ती तिथेच उभी!

0
266

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे

बघायला तिथं जागाच नव्हती. गावातल्या नाक्यावरचा तो एक बसस्टॉप होता. कामावर जाताना मला दोन मुख्य नाके भेटत. पहिला – जिथे महाभयंकर गर्दी असायची. कुणाकडेही लक्ष द्यायचे भान पण राहत नसे. भराभरा गाड्या लागायच्या… धावत धावत लोक चढायचे. दुसर्‍या स्टॉपवर गर्दी नसायची. सकाळी जवळच्या कॉलेजची मुले, चाकरमानी, फॅक्टरीत काम करणारी माणसे, त्यांत मठ्ठ चेहर्‍याची दोन वयस्कर माणसे. दुपारच्या वेळेला ती नेहमीच असायची. छोटी मूर्ती, काळीसावळी, सलवार कमिजवाली, खाकेत पर्स टांगलेली. त्या मुलीचे वय बहुधा २० च्या दरम्यान असावे. ती तेवढी सुंदर नव्हती. तिचे डोळे बोलके होते. बोलताना डाव्या ओठाखालून एक दात नकळत झलक दाखवून जायचा. वजन ४० किलोच्या खाली असावे; पण ती तरतरीत होती.

तिला यायला उशीर झाला तर मग आमची चुकामूक व्हायची. तिची नेहमीची जागा रिकामी असायची. मलाही उगाचच काहीतरी खटकल्यासारखे वाटायचे. तिचे घर जवळपास कुठेतरी होते. जेवणाच्या बाबत ती चिमणी असावी. घरी लाडेलाडे घास भरवणारे बहुधा कुणी नसावे. तिच्यात वेगळे काहीही नव्हते; मग माझे लक्ष तिच्यावरच का जात होते? प्रश्‍नाला उत्तर नव्हते. तिचे एक वेगळेपण होते. स्टॉपवर आल्या आल्या तिचा मोबाइल तिच्या कानाला चिकटून बसलेला असायचा. ती त्यावर बोलतच राहायची. दहा-पंधरा मिनिटे ती त्या थांब्यावर थांबायची. मी माझी चारचाकी दूरवर उभी करून तिला चोरट्या नजरेने बघायचो.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे ती बोलत होती. शेजार्‍यांनाही तिचा आवाज ऐकू येत नव्हता. मोबाइलवर कुणी हळू आवाजात बोलायला लागला की समजावे काहीतरी भानगड आहे. दिवसेंदिवस संभाषण वाढत चालले होते. ती पण आजकाल थांब्यावर लवकर यायला लागली होती. म्हणजे कुणाबरोबर तरी तिला जास्त वेळ बोलायला आवडत होते. गुलुगुलु गोष्टी वाढत चाललेल्या. मला बरे वाटत होते. कुणाचे तरी कल्याण होणार म्हणायचे!
त्या दिवशी तर कडाक्याचे भांडण चालू होते. फोनवर हमरी-तुमरी चालू होती. आज स्टॉपवर तिच्या शेजारी पण कुणीही नव्हते. बोलणे मोठमोठ्याने चाललेले. तिचा चेहरा छोटासा, त्यात पडलेला… आणखीन छोटा झाला होता. तिचा चेहरा इतका कोमेजलेला की चंद्रकोरीपेक्षाही लहान झालेला. मला वाटले आता स्फोट होणार आणि तो झालाही. ती मुसमुसू रडायला लागली. डोळ्यांतून अश्रूंची धार लागलेली. बरे झाले, जवळपास कुणीही नव्हते. मी दूरवरून हे सगळे न्याहाळत होतो. तिच्या जवळ जाऊन तिचे अश्रू पुसण्याचे धाडस मात्र झाले नाही. बस थांब्यावर लागली. ती डोळे पुसत जड पावलांनी निघून गेली.
चार-पाच दिवसांनी ती दिसली. कोमेजलेली, बावरलेली होती. काळा सलवार वेश घालून आली होती. तिला ग्रहण लागले होते. प्रेमभंग झाला असावा कदाचित. उगाचच मनाला चटका बसला. आपण त्यात कशाला पडावे? माझे मन मला बजावत होते. पण ती कुणीतरी नक्कीच नव्हती. का? तर ती मला आवडायला लागली होती. आता फक्त दूरवरूनच मला तिला बघायची नव्हती. मला तिच्या जवळ जायचे होते. तिच्या जखमांवर फुंकर घालायला! पण तिने मला झिडकारले तर?
आज परत ती मला दिसली. चेहर्‍यावर लाली, पावडर, क्रिम सगळे काही लावलेले. जवळ जाताना अत्तराचा मनमोहक वास आला. चेहरा प्रफुल्लित… डोळे मोठाले… कुणाला तरी भरून घेतल्यागत. तिचा मोबाइल वाजला. कानाकडे हितगुज करता झाला. ती बोलतच होती. अधूनमधून ऐकत होती. तिचे परत एकदा जमत होते. तिच्या जीवनात कुणीतरी प्रवेश केलेला वाटत होता.
तिच्या घरचे ठीक भासत नव्हते. आई म्हातारी… दोन मोठे भाऊ… वडील वारलेले. घरचे सगळे हीच बघायची. मी मनोमन तिथल्या वाटाड्यासमोर हात जोडले. नवस बोलता झालो – तिचे जमवून टाक रे बाबा! आता त्या स्टॉपवर आल्याआल्या माझाही मोबाइल वाजत होता. समोर ती मोबाइलवर बोलताना दिसत होती.
आजही ती तिथे उभी होती. बरोबर एक तरुण मुलगा होता. तिच्या ओळखीचा… तिच्या केसात फुलांचा गजरा माळत होता. त्या मुलाचा चेहरा ओळखीचा वाटत होता. मलाही आज कसे शांत शांत वाटत होते. दूरवरून तिला आता मी केव्हाच पाहणार नव्हतो. ती माझी होणार होती. तो गजरा मीच तिच्याकरता आणला होता. आमचे दोघांचे ठरले होते. सगळेजण राजी होते. तिथल्या वाटाड्याचे मनोमन आभार मानले. त्याने तिचे जमवले होते.
आता तो थांबा… तिची ती नेहमीची जागा रिकामी झालेली असणार. पण आज तिथे कुणीतरी थांबलेली… गोरी गोमटी, लठ्ठ शरीराची, गाल लालेलाल… फुगीर… कानाला मोबाइल लावून ती कुणाबरोबर तरी बोलत होती.
थांब्यावरच्या नवीन मोबाइल प्रेमप्रकरणाची ही चाहूल तर नसेल…!!
……………