ब्रेकिंग न्यूज़

टॅक्सी ऍप प्रश्‍नावर आज महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील टॅक्सी ऍपच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी १ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पर्वरी येथे मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला किनारी भागातील आमदार, टॅक्सी ऍपचा विषय मांडणारे मंत्री तसेच टूरिस्ट टॅक्सी मालक उपस्थित राहणार आहेत.

गोवा पर्यटन विकास महामंडळाने सुरू केलेल्या गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेला टूरिस्ट टॅक्सी आणि काळ्या पिवळ्या टॅक्सी मालकांकडून विरोध केला जात आहे. टूरिस्ट टॅक्सी चालकांना काही आमदारांचा पाठिंबा लाभलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी टूरिस्ट टॅक्सी चालकांना एक महिन्यासाठी गोवा माईल्सचा अनुभव घेण्याचे आवाहन केले होते. तथापि, टूरिस्ट टॅक्सी मालकांना गोवा माईल्स ही ऍप आधारित सेवा मान्य नाही. उत्तर व दक्षिण गोव्यातील टूरिस्ट टॅक्सी चालकांनी ऍप आधारित सेवेत सहभागी होण्यास शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट नकार दिला आहे.

दरम्यान, रविवारी कळंगुट येथे उत्तर गोवा टूरिस्ट टॅक्सी असोसिएशनच्या घेण्यात आलेल्या बैठकीत ऍप आधारित टॅक्सी सेवेला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.