ब्रेकिंग न्यूज़
तळीत बुडून ३ मुलांचा दुर्दैवी अंत

तळीत बुडून ३ मुलांचा दुर्दैवी अंत

>> नागेशी येथे देवस्थानच्या तळीत दुर्घटना

>> बुडालेली मुले मंगळूर – कर्नाटकातील

नागेशी येथील नागेश देवस्थानच्या समोर असलेल्या तळीत काल बुधवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ३ मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अदिती वेंकटेश भट (१२), भुवनेश्वर वेंकटेश भट (८) व श्रावण होला (७) अशी बुडून अंत झालेल्या मुलांची नावे आहेत. मृत झालेली तिन्ही मुले मंगळूर – कर्नाटक येथील असून कुटुंबीयांसोबत ती देवदर्शन घेण्यासाठी गोव्यात मंगळवारी दाखल झाली होती. या दुर्घटनेमुळे नागेशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काल संध्याकाळी नागेश देवाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व मुले देवस्थानाच्या आवारात खेळत होती. त्यावेळी अचानक वारा सुटल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. त्याचवेळी नजर चुकल्याने तिन्ही मुले जवळील तळीत कोसळल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी तळीत बुडालेल्या तिन्ही मुलांना बाहेर काढून उपजिल्हा इस्पितळात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत जाहीर केले.

प्रदीप भट हे आपल्या विवाहित दोन मुली व त्यांच्या मुलांसह मंगळवारी रेल्वेने गोव्यात आले होते. काल बुधवारी संध्याकाळी नागेश देवस्थानात दर्शन घेण्यासाठी आले असता सदर घटना घडली. मृत झालेली अदिती भट (आठवी), भुवनेश्वर भट (चौथी) व श्रावण होला (दुसरी) च्या वर्गात शिकत होते. अदिती व भुवनेश्वर भट ही दोघेजण भाऊ – बहीण असून श्रावण होला हा त्यांचा मावसभाऊ होता.
फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी घटनेचा पंचनामा केला असून आज सकाळी गोमेकॉत तिन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.

मृतांत भाऊ-बहीण आणि मावसभाऊ

नागेशी येथे तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू पावलेल्या मुलांपैकी अदिती भट व भुवनेश्‍वर भेट ही दोघे भाऊ-बहीण तर श्रावण होला हा त्यांचा मावसभाऊ होता. नागेश देवाचे दर्शन घेतल्यानंतर काळाने त्यांच्यावर घाला घातला. देवदर्शनानंतर मुले देवस्थानच्या आवारात आनंदाने बागडत होती. इतक्यात सोसाट्याचा वारा सुटला. त्यामुळे ती घाबरून मिळेल त्या बाजूने धावत सुटली आणि परिसराची माहिती नसल्याने नकळत तळ्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.