तर चीनला जशास तसे प्रत्युत्तर ः मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोर्‍यात झालेल्या घटनेबाबत बोलताना चीनला आम्हाला डिवचले तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ अशा इशारा दिला आहे. शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली देताना पंतप्रधानांनी वरील इशारा दिला. भारताला शांतता हवी आहे पण वेळ आल्यास भारत उत्तर देण्यात सक्षम असल्याचे मोदी म्हणाले.
भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असा विश्वास मला देशवासीयांना द्यायचा आहे. आपल्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका नाही. पण वेळ आल्यावर भारत उत्तर देण्यात सक्षम असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

जवानांचा त्याग विसरणार नाही ः राजनाथ सिंग
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत बोलताना, गलवान खोर्‍यातील जवानांचे शहीद होणे हे अत्यंत अस्वस्थ करणारे व वेदनादायी आहे. आपल्या जवानांनी सीमेवर कर्तव्य बजावताना अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवत, देशासाठी बलिदान दिले. त्यांचे शौर्य व त्याग देश कधीच विसरणार नाही, असे म्हटले आहे.

१९ रोजी सर्वपक्षीय बैठक
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये गलवाण खोर्‍यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ रोजी संध्याकाळी ५ वा. सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.