डॉ. प्रेमानंद रामाणी यांना गोमंत विभूषण पुरस्कार जाहीर

जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांना २०१८ चा गोमंत विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आल्तिनो, पणजी येथील मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गोमंत विभूषण पुरस्कार निवड समितीची बैठक काल झाल्यानंतर डॉ. रामाणी यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

या पुरस्कारासाठी ६ जणांनी अर्ज केले होते. या सर्व अर्जांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्यानंतर जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. रामाणी यांना २०१८ चा गोमंत विभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्काराचे वितरण सप्टेंबर महिन्यात एका खास कार्यक्रमात केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्य सरकारने आत्तापर्यंत अनिल काकोडकर, चार्ल्स कुरय्या, डॉ. रघुनाथ माशेलकर, लेम्बर्ट मास्कारेन्हस, लक्ष्मण पै यांना गोमंत भूषण पुरस्कार प्रदान केले आहेत. डॉ. प्रेमानंद रामाणी हे जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन असून त्यांना राज्य पातळीवर ५, राष्ट्रीय पातळीवर ५ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ९ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ. रामाणी मूळचे गोमंतकीय असून दरवर्षी मोफत आरोग्य शिबिर व इतर कार्यक्रमांचे आयोजन करतात. ५ लाखांचा धनादेश व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. रामाणी यांच्याबरोबर या पुरस्कारासाठी तिमोतीन फर्नांडिस, रवींद्र आमोणकर, गोमंतकीय गायिका लोर्ना, पं. सोमनाथ च्यारी, गजानन प्रभुगावकर यांनी अर्ज सादर केले होते, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.