तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च!

– प्रा. रमेश सप्रे

‘अंते मतिः सा गतिः|’ म्हणजे शेवटच्या श्‍वासाच्या वेळी किंवा जीवनाच्या अखेरच्या क्षणी मनात जो विचार, जो संकल्प, जी चिंता, जी वासना असेल त्यानुसार त्या मनुष्याला पुढची गती मिळते. पुढचा जन्म कोणता हे ठरतं. अर्थात् पुनर्जन्म मानणार्‍यांसाठी हा विचार महत्त्वाचा आहे. पण जे पुनर्जन्म मानत नाहीत त्यांच्यासाठीही खूप मार्गदर्शन अन् समुपदेशन (गाइडन्स अँड कौन्सेलिंग) गीतेत आहे.

विशेष म्हणजे पुनर्जन्मावर ज्यांचा विश्‍वास आहे त्यांच्यासाठी मृत्यूचा क्षण महत्त्वाचा सांगितलाय. तर ज्यांचा फक्त जन्मावर विश्‍वास आहे त्यांना जीवनावर लक्ष केंद्रित करायला सांगितलंय. मृत्यू व जीवन हे तसे परस्परपूरकच आहे. हे सर्वांत चांगलं दिसून येतं ते भागवतातील परीक्षिताच्या उदाहरणात. आजपासून सातव्या दिवशी आपण ऋषींच्या शापानुसार सर्पदंशानं मरणार हे ज्यावेळी त्याला कळलं तेव्हा त्याला आनंदच झाला. आजूबाजूला उपस्थित असलेल्या मंडळींना याचं आश्‍चर्य वाटलं कारण त्यांना मृत्यूची वार्ताच काय मृत्यू हा शब्दसुद्धा भयकारक वाटत होता. पण परीक्षितानं सर्वांना विचारलं, ‘कोणत्या आधारावर तुमच्यापैकी कोणीही आपण येणारे सात दिवस जगणार असं सांगू शकेल?’ खरंच! मृत्यू ही अकस्मात् घडून येणारी अटळ गोष्ट आहे असा अनेकांचा अनुभव असतो. अगदी आजारी पडून क्षणाक्षणानं संपणार्‍या जीवनाचासुद्धा निश्चित कोणत्या क्षणी अंत होणार (कोणता श्‍वास निश्चितपणे अखेरचा असणार) हे सांगता येत नाही. आपण सात दिवस मरणार नाही अन् आठव्या दिवशी जिवंत असणार नाही एवढंच नव्हे तर कोणत्या प्रकारानं (सर्पदंशानं) आपण मरणार याची परीक्षिताला कल्पना होती. मृत्यूचा क्षण समजला पण तोपर्यंतचा सप्ताह कसा घालवायचा – याचा परीक्षितानं केलेला विचार त्याला मुक्ती मिळवून देणारा ठरला. शुकदेवांच्या मुखातून भागवताची अमृतकथा परीक्षितासह अनेकांना ऐकायला मिळाली. ‘भागवत सप्ताहा’त मृत्यूच्या दारात असताना मुक्ती मिळवून द्यायचं सामर्थ्य आहे याचा अनेकांना प्रत्यय आला.
या संदर्भात एक श्‍लोक पाहण्यासारखा आहे-
वासना यत्र यस्य स्यात् स नम् स्वप्नेषु पश्यति |
स्वप्नवन्मरणे ज्ञेयं वासना तु वपुः नृणाम् ॥
म्हणजे- ज्या मनुष्याची जशी वासना असते त्या वासनेनुरूप त्याला स्वप्न पडते. स्वप्नाप्रमाणेच मृत्यू होतो अर्थात् वासनेनुसार अंतकाळी चिंतन होते (अंते मतिः) आणि या चिंतनानुसार मनुष्याला पुढचा जन्म प्राप्त होतो-(वपुः नृणाम्).
इथं एक विचार महत्त्वाचा आहे – ‘ध्यानी मनी ते स्वप्नी अन् स्वप्नी ते जीवनी!’ रोजची गाढ झोप ही मृत्यूची रंगीत तालीम (रिहर्सल) असते असं म्हटलं जातं. आपला अनुभवही तसाच असतो. रोज झोपताना असा क्षण येतो जेव्हा आपण जागे असतो अन् पुढच्या क्षणी आपल्याला झोप लागते. तो जागेपणीचा अखेरचा क्षण पकडायला शिकलं पाहिजे. त्या क्षणी भगवंताचं नाम किंवा एखादा जीवनाच्या दृष्टीनं शुभ विचार मनात ठेवायला जमलं पाहिजे. म्हणजे त्याचा प्रभाव दुसर्‍या दिवशी उठल्यानंतर लगेच दिसायला लागतो. सरोजिनी नायडूंसारखी एखादी कवयत्री आपली अर्धी राहिलेली कविता मनात घोळवत शांतपणे झोपते. सकाळी उठल्यावर ती कविता तिच्याकडून सलग पूर्ण होते. त्याचप्रमाणे एखादा रामानुजन्‌सारखा गणिती आपली न सुटलेली गणितं मनात सोडवत झोपला तर उठल्यावर ती गणितं सुटण्याची शक्यता अधिक असते.
ही उदाहरणं अर्थातच व्यावहारिक आहेत. पण मृत्यू जर माझ्या अस्तित्वाचा शेवट नसेल.. मृत्यूनंतर जन्म, जन्मानंतर मृत्यू (पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्) ही परंपरा सुरू राहणार असेल, या जन्मातल्या अखेरच्या श्‍वासाच्या वेळी असलेला विचार, वासना वा कल्पना पुढील जन्मासाठी किंवा मुक्तीपर्यंत चालू राहिलेल्या प्रवासासाठी उपयुक्त ठरते.
हे सहचिंतन आपण गीतेच्या चौकटीत करतोय. पण ज्यांचा पुनर्जन्मासारख्या कल्पनेवर विश्‍वास नाही. त्यांच्यासाठी -सुद्धा यात समुपदेशन आहे हे पुनःपुन्हा लक्षात घ्यायला हवं. पुढे तर भगवंतानं मृत्यूच्या क्षणी आजुबाजूचं वातावरण कसं असावं हेही सांगितलंय ते तर उत्तम रूपक आहे. ती काही तिथी-वार-नक्षत्र-दिवस-रात्र-उत्तरायण-दक्षिणायन अशी भौगोलिक वा पंचांगातील परिस्थिती अर्थातच नाही. कारण यादृष्टीनं विचार केला तर अनेक साधुसंत, महात्मे-सत्पुरुष यांना मुक्ती न मिळता पुढचा जन्म घ्यावा लागला असेल असंच सिद्ध होईल. पण हा विषय आपण पुढे भगवंतांच्या शब्दातच पाहणार आहोत. असो.
पू. गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात एक उद्बोधक प्रसंग आहे. ते स्वतः ‘सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर’ हा भगवंताचा आदेश पाळत होते. त्यामुळे अखंड भगवंताशी जोडलेलं राहिल्याने ते ‘जीवनमुक्तं’च होते. पण त्यांच्या आईची अवस्था एवढी उच्च नव्हती. कितीही झालं तरी ती एक गृहिणी होती. ज्यावेळी ती श्रीमहाराजांबरोबर काशीयात्रेला निघाली तेव्हा तिनं अगदी निघण्याच्या क्षणी काही शेजारी राहणार्‍या स्त्रियांच्या कानात घराची काळजी घेण्याबद्दल सांगितलं. श्रीमहाराजांच्या हे लक्षात आलं व ते तिथं निरोप देण्यासाठी जमलेल्या पुरुषांच्या कानात काहीतरी कुजबुजले. क्षणात काही मंडळी घरात घुसली नि दिसेल ती वस्तू आपल्याबरोबर घेऊन निघाली. थोड्याच वेळात सर्व घर रिकामं झालं. त्यावर श्रीमहाराज आपल्या आईला म्हणाले, ‘आता निघायचं ना? कशातही जीव अडकण्याची, घराविषयी व आतल्या सामानाविषयी काही इच्छा, वासना असण्याचं काही कारणच नाही. ‘अंतकालेच माम् स्मरन् मुक्त्वा कलेवरम्’ असं आदर्श मरण आईला आलं. अत्यंत समाधानानं त्यांनी श्रीरामजन्मस्थान अयोध्येला आपला शेवटचा श्‍वास घेतला. त्यावेळी त्यांच्या मनात निश्चितच श्रीरामाचं स्मरण असेल.
यासाठी ‘वासुदेवः सर्वम्’ हा भाव जिवंत व ज्वलंत हवा. सर्वस्थळी – काळी – कृतीत जर हा भाव टिकला तर जिवंतपणीच मुक्तीचा सोहळा व मृत्यूचा उत्सव साजरा करता येईल. अनेक साधुसंतांनी, महापुरुषांनी असा धन्य करणारा मृत्यू जगाला ‘जगून’ दाखवलाय. जीवनाचा अंतिम क्षण कळत नाही मग प्रत्येक क्षण अंतिम मानून जगण्यात शहाणपण नाही का? त्याचप्रमाणे प्रत्येक श्‍वास अखेरचा समजणं यातही शहाणपणा आहे. म्हणून भगवंताचं सांगणं अगदी स्पष्ट आहे –
तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च|
मयि अर्पित मनोबुद्धिः माम् एव एष्यसि असंशयम्‌॥
बर्‍याच गोष्टी सांगून झाल्यावर एखादा महत्त्वाचा सिद्धांत सांगायचा असेल तर भगवंत ‘तस्मात्’ शब्द वापरतात. ‘तस्मात्’चा अर्थ आहे ‘म्हणून (देअरफोर्)’ – ज्ञानेश्‍वर म्हणतात- ‘म्हणौनि’! इथं कोणतं महत्त्वाचं सूत्र किंवा सिद्धांत सांगितलाय?
१. तस्मात् सर्वेषु कालेषु ः ‘म्हणून सर्वकाळी, सदासर्वदा सदैव’ या शब्दाचा अर्थ महत्त्वाचा आहे. ‘सर्व काळी’ म्हटल्यावर ‘सर्व स्थळी’ ओघानं आलंच. कारण कोणत्याही काळात आपण कोणत्या तरी स्थळात (जागेत) असतोच अन् कोणत्याही जागी असताना कोणतातरी काळ चालू असतोच ना? स्थळकाळाचा उल्लेख आला की आपल्या बाजूच्या सजीव-निर्जीव वस्तू, पशु-पक्षी-वनस्पती व व्यक्ती आल्याच. त्याचबरोबर कोणतीतरी कृती विश्‍वातला प्रत्येक जण किंवा प्रत्येक कण करत असतोच. शिवाय या सार्‍यातूनच जगातील व जीवनातील सार्‍या घटना तसेच प्रसंग घडत असतात.
याचा अर्थ उघड आहे. परमेश्‍वराचं स्मरण निरंतर, अखंड, अक्षय सुरू ठेवलं पाहिजे. परमेश्वराचं स्मरण म्हणजे आपल्या अंतरात्म्याचं – आपल्या आतल्या सद्गुणांचं – सत्कृतींचं, चांगल्या स्वभावाचं, सर्वांचं कल्याण करणार्‍या वृत्तीचं स्मरण! म्हणजेच चांगलं वागणं, आपल्या कर्तव्यांचं पालन करणं, आदर्श नागरिक म्हणून सर्व जबाबदार्‍या पूर्ण करणं यालाच ईश्‍वराचं स्मरण, ईश्‍वराशी संपर्क किंवा संबंध किंवा ईश्‍वरप्रेमाचे – भक्तीचे – संस्कार. याला विरोध असायचं कारण नाही. देवावर विश्‍वास नसणारा माणूस जर असं सर्व दृष्टींनी आदर्श वर्तन करत असेल तर आपण त्याला देवमाणूस-देवाचा माणूस म्हणतोच ना? त्याचप्रमाणे ‘जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला’ अशी आपली श्रद्धा असतेच. भावार्थांत म्हणायचं झालं तर यालाच सर्वकाळी परमेश्‍वर स्मरण असं म्हणता येईल.
२. माम् अनुस्मर ः- ‘अनु’ या उपसर्गाचा(प्रिफिक्स) अर्थ आहे पुनःपुन्हा, निरंतर, सतत. भगवंतानं गीतेत ‘अनु’चा उपयोग अनेक क्रियांच्या – कृतींच्या संदर्भात सरळसरळ ‘माझं अखंड स्मरण कर’ असं अर्जुनाला सांगताहेत. गीतेत मी-मला-माझं-माझ्यासाठी-माझ्यापासून असे शब्दप्रयोग भगवंतानं वारंवार केलेयत. हा अहंकार नाही का? – एरवी सर्वांना उपदेश करताना मी-मला-माझं-माझंच (आय्-मी-माय-माइन्) असे उल्लेख टाळायला सांगितलं जातं कारण त्यात अहंभाव(इगो) व्यक्त होतो. कारण समाजात, विविध संस्थात अनेक व्यक्ती असतात त्यांच्या परस्परक्रिया होत असतात. अशा स्थितीत ‘मी-मला’ म्हटलं की ‘तू-तुला; तो-त्याला; ती-तिला किंवा आम्ही-आम्हाला’ असे शब्दप्रयोग होणारच. यातून प्रत्येकाचा अहंभाव (समर्थ रामदासांचा शब्द अधिक प्रभावी आहे-अहंकृती’) अशा प्रसंगातून ‘तू तू – मैं मैं’ अशी संघर्षमय परिस्थिती निर्माण होणार. याऐवजी ‘मी नाही तूच’; ‘मला नको तुला’ असा भाव असेल तर समरसता – सौहार्द – सामंजस्य म्हणजेच मिळूनमिसळून राहणं, मैत्रीच्या धाग्यांनी बांधलं जाणं नि सर्वांनी एकमेकाला समजून घेणं असं खेळीमेळीचं वातावरण निर्माण होईल. सारे गुण्यागोविंदानं राहतील.
३. युध्य च – सर्वकाळी माझं स्मरण कर. माझ्याशी जोडलेला (युक्त) रहा. असं सांगताना ‘सर्वेषु कालेषु युध्य च’ असं भगवंताला सुचवायचं नाहीये. पण खर पाहिलं तर सदासर्वदा युद्धाचा प्रसंग अनेक आघाड्यांवर असतोच. यासाठीच तर तुकोबांसारखे संत म्हणतात- ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जग आणि मन|’ याचा अर्थ आपण सतत युद्धजन्य परिस्थितीत असतो. जगात, समाजात, आपण काम करतो त्या ठिकाणी, इतकंच काय पण आपल्या छोट्या-मोठ्या कुटुंबात किंवा परिवारातही संवादापेक्षा संघर्षच अधिक असतो. स्वयंपाकघरात जवळजवळ ठेवलेल्या भांड्यांना दुसरं भांडं लागतंच ना तसंच दोन व्यक्तींचं भांडण होतंच होतं. यालाच युद्धासारखी परिस्थिती म्हटली तर अशा सर्व प्रसंगी ‘माम् अनुस्मर’ म्हणजे ईश्‍वराचं स्मरण ठेवा. देवाला जोडलेले रहा. देवासारखं जगा.
हे म्हणायला सोपं आहे पण जगायला अवघड आहे. हे जमण्यासाठी उपायही भगवंत सांगताहेत.
४. मयि अर्पित मनोबुद्धिः ः- गीतेत अनेक ठिकाणी हा विचार आलाय. मन व बुद्धी भगवंताला अर्पण करायची. एरवी वस्तू अर्पण केली तरी आपण वस्तूपासून वेगळे असतो. स्वतःचा देह अर्पण केला तरी आपल्या भावना-विचार-कल्पना देहापासून वेगळ्या असतात. ज्यावेळी आपण मन व बुद्धी अर्पण करतो तेव्हा आपण पूर्णपणे स्वतःला अर्पण करत असतो. ‘सर्वस्व’ समर्पण करण्याची भाषा अनेकदा आपण वापरतो. पण जोपर्यंत आपला ‘स्व’ म्हणजेच मन-बुद्धी-अहंकार अर्पण करत नाही तोपर्यंत आपलं समर्पण पूर्ण नाही. कारण आपण ‘सर्व’ दिलं पण ‘स्व’ अर्पण केला नाही तर दिलेल्या ‘सर्व’ (घरदार, संपत्ती, मुलंबाळं इ.) गोष्टींचा भगवंताला काय उपयोग? कारण मुळात ते भगवंताचंच असतं ना? पण आपला ‘स्व’ मात्र आपण परमेश्वरापासून दूर, वेगळं ‘झाल्यानंच तर तयार होतो तो अर्पण करणं महत्त्वाचं. यालाच म्हटलंय ‘मयि अर्पित मनोबुद्धिः’
५. माम् एव एष्यसि असंशयम् ः- याचा अर्थ असं जर तू केलंस – म्हणजे सर्वकाळी माझे स्मरण – जीवनात व जीवनातील सर्व संघर्षप्रसंगी माझ्याशी अखंड जोडलेला राहिलास तर तू माझ्यातच येऊन राहशील (माम् एव एष्यसि) आणि यात काहीही संशय नाही.
‘जयाने सदा वास नामात केला|’ ‘मना सज्जना राघवी (किंवा सज्जनी) वस्ति कीजे’- यात हाच अर्थ आहे. भगवंत असंही सांगतात – ‘मच्चित्ता मद्गतप्राणा’ म्हणजे तुझा प्रत्येक श्‍वास माझं नाम घेण्यातच जाऊ दे. यामुळेच तुझा वास माझ्यात होईल. सदैव माझ्या स्मरणात रहा.
भागवतात एक अंतर्मुख करणारा हृद्य प्रसंग आहे. उद्धव गोपींना म्हणतो, ‘मी तुमच्यासाठी कृष्णाचं पत्र (निरोप) आणलंय. ते मन लावून ऐका’. यावर गोपी हसून उद्धवाला विचारतात – ‘दहावीस असती का रे मने उद्धवा! एक मात्र होते ते मी दिले माधवा॥ भगवंताला (कृष्णाला) मन अर्पण केल्यामुळे गोपी उन्मनी अवस्थेत अखंड आनंदात असतात – देहभान हरवलेल्या अवस्थेत असतात. देवर्षि नारद उगीचच म्हणत नाहीत- ‘यथा व्रजगोपिकानाम्’|
………………………………………….

Leave a Reply