तरुण सैनिकांच्या अतुलनीय शौर्याच्या कहाण्या ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस – २’

तरुण सैनिकांच्या अतुलनीय शौर्याच्या कहाण्या ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस – २’

एडिटर्स चॉइस

  • परेश प्रभू

भारतीय सैन्यदलांमध्ये असे अगणित जॉंबाज असतील, ज्यांच्या कहाण्या कधी समाजापर्यंत कदाचित येणारही नाहीत. त्यांच्या आजूबाजूच्या सहकार्‍यांमध्ये त्या चर्चिल्या जातील आणि कालांतराने विस्मृतीतही जातील. परंतु ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस – २’ सारखे असे एखादे पुस्तक येते तेव्हा या कहाण्या त्यातून अजरामर होतील.

‘‘जेव्हा तुम्ही घरी जाल, तेव्हा त्यांना आमच्याविषयी सांगा, आणि सांगा की तुमच्या ‘उद्या‘साठी आम्ही आमचा ‘आज’ दिला आहे…
द्रासमधील ‘कारगिल विजय स्मारका’च्या प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूस हा भावपूर्ण संदेश लिहिलेला आहे. ज्या परिसरात प्रत्यक्ष युद्ध लढले गेले, तेथेच उभारण्यात आलेले कारगिलच्या विजयाचे हे स्मारक आणि तेथील दालनांतील चीजवस्तू पाहून जेव्हा या मुख्य द्वारातून बाहेर पडतो, तेव्हा हा संदेश वाचताना खरोखरच आपले डोळे पाणावलेले असतात..

भारतीय सैन्यदलांच्या शौर्यगाथा ह्या काही कविकल्पना नव्हेत. प्रत्यक्षात रणांगणावरच्या शौर्याच्या ह्या गाथा असतात. देशासाठी त्यात हसत हसत दिलेली बलिदाने असतात, सर्वस्वाचा होम केलेला असतो. दुर्दैवाने भारतीय सैन्यदलांच्या या पराक्रमाच्या परंपरेचे नित्य जीवनामध्ये आपल्याला अनेकदा विस्मरण होत असते. एखादी मोठी घटना घडून गेली की आपल्या देशप्रेमाला ऊत येतो, परंतु शांततेच्या काळामध्ये तिन्ही सैन्यदलांच्या या बलिदानाची जाणीव क्वचितच ठेवली जाते.
हे सगळे सांगण्यास कारण ठरले आहे ते म्हणजे पेंग्वीन इंडियाने प्रकाशित केलेले ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस – २’ हे नवे कोरे पुस्तक. सन २०१६ मध्ये जेव्हा आपल्या जवानांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले, तेव्हा ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस’ चा पहिला भाग प्रकाशित झाला होता. त्यावेळी तो सर्जिकल स्ट्राइक आणि इतर पराक्रमाच्या कहाण्या शिव अरुर आणि राहुल सिंग यांनी त्यात संकलित केलेल्या होत्या. ते पुस्तक खूप गाजले, कारण प्रत्यक्ष तो पराक्रम करणार्‍या वीरांच्या तोंडून त्या कहाण्या त्यामध्ये शब्दांकित करण्यात आलेल्या होत्या.
आता पुन्हा एकदा शिव अरुर आणि राहुल सिंग या पुस्तकाचा दुसरा भाग घेऊन आले आहेत, असीम शौर्याच्या नव्या कहाण्यांसोबत. यावेळी या पुस्तकाला पार्श्वभूमी आहे ती बालाकोटच्या कारवाईची. त्या कारवाईच्या खिळवून ठेवणार्‍या तपशीलाने या पुस्तकाची अत्यंत वेधक सुरूवात होते. पुस्तकाच्या प्रारंभिक भागात दिलेले, कारगिलचा योद्धा व परमवीर चक्र विजेता कॅप्टन विक्रम बात्राचे उद्गार, ‘‘एक तर मी तिरंगा फडकावून येईन नाही तर तिरंग्यात लपेटून येईन, पण परत येईन हे मात्र नक्की’’ आपल्याला दोन क्षण स्तब्ध करतात. आणि मग सुरू होतात अतुलनीय शौर्याच्या खर्‍याखुर्‍या कहाण्या. कोणताही अभिनिवेश नाही, कोणतीही दर्पोक्ती नाही; जे घडले, जसे घडले, तसे सांगणार्‍या या सत्य कहाण्या प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी झालेल्यांच्या वा त्यांच्या सहकार्‍यांच्या तोंडून शब्दांकित करण्यात आलेल्या असल्याने त्या प्रत्यक्ष ऐकत असल्यागत आपण त्यात मनाने गुंतत जातो हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

भारतीय जवानांच्या प्रखर मनोबलाची चुणूक या कहाण्यांतून आपल्याला घडते. आपल्याला युद्धामध्ये तैनात केले जाणे हेच कोणत्याही सैनिकाचे स्वप्न असते. त्यासाठीच तर आयुष्यभर खडतर प्रशिक्षण घेतलेले असते अशी भावना जोपासणार्‍यांच्या पराक्रमाला मग सीमा ती कोणती? उभय लेखक म्हणतात त्याप्रमाणे, प्रत्येक सैनिकापाशी सांगण्यासारखी काही ना काही कहाणी असतेच असते!
बालाकोटची कारवाई, त्यानंतर पाकिस्तानच्या हवाई पाठलागाला भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी दिलेले साहसी प्रत्युत्तर ही सगळी कहाणी पुस्तकाच्या सुरवातीलाच आपल्याला खिळवून ठेवते. या मोहिमेची सगळीच माहिती अजूनही उघड झालेली नाही. काही अजूनही गोपनीय ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे काही तपशिलाच्या बाबतीत अजूनही धूसरता आहे, परंतु ‘शेवटी लक्षात राहील तो दाट अंधारामध्ये तरुण वैमानिकांनी पत्करलेला धोका’ असे लेखक म्हणतात ते पटल्याविना राहात नाही.

प्राणघातक दहशतवादी कारवायांशी नित्य मुकाबला करीत आज शेकडो जवान काश्मीरमध्ये तैनात आहेत. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनिशी कुख्यात दहशतवादी जेथे दिवसाही घनदाट अंधार असतो, अशा सफरचंदांच्या मैलोन्‌मैल पसरलेल्या बागांमध्ये दडलेेले असतात. त्यांना शोधणे दुरापास्त असते. परंतु असे असतानाही स्वतः दहशतवाद्यांना सामील होत असल्याचे सांगत आणि ‘इफ्तिकार भट’ या नावाने त्यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्यातला एक होऊन त्यांचा खात्मा करणार्‍या मेजर मोहित शर्माची कहाणी सुरवातीलाच आपल्याला थक्क करून सोडते. अबू तोरारा व अबू सबझार या कुख्यात दहशतवाद्यांना त्यांच्या अड्‌ड्यात घुसून ठार मारण्याच्या त्याच्या या पराक्रमाला खरोखर तोड नाही.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी रोज ज्या चकमकी झडत असतात, त्याविषयी आपण नेहमी ऐकत असतो. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही ती म्हणजे या दहशतवाद्यांशी लढणारे, त्यांना कंठस्नान घालणारे आणि प्रसंगी स्वतःही शहीद होणारे जवान हे बर्‍याचदा कोवळे तरुण असतात. त्यांचे अख्खे आयुष्य समोर उभे असते. घरी पत्नी असते, छोटे मूल असते. वृद्ध आई बाप असतात. अशा वेळी या तरुणाच्या मृत्यूने त्यांच्या घरी, कुटुंबात काय आकांत माजत असेल याची कल्पनाही आपण कधी करीत नाही. दक्षिण काश्मीरमधील चकमकींच्या बातम्या आम्हा पत्रकारांच्या तर एवढ्या अंगवळणी पडल्या आहेत की क्रिकेटचा स्कोअर द्यावा तशा प्रकारे या कारवायांच्या बातम्या आणि मृतांची आकडेवारी दिली जात असते. परंतु ही एकेक चकमक म्हणजे खरे तर एकेक कहाणी असते. ती चित्तथरारक असतेच, पण त्यात सहभागी होणार्‍या जवानांसाठी प्राणघातकही असते.

कोठे तरी दडून बसलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध झडणारी अशी प्रत्येक चकमक ही आधी प्रयत्नपूर्वक मिळवलेली गुप्तचर माहिती, अत्यंत काटेकोरपणे केलेले पूर्वनियोजन यांच्या बळावरच पार पाडली जात असते. स्थानिक नागरिक, पोलीस यंत्रणा, त्यांचे खबरे यांच्या भरवशावर या मोहिमा पार पाडल्या जातात. त्यात मारल्या जाणार्‍या दहशतवाद्यांच्या नावानिशी बातम्या दिल्या जातात, परंतु त्या चकमकीमध्ये शौर्य गाजवणार्‍या आणि स्वतःच्या जिवाची बाजी लावणार्‍या जवानांची नावे मात्र कधीच जनतेसमोर येत नाहीत. ही नावे उघड होतात फक्त एकदाच. त्यांना हौतात्म्य मिळाले तरच. ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस -२’ मध्ये काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकींची चक्षुर्वैसत्यम कहाणी आपल्याला वाचायला मिळते.
प्रत्यक्ष या चकमकींमध्ये आपल्या तरण्याबांड जवानांनी गाजवलेल्या गाजवलेल्या भीमपराक्रमाची गाथा प्रत्यक्ष तेथे हजर असलेल्या त्यांच्या सहकार्‍यांकडून ऐकताना तो थरार आपल्याही रोमरोमांत भिनल्यावाचून राहात नाही.

‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस-२’ मधील अशीच एक कहाणी आह,े ओसामा जुंगी आणि मेहबुब भाई या कुख्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीची. यातला ओसामा म्हणजे लष्कर ए तोयबा व ‘जमात उद दावा’चा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार हाफीज सईदच्या मेहुण्याचा मुलगा. आपल्या कुुटुंबातील एखादी व्यक्ती मारली जाते तेव्हा त्याचे दुःख काय असते याची जाणीव हाफीज सईदसारख्या खाटकाला करून देणार्‍या त्या चकमकीत भारतीय लष्कराच्या ‘गरूड’ कमांडोंनी ज्योतिप्रकाश निराला यांच्या नेतृत्वाखाली गाजवलेला पराक्रम वाचताना आपणही थरारून जातो. चकमकीच्या शेवटी या ज्योतिप्रकाशच्या डोक्यात गोळी लागते, परंतु त्याच्या हातातली हलकी मशीनगन तरीही गोळ्यांचा वर्षाव करण्याचे थांबवत नाही. दहशतवाद्यांचा खात्मा करूनच ती विसावा घेते.

अशा शौर्याच्या, पराक्रमाच्या अनेक कहाण्या. वाचावे तेवढे थरारून जावे अशा. गुरेझ सेक्टरमधल्या किशनगंगेतून भारतीय हद्दीत घुसणार्‍या घुसखोरांविरुद्धच्या चकमकीत मारल्या गेलेल्या लेफ्टनंट नवदीपसिंगचे उदाहरण घ्या. त्याचे लग्न ठरलेले असते. मोबाईलवर आपल्या भावी पत्नीशी तो बोलत असतानाच त्याला त्याच्या वरिष्ठाचा सांगावा येतो की घुसखोरांविरुद्ध मोहीम हाती घ्यायची आहे. मागचा पुढचा विचार न करता बोलणे अर्ध्यावर टाकून तो त्या मोहिमेत सामील होतो. मारला जातो. त्याचा वरिष्ठ अधिकारी मग त्याच्या शौर्याची कहाणी सांगताना म्हणतो, आपण त्याला अर्ध्या बोलण्यातून बोलावून घेतले होते. देव जाणे त्याचे त्याच्या मैत्रिणीशी काय बोलायचे कायमचे राहिले असेल! तरणाताठा नवदीप शेवटी तिरंग्यात लपेटून त्याच्या पंजाबातील गुरदासपूर जिल्ह्यातील घरी पाठवला जातो. पिता सुभेदार जोगिंदरसिंग जेव्हा आपल्या आयुष्याची काठी असलेल्या या तरुण मुलाची तिरंग्यात लपेटून आलेली शवपेटी पाहतात तेव्हा सोबतच्या त्याच्या सहकार्‍यांना विचारतात, ‘‘मेरा बेटा लडा ना? अच्छे से लडा ना? कितने आतंकवादी मारे उसने?’’ लष्करातील शौर्याची परंपरा ही अशी पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली असते.

अशा अनेक कहाण्या. थरारून टाकणार्‍या. सैन्यदलांप्रतीचा आदर वाढवणार्‍या. केवळ काश्मीरमधल्या नव्हेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या परिस्थितीत गाजवलेल्या शौर्याच्या या कहाण्या आहेत. त्यात कीर्तीचक्र विजेते मेजर डेव्हीड मनलून आहेत, आयएनएस सिंधुरक्षकवरील स्फोटानंतर लागलेल्या आगीतून सहकार्‍यांना वाचवणारे लेफ्टनंट कमांडर कपीश मुवाल आणि लेफ्टनंट मनोरंजनकुमार आहेत, लेफ्टनंट कमांडर फिरदौज मुगल, शौर्यचक्र विजेता कॅप्टन प्रदीप शौरी आर्य, मेजर सतीश दहिया… अशा अनेक कहाण्या मुळातूनच वाचल्या पाहिजेत.

काश्मीरमधील पाम्पौरच्या उद्योजकता विकास केंद्रावरील हल्ला आपल्या स्मरणात असेल. शेवटी तेथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ती संपूर्ण बहुमजली इमारत जाळून उद्ध्वस्त करावी लागली होती. त्या मोहिमेत लढलेला कॅप्टन पवनकुमार. स्वतः जबर जखमी झाला असताना, रक्ताच्या थारोळ्यात असताना आपल्या वरिष्ठाला सांगतो, ‘‘बंदे है अंदर सर, और बंदे है..’’ त्याला त्याचे जखमी शरीर साथ देत नसते, पण त्याला अजून लढायचे असते. खरे तर त्याने आपल्या शौर्याच्या बळावर सहकार्‍यांना त्या इमारतीच्या आत जाण्यासाठी आवश्यक असलेले पहिले ठिकाण गाठून दिलेले असते, ज्याच्या बळावर पुढे त्याचे सहकारी त्या दहशतवाद्यांचा खात्मा करतात, परंतु ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ ची विजीगीषू वृत्ती या तरुण मुलांमध्ये येते कुठून?
भारतीय सैन्यदलांमध्ये असे अगणित जॉंबाज असतील, ज्यांच्या कहाण्या कधी समाजापर्यंत कदाचित येणारही नाहीत. त्यांच्या आजूबाजूच्या सहकार्‍यांमध्ये त्या चर्चिल्या जातील आणि कालांतराने विस्मृतीतही जातील. परंतु ‘इंडियाज् मोस्ट फिअरलेस – २’ सारखे असे एखादे पुस्तक येते तेव्हा या कहाण्या त्यातून अजरामर होतील. म्हणूनच अशी पुस्तके फुकट नव्हे, विकत घेऊन वाचली पाहिजेत. नव्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजेत. समाजापर्यंत जातील. कुणी सांगावे, या शौर्यगाथा वाचून त्यापासून प्रेरणा घेऊन नवे पवनकुमार घडतील, नवदीप घडतील…!