डॉ. अब्दुल कलाम ः विज्ञानयोगी ते राष्ट्रपती

  •  शंभू भाऊ बांदेकर

२०२५चा भारत कसा असेल याचे चित्र डॉ. कलाम यांच्यासमोर असे व यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू होते. कर्मयोग्यासारखे वावरलेले डॉ. अब्दुल कलाम यांची जीवनगाथा २७ जुलै २०१५ रोजी समाप्त झाली. त्यांच्या कार्यास मनापासून सलाम!!

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे विद्यार्थीवर्गापासून ते संशोधकांपर्यंत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून इच्छित मार्गाकडे वाटचाल करणार्‍या तरुणांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांसाठी एक आदर्श असे व्यक्तिमत्त्व होते. कारण विद्यार्थी, शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती या सार्‍या पायर्‍या त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून ओलांडल्या. हे करताना त्यांनी आपला प्रखर देशाभिमान, पारदर्शी विज्ञानवाद आणि विवेक, संयम, सौहार्द यांना कुठेही तडा जाऊ दिला नाही. उलट ज्यांनी ज्यांनी त्यांच्याकडे सहकार्याच्या अपेक्षेने पाहिले, त्यांच्यासाठी अत्यंत निरपेक्ष वृत्तीने त्यांनी अखेरपर्यंत सहकार्याचा हात पुढे केला. त्यांचे बालपण, शिक्षण, संशोधन ते राष्ट्रपतीपदापर्यंतची एकूण कारकीर्द आपण पाहिली तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नावाचा हा मानव खर्‍या अर्थाने कर्मयोगी होता याची खात्री आपल्याला पटते.

अबुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी एका गरीब तामीळ मुस्लीम कुटुंबात झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे होडीतून रामेश्‍वर ते धनुष्कोटी या जलमार्गावर प्रवाशांना न्यायचं व आणायचं. त्यांचे वडील जैनुलाबदिन व आई आशिअम्मा हे जोडपे जुन्या वळणाचे होते. घरच्या गरीब परिस्थितीमुळे या दाम्पत्याच्या मुलांना लहानपणापासूनच काम करून चरितार्थ सुरळीत चालावा म्हणून हातभार लावावा लागे. त्यात अब्दुल कलाम यांच्या वाट्याला वर्तमानपत्राचे रद्दीचे गठ्ठे एका ठिकाणाहून दुसरीकडे व तेही डोक्यावर घेऊन जायचे काम करावे लागले होते. पण अंगीकारलेले काम कुठल्याही प्रकारची कुरबुर न करता ते करत. कारण कुठलेही काम प्रामाणिकपणे करावे ही त्यांच्या कुटुंबाची शिकवण होती व पडेल ते काम निष्ठेने करायचे, कारण आपल्याला शिकायचे आहे, खूप शिकायचे आहे, मोठे व्हायचे आहे याची खूणगाठ त्यांनी बालपणीच बांधली होती.

शालेय पातळीवर ते एक चांगले विद्यार्थी म्हणून शिक्षकवर्गात प्रिय होते, पण काम करून शिक्षण घेत असल्यामुळे ते सुरुवातीच्या काळात एक हुशार विद्यार्थी म्हणून चमकले नाहीत. पण त्यांच्यात एक वाखाणण्यासारखी गोष्ट होती ती म्हणजे गणित हा त्यांच्या आवडीचा विषय बनला होता व इतर विषयांपेक्षा ते गणितातच जास्त रस घेऊ लागले होते. त्यांच्या शिक्षकांच्या लक्षात ही गोष्ट यायला वेळ लागला नाही. शिक्षकवर्गाने अब्दुल कलाम याचा ध्यास सार्थ ठरावा म्हणून त्याला प्रोत्साहन दिले. का कोण जाणे, पण छोट्या अब्दुल कलामला, आपली ही गणिताची ओढच आपल्याला भविष्याची दिशा दाखवील असा विश्‍वास वाटू लागला व या सार्थ विश्‍वासापोटी गणित विषयाचा ध्यास हा जणू त्याचा श्‍वास बनला व भावी काळात त्यांची देदीप्यमान कामगिरी पाहून असंख्यांचे श्‍वास रोखले गेले व अब्दुल कलाम हे केवळ भारताचेच नव्हे, तर जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ ठरले.

ज्याप्रमाणे न्यूटन, आईनस्टाइन यांनी जगात आपल्या संशोधनाने आपला असा एक आगळा वेगळा ठसा उमटविला. आपल्या देशातील डॉ. होमी भाभा किंवा विक्रम साराभाई आदींनी विज्ञानाशी समरस होऊन, एकरूप होऊन आपली वैज्ञानिक विद्वत्ता समोर आणली व वैज्ञानिक म्हणून ते तळपले. त्याचप्रमाणे डॉ. अब्दुल कलाम यांनीही आपल्या संशोधनात मोलाची भर घालून देशातील पहिले विज्ञानयोगी राष्ट्रपती बनण्याचा बहुमान पटकावला व केवळ आपल्या देशापुढेच नव्हे, तर जगापुढे एक नवा आदर्श ठेवला- अहर्निश व एकनिष्ठ कर्माचे फळ कसे गोड असते याची जाणीव करून दिली. कारण डॉक्टर अब्दुल कलाम हे विसाव्या नि एकविसाव्या शतकातील विज्ञान संशोधन क्षेत्रातील श्रेष्ठ शास्त्रज्ञ असल्याची पावती जगाने त्यांना दिली.

शास्त्रज्ञ म्हणून ते नावाजल्यानंतर व राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. कलाम यांचे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, विद्यार्थ्यांना बोलते करणे अतिशय मनस्वी असायचे. त्यामुळे डॉ. कलाम म्हणजे एक व्यक्ती नसून एक फार मोठी महत्त्वाची संस्था आहे, असे वाटायचे. व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली तरी त्याने उभ्या केलेल्या कार्याच्या आधारावर संस्था टिकून राहते. आज डॉ. कलाम आमच्यात नसले तरी त्यांनी दिलेला संदेश, त्यांनी उभारलेले कार्य यामुळे ते अमर व अभ्यासूंची आमरण प्रेरकशक्ती बनून राहतील, यात शंका नाही.

विज्ञानक्षेत्राची महती जाणून असल्यामुळे डॉ. कलाम यांना देश तांत्रिकदृष्ट्या सक्षम असण्याचे महत्त्व फारच चांगले माहीत होते. त्यामुळेच आपला देश तंत्रसंपन्न होणे, या सक्षमतेला अनुरूप धोरणे राबवणे याबाबत त्यांनी वेळोवेळी आग्रह धरला. आपल्या राष्ट्रपती या अत्यंत महत्त्वपूर्ण पदाचा वापर त्यांनी यासाठी सातत्याने केला. आपला देश सक्षम झाल्यास अन्य कोणत्याही देशाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही, असा त्यांचा विश्‍वास होता व संबंधितांना हा विश्‍वास देत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले होते.

राष्ट्रपतीपद हे केवळ भव्य-दिव्य शोभेसाठी नसते तर देशाला सर्वांगीण उन्नतीकडे नेण्याची, देशवासीयांत आपण सुखी आहोत, सुरक्षित आहोत ही भावना दृढ करण्याचे ते साधन आहे, अशी त्यांची मनोधारणा होती. आपल्याला माहीत आहे की राष्ट्रपती सहसा जनता-जनार्दनात मिसळत नसतात. परंतु डॉ. कलाम यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तर ते आपला सर्व प्रकारचा मोठेपणा, दिमाख, शिष्टाचार हे सारे विसरून त्यांच्यातीलच एक बनत.

२०२५ मधील भारत कसा असेल याचे चित्र डॉ. कलाम यांच्यासमोर असे व यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू होते. ते केवळ संशोधनक्षेत्रच नव्हे, तर ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, समाज विकास, उद्योगधंदे याबाबत मूलभूत विचार करत व त्यांच्या योग्य कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करत. राष्ट्रपतीपदावरून पायउतार झाल्यानंतरही त्यांचे दौरे, भाषणं आणि विविध परिषदांमधून केलेल्या मार्गदर्शनातून हे आपल्या लक्षात येते.

कर्मयोग्यासारखे वावरलेल्या डॉ. अब्दुल कलाम यांची जीवनगाथा २७ जुलै २०१५ रोजी समाप्त झाली. त्यांच्या कार्यास त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनापासून सलाम!!