टीम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवे मंत्रिमंडळ केंद्रात सत्तारूढ झाले आहे. काल त्यांचे खातेवाटपही जाहीर करण्यात आले. देशाच्या चार सर्वोच्च मंत्रिपदांमध्ये मोदींनी यावेळी बदल केल्याचे दिसते आहे. यावेळी प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेतलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मोदींनी गृह खाते सोपवले, मागच्या सरकारमधील गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण खाते दिले, तर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ खाते सोपवले. अर्थातच मोदींनी हा बदल केवळ बदलासाठी म्हणून केलेला नाही. अमित शहा यांच्याकडे गृह खाते दिले गेले आहे याचाच अर्थ देशातील क्रमांक दोनचे स्थान मोदींनी त्यांना बहाल केलेले आहे. पंतप्रधानांनंतर गृहमंत्री हा केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य असतो. त्यामुळे अडवाणींच्या काळातील राजनाथसिंहांऐवजी आपले अत्यंत विश्वासू असे अमित शहा या पदावर आणून मोदींनी त्यांना त्यांच्या पक्षासाठीच्या आजवरच्या शानदार कामगिरीची योग्य पोचपावती तर दिलेली आहेच, शिवाय सरकारवरील आपली मांड अधिक बळकटही केली आहे. मोदींच्या गेल्या कार्यकाळामध्ये गृह खात्याशी संबंधित अनेक वादविवाद देशामध्ये उद्भवले. अनेकदा मोदी सरकारसाठी ते अडचणीचेही ठरले. त्यामुळे अमित शहा अशा विषयांमध्ये अधिक तत्परतेने पावले उचलतील आणि परिस्थिती झट्‌कन नियंत्रणात आणतील या विश्वासाने मोदींनी त्यांच्याकडे गृह खाते सोपविलेले आहे. राजनाथ यांचे गृह खाते काढून घेताना त्यांचा अवमान होऊ न देणे हेही मोदींचे कर्तव्य होते. अर्थ हा काही राजनाथ यांचा विषय नाही, त्यामुळे त्यांच्याकडे संरक्षण खाते सोपवावे लागले आहे आणि कोणत्याही विषयामध्ये लक्ष घालून त्यावर आपली पकड जमविणार्‍या निर्मला सीतारमण यांच्याकडे अरुण जेटलींनी गेल्या वेळी सांभाळलेले अर्थ खाते देऊन मोदींनी त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला आहे. अरुण जेटली यांनी आपल्या आरोग्याच्या समस्येमुळे मंत्रिपद स्वीकारण्यास असमर्थता दर्शवल्याने या महत्त्वाच्या जागेवर मोदींना एका कार्यक्षम नेत्याची आवश्यकता होती. हंगामी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलेले पीयूष गोयल यांना बढती दिली जाईल असा अंदाज व्यक्त होत होता, परंतु ते घडलेले नाही. सध्या तरी निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ खाते दिले गेलेले आहे. या सरकारमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल झाला आहे तो परराष्ट्र व्यवहार खात्यासंदर्भात. सुषमा स्वराज यांनी आपल्या मागील कारकिर्दीमध्ये या खात्याचा पदभार सांभाळला होता, परंतु त्यांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्यानंतर त्या केवळ ट्वीटरवरून खात्याचा कारभार हाकण्यात अधिक सक्रिय दिसत होत्या. जगभरातील संकटग्रस्त भारतीयांच्या मदतीला तातडीने व तत्परतेने धावून जात त्यांनी आपल्या खात्याच्या कार्यक्षमतेचा आभास जरी निर्माण केला, तरी प्रत्यक्षामध्ये विदेश नीतीतील खाचाखोचा जाणणारा आणि त्यानुसार देशाची धोरणे ठरवणारा सक्षम नेता मोदींना यावेळी हवा होता. निर्वाचित सदस्यांमध्ये तसा कोणी न दिसल्याने अखेर सुब्रह्मण्यम जयशंकर या विदेश मंत्रालयामध्ये उच्च पदे भूषविलेल्या अनुभवी आणि कार्यक्षम अधिकार्‍याच्याच गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ घातली गेली आहे. ही निवड सर्वांना चकित करणारी ठरली असली, तरी देशाच्या विदेश नीतीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जे मोठे फेरबदल झाले, त्यांचा लाभ देशाला मिळवून देण्यात जयशंकर यांच्यासारखा अनुभवी मुरब्बी अधिकारीच लाभदायी ठरू शकतो. विदेश सचिव म्हणून व तत्पूर्वी अमेरिका, चीनसारख्या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव असलेले जयशंकर यांच्याकडून मोदींच्या नक्कीच अपेक्षा असतील. अरुण जेटली, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू यांची अनुपस्थिती यावेळी नक्कीच जाणवेल. नितीन गडकरी, रविशंकरप्रसाद, पीयूष गोयल वगैरे गेल्या वेळच्या काही कार्यक्षम मंत्र्यांना त्यांची पूर्वीचीच खाती दिली गेली, शेतकर्‍यांच्या समस्यांची पूर्ती करू न शकलेल्या कृषीमंत्री राधारमणसिंगांना यावेळी डच्चू मिळाला. त्यांच्याजागी नरेंद्रसिंग तोमर यांना कृषी खाते दिले गेले आहे, तर यावेळी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जलशक्ती खात्याचा कारभार गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. आपल्या गोव्याच्या श्रीपाद नाईकांना पुन्हा स्वतंत्र कार्यभारयुक्त राज्यमंत्रिपदावरच ठेवले गेले आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळू शकली नाही, परंतु संरक्षण खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त ताबा त्यांना ‘आयुष’ च्या जोडीने दिला गेला आहे. अनंतकुमार हेगडेंसारख्या वाचाळवीरांना यावेळी मोदींनी घरी बसवले आहे, मात्र गिरिराज सिंगांना अपरिहार्यपणे मंत्रिपद द्यावे लागले आहे. वेगवेगळ्या प्रदेशांना विचारपूर्वक प्रतिनिधित्व दिलेले आहे. कर्नाटक वगळता दक्षिण भारताने यावेळी भाजपाला साथ दिलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्या वाट्याला मंत्रिपदे येऊ शकलेली नाहीत, परंतु २९ पैकी २० राज्यांना मोदींनी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व आहे. आता प्रतीक्षा आहे ती या सार्‍या टीम मोदीच्या कार्यक्षम कारभाराची!