ड्युमिनीच्या आयपीएल संघात केवळ दोन भारतीय

 

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जेपी ड्युमिनी याने आपला सर्वोत्तम ‘आयपीएल ऑल टाईम इलेव्हन’ संघ निवडला आहे. विशेष म्हणजे या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आयपीएलमधील सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विंडीजचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो व स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत सातत्यपूर्ण खेळाडू म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुरेश रैनाला स्थान दिलेले नाही. आयपीएलमध्ये असलेला ७ भारतीय व ४ विदेशी हा नियमही त्याने लावलेला नाही.

ड्युमिनीने आपल्या संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे. ड्युमिनीने संघात सलामीवीर फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल व डेक्कन चार्जर्सला २००९ला चॅम्पियन बनवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट यांना स्थान दिले आहे.
तर तिसर्‍या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, चौथ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला घेतले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा एबी डीव्हिलियर्सला पाचव्या स्थानावर तर सहाव्या आणि सातव्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट राईडर्सचे अष्टपैलू कायरन पोलार्ड व आंद्रे रसेल यांना स्थान दिले आहे. या व्यतिरिक्त ब्रेट ली आणि ललिथ मलिंगा हे दोन जलदगती गोलंदाज तर इम्रान ताहीर आणि मुथय्या मुरलीधरन या दोन फिरकी गोलंदाजाना ड्युमिनीने आपल्या संघात निवडले आहे. त्याने विराट कोहलीला या संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे.

ड्युमिनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला आहे. त्याने दिल्ली संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे. आयपीएल कारकिर्दीत ८३ सामन्यात १२४.०२ च्या सरासरीने त्याने २०२९ धावा केल्या आहेत. याचबरोबर २३ बळी देखील त्याने घेतल्या आहेत.