ड्रग्समध्ये गुंतलेल्यांची गय नाही ः मुख्यमंत्री

अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्यांची सरकार गय करणार नसल्याचे काल गुहमंत्री प्रमोद सावंत यानी विधानसभेत सांगितले. ‘झिरो टॉलरन्स टू ड्रग्ज’ हे आमच्या सरकारचे धोरण असल्याचे सांगताना गोव्याच्या पर्यटनासाठी आम्हाला अमली पदार्थांची गरज नाही, असेही सावंत यांनी सांगितले.

काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी हा प्रश्‍न विचारला होता. यावेळी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा म्हणाले की गोव्यातील युवक समुद्र किनारे, निर्जन डोंगर अशा ठिकाणी जाऊन अमली पदार्थांचे सेवन करीत असतात. त्यासंबंधी पोलिसात तक्रार करूनही पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

रेजिनाल्ड यांच्या आरोपाचे
मुख्यमंत्र्यांकडून खंडन
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी यावेळी अमली पदार्थ गोव्यातील महाविद्यालयांतही पोचले असल्याचा आरोप केला. मात्र, प्रमोद सावंत यानी ह्या आरोपाचे खंडन केले. कोणत्या महाविद्यालयात अमली पदार्थ मिळतात ते सांगावे, असे रेजिनाल्ड याना सांगितले. उगीच पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करू नका, असा सल्लाही सावंत यांनी रेजिनाल्ड यांना दिला. हणजुण येथील किनार्‍यावरील शॅक्समध्ये अमली पदार्थांची उघडपणे विक्री होत असते, अशी माहितीही रेजिनाल्ड यानी यावेळी दिली.
वेर्णे येथे अमली पदार्थांची तपासणी करणारी एक प्रयोगशाळा आहे. मात्र, तेथे सर्व अमली पदार्थांची तपासणी करण्याची सोय नसल्याचे यावेळी रेजिनाल्ड यानी नजरेस आणून दिले.

त्यावर बोलताना सावंत यानी पुढील महिनाभरात या प्रयोगशाळेचा दर्जा वाढवण्यात येणार असून त्यानंतर तेथे सर्व अमली पदार्थांची तपासणी करण्याची सोय होणार असल्याचे सांगितले.

ड्रग्सबाबत २९०० गुन्हे नोंद
मात्र, हा आरोप फेटाळून लावताना सावंत म्हणाले की, पोलीस अमली पदार्थांचा व्यवसाय करणार्‍यांवर कडक कारवाई करतात. अमली पदार्थांशी संबंधित २९०० गुन्ह्यांची पोलिसांनी नोंद केली असल्याची माहितीही त्यानी यावेळी दिली.