डोकेदुखी

डोकेदुखी

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
डोकेदुखी म्हणजे एक महाभयंकर प्रकरण! एकदा डोकेदुखी सुरू झाली की मग त्या माणसापासून दूरच रहायला हवे. कारण तो त्यावेळी काय बोलेल सांगता सोय नाही! बघा, विचार करून सांगा. डोके दुखल्यावर आम्ही पहिल्या प्रथम काय करतो?… हो, साधे उत्तर… गोळ्या खातो! कोणत्या गोळ्या खातो?… ऍस्पिरीन, ऍनासीन, ऍस्प्रो, कोल्डारीन, विक्स ऍक्शन ५०० वगैरे.. हो ना, मग ऐका. तुम्ही जर वर दिलेल्या गोळ्या खाल्ल्या तर डोकेदुखी बंद होईलच.. पण डोकेदुखीवरची गोळी पोट फाडून टाकील! वाटले आश्‍चर्य?… तुम्हाला माहीत असेल हृदयाचे रोग असणारे, मधुमेही ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे त्यांना पुढे हृदयरोग वाढू नये किंवा अटॅक येऊ नये म्हणून ऍस्पिरीनची ७५ एम्‌जीची गोळी देतात. तुम्हीही घेत असणार. त्या गोळ्या आता डॉक्टरलोक खाऊ नका म्हणून सल्ला देतात. कारण त्या ७५ एमजीच्या ऍस्पिरीनच्या गोळीने शौचामध्ये रक्त पडायला लागले म्हणे. उलटीतून रक्त पडायला सुरुवात झाली. मग ३०० एमजीची ऍस्पिरीन तुम्ही घेणार तर मग काय होऊ शकते? तेव्हा डोकेदुखीवर गोळी घेताना त्याचे लेबल वाचा. ऍस्पिरीन असेल तर गोळी घेऊ नका. डोकेदुखी अंगाशी येईल!तर मंडळी डोकेदुखी सुरू झाल्यावर दुसरे आम्ही काय करतो? सरळ डोळे तपासणी करण्यासाठी डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो. सहजासहजी डोकेदुखी आल्यावर त्या डॉक्टरकडे जायचे नाही. कां? ते मी सांगणारच आहे. पण डोळ्याच्या डॉक्टरकडे गेल्यावर डोळे तपासून झाल्यावर त्यांचे डोळे चकाकतात… सगळे काही ठिक आहे असे त्यांना जाणवते. पण तरीही डोक्यावर ताण वाढलाय असे सांगत, ते झिरोचा चष्मा तुम्हांला देतात. पण तो वापरून डोकेदुखी काही थांबत नाही. तेव्हा तो साहजिकच एमबीबीएस डॉक्टरांकडे येतो.
डोकेदुखी कोणत्या आजारांत होते व ती का होते?
१) डोक्यावर मानसिक ताण असेल तर!
२) थंडी-पडसे झाल्यावर!
३) मलेरिया, टायफॉइड, व्हायरल फिवर, सायनस व इतर ताप.
४) मेंदूचे वेगवेगळे आजार
५) डोळ्यांचे विकार
६) रक्तवाहिन्यांचे विकार
७) हिस्टेरिया
८) मेंदूचे ट्युमर
९) रक्तदाब
१०) फेफरे (फिट्‌स)
११) डोक्याची इजा
१२) मायग्रेन
– वेगवेगळ्या तापामुळे डोकेदुखी होऊ शकते व हेच डोकेदुखीचे प्रमुख कारण आहे.
– त्यानंतर सायनसचे वेगवेगळे विकार, त्यात वायरल फिवर, नाक, कान, घसा या अवयवांचे आजार.
– मायग्रेनची डोकेदुखी तर त्यानंतर तिसर्‍या नंबरवर येते.
– मग डोक्याचे विकार चौथ्या क्रमांकावर येतात. त्यानंतर वर दिलेल्या कारणांमुळे डोके दुखू लागते. मेंदू हा डोक्यातील महत्त्वाचा भाग व तो अवयव मेंदूत असलेल्या पाण्यात लोंबकळत असतो. काही कारणाने त्या मेंदूवर दाब वाढतो तेव्हा डोकेदुखी सुरू होते. तेव्हा सांभाळा. डोकेदुखी सामान्य असते व ती भयंकरही ठरू शकते.
रात्री झोप येत नसेल तर; दिवसभर डोक्यावर ताण जास्त झाल असेल तर; पित्ताच्या विकारानेही डोके जड होते. तेव्हा डोके दुखत असेल तर काय कराल. दोन दिवस गोळी घेतली तर चालेल. गोळी घ्यायची असेल तर पॅरासेटामॉल घ्यावी. भरलेल्या पोटावरच गोळी किंवा गोळ्या घ्याव्या. उपाशीपोटी गोळी घेतली तर ती सरळ उदराच्या कातडीवर जाऊन बसेल व ती विरघळण्या अगोदर त्या कातडीला जाळेल.
डोकेदुखीबरोबर आणखी काही होते का?
– प्रामुख्याने डोकेदुखीबरोबर ताप येणे ठरलेले असते व ते तापाच्या प्रत्येक रोगावेळी असतेच.
– डोकेदुखीबरोबर उलटी येणे ही जास्त शक्यता. म्हणजेच ताप, उलटी ही डोकेदुखीबरोबर सदैव असणारी लक्षणे असतात. तेव्हा ह्या गोष्टी प्रामुख्याने आम्हांला सायनस इन्फेक्शन झाले तर दिसून येते. मलेरिया, डेंग्यु, टायफॉइड व बाकीच्या तापाचे आजार यात दिसून येतात. वाड्यावर जर व्हायरल फीवर असेल तर प्रत्येक घरातला एक एक करून सगळेच झोपायला सुरूवात होते. ही व्हायरलची सुरवात आहे. तरीही ताप दोन दिवसानंतर उतरला नसेल तर रक्ततपासणी करणे गरजेचे आहे.
डोकेदुखीबरोबर ताप व उलटी जर साथीला असेल तर सावधान! रोग्याला ऍडमीटच करावे लागेल. लवकरात लवकर रक्त तपासून घ्यावे लागेल जेणेकरून फाल्सीफारम मलेरियाची लागण झालेली दिसेल. रोगी जर मूल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर रोग्याला मोठ्या इस्पितळात नेणे गरजेचे ठरेल. नाही तर रोगी एक-दीड दिवसांत दगावू शकतो.
व्हायरल फीवरमध्ये आपल्याला जास्त लोकांना डोकेदुखी दिसते. तुम्हांला असे आढळून येईल की तो रोगी सांगेल – डॉक्टरसाहेब, खरेच हो मला थंडी पडसे कधीच होत नाही. एवढेच काय माझे नाकही गळत नाही. डॉक्टर जेव्हा तपासणी करतात तेव्हा त्यांना कळते की त्याला सर्दी पडसे झालेले आहे; पण नाक गळत नाही कारण गळण्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत. तेव्हा ह्या रोग्यामध्ये डोकेदुखी मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते.
ज्याचे सर्दी पडशात नाक गळते… तेव्हा म्हणावे, बरे झाले! डोकेदुखी या रोगात बिल्कुल दिसणार नाही!
रक्तदाब वाढल्याने डोकेदुखी होते. रुग्ण आल्याबरोबर त्यांचा रक्तदाब तपासून बघतात. तेव्हा रक्तदाबावर औषधे घेणार्‍या रोग्यांना जर डोकेदुखी झाली तर लगेचच वाढलेला रक्तदाब हे एक कारण असू शकते व त्यावर उपाययोजना लवकरात लवकर व्हायला पाहिजे. नाहीतर वाढलेल्या रक्तदाबामुळे रक्तवाहिनी तुटते व लकवा मारतो- शरीराची एक बाजू अपंग होते. काळजी घ्या, लवकरात लवकर डॉक्टरी सल्ला घ्या. स्वत:ला अपंगत्वापासून वाचवा.

माणसाला जर वाचायला बरोबर दिसत नसेल किंवा दूरवरचे बरोबर दिसत नसेल तर डोळ्यांवर ताण येऊन डोकेदुखी येणार! तेव्हा पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरांना दाखवा, मगच तो सांगेल तेथे चला.
मायग्रेनची डोकेदुखी सर्रास आपल्याला आढळून येते. डोक्यातील रक्तवाहिन्या आकुंचित होतात, त्यांत रक्तप्रवाह बरोबर होत नाही. केव्हा झोप बरोबर लागत नाही. मनावर ताण असतो, त्याने डोके दुखत राहते. पुष्कळ महिन्यांच्या डोकेदुखीवर परीक्षा होणे गरजेचे आहे.
डोकेदुखीवर तुम्ही काय तपासण्या करणार ?
१) रक्त तपासणी… तापाचे निदान करणे व त्यावर उपचार
२) रक्तदाबाची तपासणी
३) डोक्याचा एक्स-रे
३) मानेचा एक्स-रे
५) डोळे तपासणी
६) डोक्याचे स्कॅनिंग
७) डोक्यातील रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफी
८) डोक्यातील – मेंदुतल्या ट्युमरचे निदान लवकरात लवकर व्हायला हवे.
९) मेंदुतील ट्युमरचे निदान स्कॅनिंगने होते.
डोकेदुखीवरचे निदान निश्‍चित झाल्यावर त्यावर उपाययोजना केल्यानंतरच रोग्याची डोकेदुखीपासून सुटका होणार हे निश्‍चित.
आजकाल काहीही रोग नसला तरीही डोकेदुखी ही होते. त्याला कितीतरी मानसिक कारणे आहेत. आजच्या जीवनातील धाकधुक, पैशांची ओढाताण, संसाराचा गाडा ओढता ओढता झालेली दमछाक कितीतरी कारणे आपल्याला दिसून येतात. सायनसमधली अर्धशिशी डोकेदुखी ही तर प्रत्येक जण जाणतो. डोकेदुखीवर, कपाळावर घट्ट दोरी बांधून, सुटका मिळवू पाहणारे व मग ती कपाळावर पडलेली मोठी आठी लक्ष वेधून घेते.
तर मंडळी डोके दुखते ना… लिंबुने शेकून घेतले, बाम, विक्स लावले, मिठ-मिरी चोळले, लेप लावले, गोळ्या खाल्ल्या ना भरपूर… आता तरी डॉक्टरकडे चला, सल्ला घ्या. स्वत:ला वाचवा. डोकेदुखी तुम्हांला मारूही शकते.