ब्रेकिंग न्यूज़

ड्रग्ज व्यवहारात गुंतलेल्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी मागविली

>> कठोर पावले उचलणार : मुख्यमंत्री

अमली पदार्थ व्यवहार प्रकरणी सरकारने गंभीर पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला असून जे कोण या अनैतिक व बेकायदेशीर धंद्यात गुंतलेले आहेत त्यांच्या नावांची यादी तयार करून ती उद्यापर्यंत (शनिवार) आपणाकडे पाठवण्याचा आदेश अमली पदार्थविरोधी पोलिसांना दिला आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या प्रकरणी आपण अमली पदार्थविरोधी पोलीस विभागाच्या अधीक्षकांशी सविस्तरपणे चर्चा केली असून त्यांना या प्रकरणी विनाविलंब पावले उचलण्याची सचूना केली असल्याचे सावंत यांनी सांगितले. अमली पदार्थ व्यवहारात मोठ्या प्रमाणात गोमंतकीय आहेत हे वृत्त खरे नव्हे. काही लोक बेकायदेशीरपणे हा धंदा करीत आहेत हे नाकारता येणार नाही. अशा लोकांवर कारवाई करता यावी, यासाठी त्यांच्या नावांची यादी तयार करून ती आपणाकडे पाठवण्याची सूचना आपण अमली पदार्थविरोधी पोलिसांना केली असल्याचे सावंत म्हणाले. दरम्यान, अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.