ब्रेकिंग न्यूज़

‘डॉक्टर्स डे’

  • मानसी म. बांदोडकर

डॉक्टर म्हणजे पृथ्वीतलावरचा दुसरा परमेश्‍वरच आहे. कारण परमेश्‍वराला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव कोणाच्या ना कोणाच्याही रूपाने आपल्याला सतत जाणवत राहते. पण जो डॉक्टर आपल्याला आजारातून बरे करतो, आपल्याला पुन्हा एक नवीन आयुष्य जगण्यास नवे बळ देतो, आपल्या वेदना तात्काळ कमी करण्यास मदत करतो… तो डॉक्टर म्हणजे प्रत्यक्ष परमेश्‍वरासमानच वाटतो. या डॉक्टरला आपण प्रत्यक्ष अनुभवतो. रुग्णासाठी, रुग्णाला लवकर बरे वाटावे म्हणून तो करत असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आपण बघत असतो. कधीतरी रुग्ण खूप गंभीर अवस्थेत असला की आपण डॉक्टरला म्हणतो, ‘‘डॉक्टर, काहीही करा पण रुग्णाला वाचवा’’.. तेव्हा सगळे डॉक्टर्स एक महत्त्वाचे वाक्य बोलतात… ‘‘माझ्या परीने मी सगळे प्रयत्न करीन. बाकी सगळे त्या परमेश्‍वराच्या हातात!’’ बस्स! या एवढ्या सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याजोग्या शब्दांमुळे रुग्णाच्या नातेवाईकांना कितीतरी दिलासा मिळतो. धैर्य मिळते. आत्मविश्‍वास मिळतो. आणि रुग्ण जेव्हा पूर्णपणे बरा होतो तेव्हा आपण डॉक्टरांना म्हणतो, ‘‘तुम्ही खरोखरच देवासारखे धावून आलात,’’
क्वचित कधीतरी डॉक्टरांनी प्रयत्न करूनही एखादा रुग्ण काही कारणास्तव दगावला तर त्याच डॉक्टरला नावे ठेवायला आपण मागे-पुढे पाहात नाही. खरं म्हणजे डॉक्टरही तुमच्या-आमच्यासारखा माणूसच ना! त्यालाही रुग्णाचे, रुग्णाच्या नातेवाईकांचे भले-बुरे अनुभव येतच असणार… याचा आपण कधी विचार करतो का?

डॉ. सुनंदा आमोणकर
डॉ. सुनंदा आमोणकर या नावाजलेल्या डॉक्टर आहेत. त्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. मला आलेला त्यांच्याबद्दलचा अनुभव…
एकदा त्यांना रुग्णाला तपासत असताना एक फोन आला. त्यांनी रुग्णाला तपासून झाल्यावर तो कॉल अटेंड केला व त्या फोनवर बोलत होत्या. विषय काय होता मला माहीत नाही पण… त्या म्हणत होत्या, ‘‘रूल तो रूल आणि तो सगळ्यांना सारखाच असतो’’. एवढ्या मोठ्या डॉक्टर असून त्या आपल्या पेशाशी खूप प्रामाणिक आणि दक्ष व कर्तव्यनिष्ठ अशा डॉक्टर आहेत. त्यांच्या नावाचा दराराच एवढा आहे. रुग्णासाठी तर त्या देवासारख्याच आहेत. चेहर्‍याने त्या जरी कठोर वाटत असल्या तरी मनाने त्या खूप खूप चांगल्या, मनमिळावू आहेत. गोवा मेडिकल कॉलेजची त्या शान आहेत.

डॉ. विनोद वेरेकर
माझ्या माहितीतले असे एक आमचे फॅमिली डॉक्टर म्हणजे डॉ. विनोद वेरेकर, करमळी-गोवा. एक सेवाभावी, मनमिळावू व्यक्तिमत्त्व. यांचा हातगुण असा आहे की रुग्णाला कितीही त्रास होत असला तरी यांच्या औषधाने हमखास गुण मिळतो.
काही वर्षांपूर्वी जेव्हा करमळी हे गाव खूप मागासलेलं होतं. गावात फारशा साधनसुविधा नव्हत्या. तसेच गोरगरीब लोकांना त्या भागामध्ये डॉक्टरही उपलब्ध नव्हते अशा वेळी डॉ. वेरेकरांसारख्या सेवाभावी डॉक्टरांनी गोरगरिबांसाठी आपल्या राहत्या घरीच छोटंसं क्लिनिक सुरू करून गोरगरिबांना आपली सेवा दिली. त्यांची फीसुद्धा गरिबाला परवडेल अशीच होती आणि अजूनही तेवढीच आहे. त्यांनी पैशासाठी कोणत्याही गरजवंताला कधी डावलले नाही. आपल्या सेवाभावी वृत्तीने नेहमीच लोकांची मनोभावे सेवा केलेली आहे आणि अजूनही ती अविरतपणे तशीच चालू आहे.
गेली तेहत्तीस वर्षे ही त्यांची सेवा अखंडपणे चालू आहे. आज करमळी गावातले लोक त्यांना देवदूतच मानतात.

डॉ. मनिषा गिरीश कामत
डॉ. मनिषा गिरीश कामत या पानवेल रायबंदर येथील रहिवासी आहेत. त्या पणजी अर्बन हेल्थ सेंटरमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे त्यांना नेहमीच सर्व स्तरावरचे रुग्ण तपासावे लागतात. पणजी अर्बन हेल्थ सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांची गर्दी असते. कामगार वर्गातल्या रुग्णांना, त्यांना समजेल अशा सोप्या शब्दात निदान सांगावं लागतं. पण त्याचा त्यांना त्रास वाटत नाही. काही रुग्ण एकदाच येतात पण काही बरे होईपर्यंत येतात.
ज्या रुग्णाला उच्चरक्तदाब, मधुमेह आहे त्यांची सेवा डॉक्टर करतात व त्यांच्यासाठी स्पेशली ‘हेल्थ डाएट’ व ‘हेल्थ टॉक’ देतात, जेणेकरून रुग्ण आपले आजार आटोक्यात आणू शकेल.

जेव्हा पणजीमध्ये लोकोत्सव, फिल्म फेस्टिव्हल असतो तेव्हा तर डॉक्टरांना अहोरात्र आपल्या टीमबरोबर कार्यरत रहावे लागते.
एक डॉक्टर म्हणून त्यांना आजुबाजूच्या परिसरामध्ये टीबी, मलेरीया फैलावणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. असा एखादा रुग्ण आढळला तर त्याच्या घरी जाऊन त्यांच्या सर्व आप्तेष्टांची तपासणी करावी लागते. उपाययोजना करावी लागते.
डॉ. मनिषा कामत या अत्यंत मनमिळावू व सेवाभावी डॉक्टर आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग पाच वर्षे कांदोळीला होती, त्यानंतर मडकईला त्यांनी दहा वर्षे काम पाहिले. मडकईच्या रुग्णालयात रुग्णाला भरती करण्याचीही व्यवस्था होती. तसेच प्रसुतीची सेवाही तेथे त्यांनी कर्तव्यनिष्ठेने सांभाळली.
सध्या त्या पणजी, अर्बन हेल्थ सेंटरमध्ये सेवारत आहेत.
तर… असे काही डॉक्टर्स ज्यांच्याशी माझा संबंध फार जवळून आला त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच!!

हे डॉक्टर्स रुग्णाप्रती आपली सेवा बजावत असतानाच, या समाजाप्रतीही आपण काही देणे लागतो अशा भावनेने निःस्वार्थी वृत्तीने व कळकळीने आपली सेवा बजावत आहेत. जो डॉक्टर रुग्णाशी आपुलकीने, मायेने वागतो त्यालाच रुग्ण अधिक मान देतात, त्याच्यावर विश्‍वास ठेवतात. त्यांना परमेश्‍वर मानतात. रुग्ण बरा होऊन जेव्हा घरी परततो व डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो त्या वेळेला डॉक्टरांना झालेला आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत असतो. तिथे शब्दांना स्थान नसतं. असते ती फक्त भावना. आपण आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावले याची व रुग्णाच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून स्वतःच्या मनाला झालेल्या अपार समाधानाची भावना!!