तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर

अखेर तिहेरी तलाक विधेयक काल राज्यसभेत संमत झाले. लोकसभेत हे विधेयक तीन वेळा संमत झाले होते. मात्र राज्यसभेत सत्ताधारी एनडीएला बहुमत नसल्याने तेथे त्याला मंजुरी मिळणे शक्य होत नव्हते. तथापि काल हे विधेयक मतदानास आले त्यावेळी विविध राजकीय पक्षांचे खासदार अनुपस्थित राहिल्याने राज्यसभेचे संख्याबळ तसेच बहुमतासाठीचे संख्याबळ घटले. परिणामी विधेयक ९९ वि. ८४ अशा फरकाने संमत झाले.

दरम्यान, विरोधकांनी विधेयकावरील मतदानाआधी ते छाननी समितीकडे पाठवण्याची मागणी सभापतींकडे केली. या मागणीवर मतदान घेण्यात आले त्यावेळी मागणीच्या बाजूने ८४ मते पडली व विरोधात १०० मते पडली. त्यामुळे ही मागणी फेटाळली गेली. त्यानंतर थोड्याच वेळात तिहेरी तलाक विधेयकावर मतदान होऊन ते संमत झाले.

शरद पवारही अनुपस्थित
जेडीयू, टीआरएस, बसप यांच्या खासदारांबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच नेते प्रफुल्ल पटेल हेही मतदानावेळी अनुपस्थित राहिले.
नीतिश कुमार यांच्या जनता दल युनायटेड व अद्रमुक या पक्षांनी मतदानावेळी सभात्याग केला. तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षानेही मतदानात भाग घेतला नाही. याचा फायदा सरकार पक्षाला विधेयक संमतीसाठी झाला. सर्वसाधारणपणे राज्यसभेत बहुमतासाठी १२१ सदस्यांची आवश्यकता असते. मात्र वरील पक्षांच्या कृतीमुळे बहुमतासाठी आवश्यक असलेली संख्या घटली. गेल्या गुरुवारी हे विधेयक लोकसभेत संमत झाले होते.

राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भाजपाने विधेयकाचे जोरदार समर्थन करताना हे विधेयक म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी तयार करण्यात आलेले विधेयक असल्याचा दावा केला.

ऐतिहासिक दिवस ः रवी शंकर
दरम्यान, केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. तसेच तिहेरी तलाक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत होणे ही भारताच्या परिवर्तनाची सुरुवात असल्याचा दावा करीत हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रसाद म्हणाले.

भारत आनंदोत्सव साजरा करतोय ः मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक विधेयक संसदेत संमत होण्यासाठी पाठिंबा दिलेल्या सर्व राजकीय पक्षांना एका ट्विटद्वारे धन्यवाद दिले आहेत. या घटनेमुळे एका मध्ययुगीन प्रथेला इतिहासाच्या कचरा टोपलीत फेकले गेले आहे, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे समाजातील स्त्री-पुरुष समानतेला बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत देश आज आनंदोत्सव साजरा करीत आहे, असे ते म्हणाले.