्ञान प्रकाश देवता असे संबोधले गेले आहे आणि श्रीगणेशाचे वाहन ‘मूषक’ हे काळोखाचे प्रतीक ठरले आहे. मूषकारोहणाचा अर्थ असा की, अंधःकारावर ताबा ठेवून ज्ञानप्रकाशाचा प्रसार करणारी देवता म्हणजे श्रीगणेश! अशा या श्रीगणेशाचे गणेशभक्त आपल्या कुटुंबामध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजन करून ‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असे मनोभावे गार्‍हाणे घालून विसर्जन करीत असतात.

शिवाय नऊ दिवस, अकरा दिवस किंवा एकवीस दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव असतो. उत्साही गणेशमंडळे यासाठी दीड-दोन महिने आधीपासूनच महाकाय, भव्य दिव्य रंगीत गणेशाची मूर्ती सांगण्यापासून विविध प्रकारची सजावट, आतषबाजी, विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, संगीत, मैफली, नाटके आदिंमध्ये गर्क असतात. निधी गोळा करण्यासाठी मौल्यवान वस्तूंची बक्षिसांसाठी निवड करून लॉटरीमार्फत लोकांना आकर्षित केले जाते. शिवाय परिसरातील छोटे-मोठे व्यापारी, राजकारणी, समाजकार्यकर्ते यांच्याकडून निधी गोळा केला जातो.

मध्यंतरी सार्वजनिक गणेशोत्सवाला बरेच ओंगळ स्वरुप आल्याची टीका सर्व थरातून होत होती. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, संगीताच्या नावाखाली ऑर्केस्ट्राचा धांगडधिंगाणा, रात्रभर ध्वनिक्षेपकांवर भलतीसलती गाणी या सार्‍यांमुळे प्रदुषण, ध्वनीप्रदुषण यांच्यात भर पडली होती. पण आता काही गणेशमंडळांनी योग्य तो बोध घेऊन कार्यक्रम बोधपद व सुबोध होण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र आणखी एक जमेची बाजू म्हणजे जो अवाढव्य निधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोळा केला जातो त्यातील काही भाग गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करणे, दिव्यांग, वृद्ध, निराधार यांना मदतीचा हात देणे, परिसरातील शाळा, मंदिरे आदिंची डागडुजी करणे आदिंसाठी खर्च केला जातो. स्तुत्य अशीच ही गोष्ट म्हणावी लागेल. यातून खर्‍या अर्थाने गणपती सुखकर्ता, दुःखहर्ता आहे, याची जाणीव सर्वांना होते हे निश्‍चित!

आपल्या गोव्यात गणेश चतुर्थी हा उत्सव रावांपासून रंकांपर्यंत सर्व हिंदू जातीधर्माचे लोक मोठ्या उत्साहाने तळमळीने आणि भक्तीभावाने साजरा करतात. त्यात मग जातीपातीनुरुप, प्रथांनुरुप वैविध्य आहे. काही कागदाचा गणपती पूजतात, तर काही गणेशपूजन करीतच नाहीत. मुख्य म्हणजे बाटवाबाटवीनंतरही काही ख्रिस्ती बांधव आपल्या मूळच्या जुन्या घरी जाऊन चवथीच्या आनंदात सामील होतात. येथे हिंदू, ख्रिस्ती हे ईदच्या निमित्ताने आपल्या मुस्लिम मित्रांकडे जातात, तर नाताळाच्यावेळी हिंदू, मुस्लिम आपल्या ख्रिस्ती मित्रांकडे जातात. तसेच चतुर्थीच्यावेळी ख्रिस्ती व मुस्लिम बांधव आपल्या हिंदू मित्रांकडे जाऊन चहा-फराळ आणि भोजनाचा आस्वाद घेतात. काही ख्रिस्ती व मुस्लिम बांधव आवर्जून आरतीच्या वेळी हजर राहतात व इतरांबरोबर आपणही तो श्रीगणेश तुम्हा-आम्हा सर्वांना सुखकर होवो म्हणून प्रार्थना करतात. आपले इच्छित कार्य तडीस जावे म्हणून श्रीगणेशाच्या चरणी गार्‍हाणे घालतात.

संत ज्ञानेश्‍वरांच्या गणेश स्तवनाला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. ज्ञानेश्‍वरीच्या पहिल्या अध्यायातील गणेशवंदनाला मंगलाचरण म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्ञानेश्‍वरांनी श्रीगणेशवंदनेपासून गीताप्रशस्तीपर्यंत एक भव्य भावगर्भ आणि उत्कट चित्र प्रभावीपणे उभे केले आहे, असे जाणकारांनी नमूद केले असून मंगलचरणातील गणेशवंदनाला सहजपणे व्यापक रूप देण्याची किमया संत ज्ञानेश्‍वरांसारखा अस्सल प्रतिभावंतच करू शकतो असे म्हटले आहे.

नोकरीधंद्यानिमित्त गोव्याच्या सीमा ओलांडून गेलेले गोमंतकीय न चुकता गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूळ गावी येऊन कुटुंबाचा आनंद द्विगुणीत करतात. हेवेदावे विसरून भजनात-भोजनात सामील होतात. ज्यांना काही अपरिहार्य कारणामुळे विदेशातून देशात परत येता येत नाही, असे गोमंतकीय काय, किंवा शेष भारतातील भारतीय हिंदू काय, ते जेथे असतील तेथे गणेशपूजन करून आपल्या कुटुंबाबरोबरच इतरांनाही सामील करून घेतात.

परदेशात ज्या ज्या ठिकाणी गणेश मंदिरे किंवा गणपतीच्या विविध प्रकारच्या पुरातन मूर्ती आहेत, तेथे जाऊन हिंदू भाविक श्रीगणेशाचे दर्शन घेतात. इतरांना हा विश्‍वविनायक कसा भक्तांचा तारणहार आहे, याबाबत आस्थेने सांगतात व गणपतीच्या आरत्या म्हणून इतरांनाही त्या भक्तिरसात सामील करून घेतात.

देशातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात असला तरी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांत दिवाळीसारखा फार मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती सार्वजनिक ठिकाणी आणल्यानंतर या महाराष्ट्र व गोव्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण वाढले. त्यांचे पेवच फुटले, असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती ठरू नये. आपल्या जवळच्या कोकणातील वातावरण तर गणपतीच्या आगमनाने मंगलमय बनलेले आपणास दिसते. मुंबईतील चाकरमनी कोकणात गौरी गणपतीच्या सणाला न चुकता हजर राहतो. तेथे गौरी-गणपतीचा सण जणू प्रत्येक दिवसाचा आणि क्षणाचा मनमुराद आनंद घेऊनच मनोभावे आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

सर्व जातिधर्माच्या लोकांमध्ये भावनिक एकोपा निर्माण करणारा हा गणेशोत्सव तो आबाल-वृद्धांचे कल्याण करो. ज्यांची चांगली मनोकामना असेल ती पूर्ण करो आणि तो श्रीगणेश सर्वांना सुखकर होवो, हीच त्याच्या चरणाशी विनम्र प्रार्थना.