तिला न्याय द्या

पणजीतील येत्या विधानसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेर्रात यांच्यावरील बलात्काराच्या गंभीर आरोपावर अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच त्या प्रकरणातील तक्रारदार व प्रथम साक्षीदार असलेली पीडित मुलगी अचानक गायब होणे धक्कादायक आहे. येत्या तीन जूनला या कथित बलात्कार प्रकरणातील आरोपनिश्‍चितीबाबत निर्णय होणार असताना अचानक ही पीडिताच गायब होणे आणि तब्बल दहा दिवस त्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हाही नोंदवू नये ही बाब गंभीर आहे. बाबूश यांच्यावरील आरोपासंदर्भात न्यायालय योग्य तो न्याय करील, परंतु पीडित युवतीच्या अशा रीतीने बेपत्ता होण्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. हा खटला ज्या पायावर उभा राहणार होता, त्याचा पायाच यामुळे कमकुवत होण्याची भीती आहे. पहिली बाब म्हणजे दक्षिण गोव्यातील ज्या वसतिगृहातून ही मुलगी बेपत्ता झाली, त्याच्याशी संबंधित मंडळी स्वतःवरील जबाबदारी तर झटकत आहेतच, परंतु या पीडित मुलीच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न त्यांनी चालवलेला दिसतो. ‘तिला नाचायला, पार्ट्या करायला आवडायचे’, ‘मित्राबरोबर ती बाहेर भटकायची’, ‘कॉलेजचे निमित्त करून ती बाहेर भटकायला जायची’, अशी त्यांची जी बेजबाबदार विधाने विविध वर्तमानपत्रांतून तिच्यासंदर्भात प्रसिद्ध झाली आहेत त्याचा अर्थ काय? पीडितेलाच गुन्हेगार मानण्याचा आणि तिचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रकार आश्चर्यकारक आहे आणि दुर्दैवाने पोलिसांनीही हीच भूमिका घेतलेली दिसते आहे. सदर पीडितेवर कथित अत्याचार झाला, तेव्हा ती अवघ्या सोळा वर्षांची म्हणजेच अल्पवयीन होती. हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे. म्हणजे आता जेमतेम ती अठरा – एकोणीस वर्षांची असेल. तरीही तिच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्याचा या मंडळींना काय अधिकार? महिला हक्कांची बात करणार्‍या राज्यातील समस्त महिला संघटना आणि महिला कार्यकर्त्या आता कुठे आणि का झोपलेल्या आहेत बरे? सदर पीडितेने चार वेळा वसतिगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, दोन वेळा हातांच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे सांगितले जाते आहे. हे जर खरे असेल तर तिच्यासंदर्भात अधिक दक्षता घेणे अपेक्षित होते. एका महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रकरणातील ती साक्षीदार असल्याने तिच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची होती. गृह खात्याने तिच्या सुरक्षेसाठी त्या वसतिगृहामध्ये पहारा ठेवणे अपेक्षित होते. परंतु पहारा तर दूरच, उलट आता ती कुठल्या वसतिगृहात वास्तव्याला होती तेही काही अतिउत्साही मंडळींनी उघड केल्याने तिच्या जिवालाच धोका निर्माण झाला आहे. ती फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम करीत होती आणि तिला सैद्धान्तिक विषयात चांगले गुण मिळाले होते. मात्र, प्रात्यक्षिकांना जाण्यास ती तयार नव्हती, त्यामुळे तिला पुढच्या वर्षात प्रवेश मिळाला नव्हता असे सांगितले जाते आहे. आपल्या सोबतच्या मुलींना पुढच्या वर्षात प्रवेश मिळाला, परंतु आपल्याला प्रवेश न मिळाल्यानेच ती तणावाखाली होती असे पोलिसांच्या वतीने सांगितले गेल्याचे वाचनात येते आहे. हा शुद्ध बनाव आहे. या निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा कशी काय आली? कोणत्या आधारावर आली? सदर पीडित मुलीला पूर्वी ‘अपना घर’ सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले होते. या ‘अपना घर’ची बदकीर्ती सर्वज्ञात आहे. काही काळापूर्वी काही गुन्हेगारी टोळ्या याच अपना घरातील अल्पवयीन मुलांना रात्री हळूच बाहेर काढून चोर्‍या करायला लावायच्या आणि नंतर परत आणून सोडायच्या असे उघडकीस आले होते. ‘अपना घर’मधून मुलांच्या पलायनाचे सत्र तर सतत घडत असते. असेही एकही वर्ष गेलेले नाही, जेव्हा या ‘अपना घरा’तील मुले पळून गेलेली नाहीत. त्यामुळे मुळात अपना घर आणि तेथील एकूण वातावरण याचाच कसून तपास होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी या पीडितेला तेथून अन्यत्र हलवण्यात आले होते, परंतु तरीही ती अपना घरमध्ये का परतू पाहात होती हेही तपासले गेले पाहिजे. या मुलीने सध्याच्या वसतिगृहातून स्वखुशीने पलायन केले की तिला पळवून नेले गेले आहे, स्वखुशीने ती निघून गेली असेल तर त्यामागची कारणे काय, तिच्यावर त्यासाठी कोणी दडपण आणले होते का, कोणाचा दबाव होता का, याचा पोलिसांनी कसून तपास करणे अपेक्षित आहे. ती मुलगी वसतिगृहातून बेपत्ता झाल्याच्या दुसर्‍या दिवशी पोलिसांना याची माहिती जर वसतिगृहाच्या संचालकांकडून दिली गेली होती, तर प्रत्यक्ष गुन्हा नोंदवण्यास एवढा काळ का गेला याचेही आता गृह खात्याने स्पष्टीकरण द्यावे. सन्माननीय न्यायालयानेही याची स्वेच्छा दखल घेणे अपेक्षित आहे. पणजीची पोटनिवडणूक सध्या तोंडावर असल्याने या सार्‍या प्रकरणाला राजकीय रंग चढेल, परंतु हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि गंभीर आहे. एका कोवळ्या मुलीच्या जीविताशी आणि भवितव्याशी निगडित हा प्रश्न आहे. त्यामुळे तिचा विनाविलंब शोध घेऊन न्याय मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य ठरते.