टुरिस्ट टॅक्सीवाल्यांच्या प्रमुख मागण्यांवर लवकरच तोडगा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पर्वरी येथील मंत्रालयात सोमवारी आयोजित मंत्री, आमदार आणि टूरिस्ट टॅक्सी मालक यांच्या संयुक्त बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेचे समर्थन केले असून टुरिस्ट टॅक्सी मालकांच्या प्रमुख तीन समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन बैठकीत दिले. राज्यात बेकायदा पर्यटकांची वाहतूक करणार्‍या ५०० वाहनांच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, गोवा माईल्स ही सेवा रद्दबातल करण्याच्या मागणीवर ठाम आहोत. आम्ही गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेचे समर्थन केलेले नाही. किंवा त्यात सहभागी होण्याचे मान्य केलेले नाही, असे टूरिस्ट टॅक्सी मालकांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या बैठकीला उपसभापती मायकल लोबो, मंत्री माविन गुदिन्हो, विनोद पालयेकर, आमदार एलिना साल्ढाणा, आमदार कार्लुस आल्मेदा, आलेक्स रेजिनाल्ड, मंत्री नीलेश काब्राल, आमदार चर्चिल आलेमाव, आमदार दिगंबर कामत आणि टूरिस्ट टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी उपस्थिती होते.

गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेने विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि हॉटेलवरील ग्राहकांची हाताळणी करून नये, अशी सूचना केली जाणार आहे. टूरिस्ट टॅक्सी मालकांच्या तीन प्रमुख समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पंधरा ते वीस दिवसात आणखी एक बैठक घेतली जाणार आहे.

राज्यात पर्यटकांना योग्य दरात टॅक्सी सेवा उपलब्ध होत नसल्याने अनेक पर्यटक रेंट अ बाईकचा वापर करतात. पर्यटकांना रस्त्यांची योग्य माहिती नसल्याने अपघातात सापडतात. राज्यात अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यामध्ये ५० टक्के पर्यटकांचा समावेश आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला. राज्यात दोन टॅक्सी संघटनांच्या २५६० रेन्ट अ कॅब आणि ६ जणांच्या प्रत्येकी ५० रेन्ट अ कॅब कारगाड्या कार्यरत आहेत. तसेच १८ हजार रेन्ट अ बाईक दुचाक्या कार्यरत आहेत. त्याच बरोबर ५०० गाड्या बेकायदा वाहतूक करीत आहेत. बैठकीत मंत्री, आमदारांना गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच टूरिस्ट टॅक्सी मालकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. गोवा माईल्समध्ये सहभागी होण्यास राज्यातील एकही टूरिस्ट टॅक्सी मालक उत्सुक नाही. गोवा माईल्स ही ऍप आधारित टॅक्सी सेवा बेकायदा असल्याने बंद करावी. अशी मागणी टॅक्सी असोसिएशनचे पदाधिकारी सुनील नाईक यांनी केली.

गोवा माईल्सला मान्यतेनंतर गोंधळ : मायकल लोबो
गोवा माईल्सला हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, विमानतळावरील प्रवाशांची वाहतूक करण्यास मान्यता देऊ नये, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. स्थानिक टॅक्सी मालकांच्या हिताचे रक्षण होणे आवश्यक आहे. काही टॅक्सी चालकांकडून जादा दर आकारला जात असल्याची तक्रार आहे. तथापि, त्यामुळे सर्व टॅक्सी मालकांवर होता कामा नये. एकही टॅक्सी चालक या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक नाही. गोवा माईल्सने काही ठिकाणी दरपत्रक लावलेले आहे. गोवा माईल्स दरपत्रक लावू शकत नाही. गोवा माईल्सला मान्यता देण्यात आल्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यावर तोडग्याची गरज आहे, असे उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले.