ब्रेकिंग न्यूज़
ताळगाव पंचायतीवर पुन्हा बाबुश मोन्सेर्रात गटाचे वर्चस्व

ताळगाव पंचायतीवर पुन्हा बाबुश मोन्सेर्रात गटाचे वर्चस्व

ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात आणि माजी मंत्री बाबुश मोन्सेर्रात यांच्या ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेेंट फ्रंटने ताळगाव पंचायतीच्या सर्व अकरा जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

ताळगाव पंचायतीच्या १० प्रभागांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या मतदानातील मतमोजणी कांपाल, पणजी येथील बालभवनाच्या आवारात काल झाली.
प्रभाग १ मध्ये रेघा पै (६७.६३ टक्के), प्रभाग २ मध्ये तेरेझा बार्रेटो (७८.४० टक्के), प्रभाग ४ महादेव कुंकळ्ळीकर (५४.५३ टक्के), प्रभाग ५ सरस्वती मुळगावकर (५२.६३ टक्के), प्रभाग ६ इस्टेला डिसोझा (६७.५० टक्के), प्रभाग ७ जानू रुझारियो (७१.६५ टक्के), प्रभाग ८ मध्ये मारिया फर्नांडिस (७८.०८ टक्के), प्रभाग ९ मध्ये रघुवीर कुंकळ्ळीकर (६७.११ टक्के), प्रभाग १० मध्ये संतोष चोपडेकर (५८.५६ टक्के) आणि प्रभाग ११ मधून सिडनी बार्रेटो (६४.८३ टक्के) मते घेऊन विजयी झाले. प्रभाग ३ मधून आग्नलो दा कुन्हा हे बिनविरोध निवडून आले आहेत.

पंचायतीच्या सरपंचपदी आग्नलो दा कुन्हा आणि उपसरपंचपदी रेघा पै यांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती माजी मंत्री मोन्सेर्रात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मतदारांच्या विश्वासाच्या जोरावर फ्रंटचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. मतदारांच्या विश्वासाला तडा जाणारी कृती पंचायत मंडळाकडून केली जाणार नाही. पंचायत क्षेत्रातील विकास कामावर भर दिला जाणार आहे. पंचायतीमधील विजयाचे श्रेय आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांचे आहे, असे माजी मंत्री मोन्सेर्रात यांनी सांगितले.
ताळगाव पंचायत क्षेत्रातील पाणी, रस्ते या सारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मतदारसंघातील काही भागातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. ताळगाव पंचायत क्षेत्र शेवटच्या टोकाला असल्याने पाण्याची समस्या जाणवत आहे, असे आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांनी सांगितले.
ताळगाव पठारावर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कचरा विल्हेवाट ही मोठी समस्या भेडसावत आहे. सर्व पंच सदस्यांना विश्‍वासात घेऊन कार्य केले जाणार आहे, असे आग्नलो कुन्हा यांनी सांगितले.