ब्रेकिंग न्यूज़

ट्रम्पकार्ड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका नुकतीच हैदराबाद येथे भारत – अमेरिकेने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या जागतिक उद्योजक परिषदेसाठी येऊन गेली. इव्हांकाचे अधिकृत पद अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची विशेष सल्लागार असे आहे. हे पद विनामानधन आहे. असे असूनही जगातील सर्वांत प्रबळ राष्ट्राच्या अध्यक्षांची लाडकी कन्या असल्याने भारताने तिच्यासाठी लाल पायघड्या घातल्या. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून निझामाच्या फलकनुमा राजवाड्यात जातीने तिचा पाहुणचार केला. परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री देखील तिची खातिरदारी करण्यासाठी हजर राहिल्या. एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या सल्लागाराची एखाद्या राष्ट्रप्रमुखासारखी अशी शाही बडदास्त ठेवली जाण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. इव्हांकाने आपल्या पित्याचे मन भारतासंबंधी अधिकाधिक अनुकूल करावे अशी आशा बाळगून ही सगळी खातिरदारी करण्यात आली हे तर स्पष्टच आहे. या परिषदेमध्ये इव्हांकाने आपल्या महिला सशक्तीकरणाच्या मुद्द्याला अधोरेखित केले. भारताने आपल्या अर्ध्या महिलावर्गाला जरी कामाला लावले तर येत्या तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दीडशे अब्जांनी प्रगती करील असे इव्हांकाने या परिषदेत सांगितले. इव्हांका यापूर्वी जेथे जेथे गेली, तिथे तिने महिला सशक्तीकरणाचा हा मुद्दा मांडला आहे. मात्र, स्वतः तिच्या मालकीच्या वस्त्रोद्योग आणि दागदागिन्याच्या कंपन्या भारत, बांगलादेश, इंडोनेशिया, चीन अशा देशांमध्ये स्त्रियांकडून माल बनवून घेतात, परंतु त्या महिलांना अल्प वेतनावर राबवून घेतले जाते अशी कठोर टीका यापूर्वी पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांनी त्यावर केली होती. परंतु इव्हांका स्वतःला महिलांची प्रतिनिधी म्हणून सतत प्रस्तुत करीत असते, त्याप्रमाणेच या जागतिक उद्योजक परिषदेची मध्यवर्ती संकल्पनादेखील ‘वूमन फर्स्ट, प्रॉस्पेरिटी फॉर ऑल’ अशी ठेवण्यात आली होती. या परिषदेत जवळजवळ दीड हजार उद्योजकांची उपस्थिती होती आणि त्यातील अर्ध्या या परिषदेच्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार महिला होत्या. खरे तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कल्पनेतून या जागतिक उद्योजक परिषदा भरवल्या जाऊ लागल्या. यापूर्वी काही इस्लामी देशांमध्ये अशा परिषदांचे आयोजन त्यांच्या काळात झाले होते. ट्रम्प यांनी सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी या परिषदेचे यजमानपद स्वीकारण्याचे निमंत्रण दिले होते, त्यानुसार हे आयोजन करण्यात आले. अर्थातच मोदी शैलीची चमकधमक त्यात राहिली. हैदराबाद हे आजवर आय. टी. चे म्हणजे ‘इन्फर्मेशन टेक्नोलॉजी’चे शहर असे आम्ही मानत होतो, पण आता ते आय. टी. म्हणजे ‘इव्हांका ट्रम्प’ चे शहर म्हणून ओळखले जाईल असे तेलंगणाचे एक मंत्रीमहोदय विनोदाने म्हणाले ते खरे आहे. भव्यदिव्यतेमुळे या परिषदेचे स्मरण हैदराबादला दीर्घकाळ होत राहील. आता प्रश्न येतो तो परिषदेच्या फलश्रृतीचा. अमेरिकेची सत्ता हाती आल्यापासून भारत आणि अमेरिका जवळ आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. मात्र, ‘अमेरिका फर्स्ट’ हे ट्रम्प यांचे प्राथमिक धोरण राहिले आहे. त्यामुळे या मैत्रीलाही मर्यादा आहेत. व्यापारउदिमाच्या संदर्भात भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करीत असतानाच अमेरिकेचे हित सर्वोच्च मानण्यालाच ट्रम्प यांचे प्राधान्य राहिले आहे. दुसर्‍या एका आघाडीवर अमेरिकेने भारताची बाजू उचलून धरलेली दिसते ती म्हणजे दहशतवादाची. पाकिस्तानला वेळोवेळी खडे बोल त्यांनी आणि त्यांच्या प्रशासनाने सुनावले. परंतु तेथेही आपल्या अफगाणिस्तान नीतीसंदर्भात पाकिस्तानची मदत घेणे त्यांनी थांबवलेले नाही. म्हणजेच अमेरिकेची भारत मैत्री ही अद्याप संशयाच्या घरातच राहिली आहे. तिची विश्वासार्हता अजून तरी सिद्ध झालेली नाही. त्यामुळे इव्हांका ट्रम्पच्या या भारतभेटीनंतर तरी या मैत्रीला नवे धुमारे फुटतील का हा खरा प्रश्न आहे. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ नीतीतून भारतीय कंपन्यांपुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या. एच१बी व्हिसापासून आउटसोर्सिंगपर्यंतचे निर्माण झालेले प्रश्न असोत किंवा अमेरिकेने केलेल्या कामगारविषयक सुधारणांचे तेथील भारतीय कंपन्यांच्या व्यवहारावर झालेले परिणाम असोत, भारत – अमेरिका मैत्रीच्या मर्यादाही त्यातून समोर आलेल्या आहेत. अमेरिकेचा भारताकडे वाढलेला ओढा हा चीनच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठीच आहे. म्हणजेच आजवर अमेरिकेने स्वहितालाच प्राधान्य दिलेले आहे. इव्हांकाच्या सल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताविषयीचे मत किती बदलले म्हणजेच इव्हांकाचे ‘ट्रम्पकार्ड’ वापरून भारत अमेरिकेची भारत – नीती किती बदलू शकला व त्याचे काय फायदे मिळाले हे पाहूनच या परिषदेच्या साफल्याचे मोजमाप भविष्यात करता येऊ शकेल.