ब्रेकिंग न्यूज़

टीम इंडिया उपांत्य फेरीत

>> बांगलादेशचे विश्‍वचषकातील आव्हान आटोपले

भारताने बांगलादेशचा कडवा प्रतिकार मोडून काढत काल मंगळवारी २६ धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारताने क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पराभवामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान आटोपले. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३१५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ४८ षटकांत २८६ धावांत संपला.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची मदार शाकिब अल हसन (६६) याच्यावर होती. त्याने अपेक्षापूर्ती करत आपले ४६वे एकदिवसीय अर्धशतकदेखील ठोकले. परंतु, मधल्या फळीत रहीम व दास यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ उठवता आला नाही. शाकिब परतल्यानंतर बांगलादेशचा आशा मावळल्या होत्या. परंतु, सब्बीर (३६) व सैफुद्दिन (नाबाद ५१) यांनी सातव्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी करत भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. सब्बीरच्या पतनानंतरही सैफुद्दिनने फटकेबाजी सुरूच ठेवली होती. परंतु, दुसर्‍या टोकाने बुमराहने गडी बाद करत बांगलादेशचा डाव संपवला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने संघात दोन बदल करताना केदार जाधव व कुलदीप यादव यांना बाहेर बसवून दिनेश कार्तिक व भुवनेश्‍वर कुमारला खेळविले तर बांगलादेशने फिरकीपटू मेहदी हसनला वगळून जलदगती गोलंदाज रुबेल हुसेनला संधी दिली. भारतीय संघाची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि राहुल यांनी पहिल्या गड्यासाठी १८० धावांची भागीदारी रचली. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील आपले २६वे शतक ठोकले. शतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच रोहित परतला. त्याने ९२ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह १०४ धावा केल्या. सौम्य सरकारने त्याला तंबूची वाट दाखवली. रुबेलचा चेंडू कट् करण्याच्या नादात राहुल वैयक्तिक ७७ धावा करून बाद झाला. हे त्याचे चौथे एकदिवसीय अर्धशतक ठरले. त्यानंतर ठराविक अंतराने भारतीय संघाचे गडी बाद होत राहिले. बांगलादेश संघाकडून मुस्तफिझुर रहमान याने १० षटकांत ५९ धावा देत ५ गडी बाद केले. तर शाकिब अल हसन, रूबेल हुसेन आणि सौम्य सरकार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
पंड्याचे अर्धशतक
टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने काल आपले बळींचे अर्धशतक पूर्ण केले. सौम्य सरकार हा पंड्याचा पन्नासावा बळी ठरला. पंड्याच्या नावावर ५२ सामन्यांतील ५१ डावांत ५२ बळींची नोंद झाली आहे. ४०.१९च्या सरासरीने त्याने हे बळी घेतले आहेत. पंड्याच्या नावावर ९१८ धावांची नोंद देखील आहे. २९.६१च्या सरासरीने त्याने या धावा केल्या आहेत.

धावफलक
भारत ः लोकेश राहुल झे. रहीम गो. रुबेल ७७, रोहित शर्मा झे. दास गो. सरकार १०४, विराट कोहली झे. रुबेल गो. मुस्तफिझुर २६, ऋषभ पंत झे. मोसद्देक गो. शाकिब ४८, हार्दिक पंड्या झे. सरकार गो. मुस्तफिझुर ०, महेंद्रसिंग धोनी झे. शाकिब गो. मुस्तफिझुर ३५, दिनेश कार्तिक झे. मोसद्देक गो. मुस्तफिझुर ८, भुवनेश्‍वर कुमार धावबाद २, मोहम्मद शमी त्रि. गो. मुस्तफिझुर १, जसप्रीत बुमराह नाबाद ०, अवांतर १३, एकूण ५० षटकांत ९ बाद ३१४
गोलंदाजी ः मश्रफी मोर्तझा ५-०-३६-०, मोहम्मद सैफुद्दिन ७-०-५९-०, मुस्तफिझुर रहमान १०-१-५९-५, शाकिब अल हसन १०-०-४१-१, मोसद्देक हुसेन ४-०-३२-०, रुबेल हुसेन ८-०-४८-१, सौम्य सरकार ६-०-३३-१

बांगलादेश ः तमिम इक्बाल त्रि. गो. शमी २२, सौम्य सरकार झे. कोहली गो. पंड्या ३३, शाकिब अल हसन झे. कार्तिक गो. पंड्या ६६, मुश्फिकुर रहीम झे. शमी गो. चहल २४, लिटन दास झे. कार्तिक गो. पंड्या २२, मोसद्देक हुसेन त्रि. गो. बुमराह ३, सब्बीर रहमान त्रि. गो. बुमराह ३६, मोहम्मद सैफुद्दिन नाबाद ५१, मश्रफी मोर्तझा झे. धोनी गो. भुवनेश्‍वर ८, रुबेल हुसेन त्रि. गो. बुमराह ९, मुस्तफिझुर रहमान त्रि. गो. बुमराह ०, अवांतर १२, एकूण ४८ षटकांत सर्वबाद २८६
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ९-०-५१-१, जसप्रीत बुमराह १०-१-५५-४, मोहम्मद शमी ९-०-६८-१, युजवेंद्र चहल १०-०-५०-१, हार्दिक पंड्या १०-०-६०-३

रोहितने पाडला विक्रमांचा पाऊस

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या एका आवृत्ती चार शतके झळकावणारा केवळ दुसरा खेळाडू होण्याचा मान काल मिळविला. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १२२, पाकिस्तानविरुद्ध १४०, इंग्लंडविरुद्ध १०२ आणि बांगलादेशविरुद्ध १०४ धावांची खेळी केली. एकाच विश्‍वचषक स्पर्धेत सर्वप्रथम चार शतके करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावे आहे. आपल्या या शतकी खेळी दरम्यान रोहितने भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडू म्हणून नवीन विक्रम केला. त्याने महेंद्रसिंग धोनी (२२८) याला मागे टाकले. जागतिक स्तरावर वनडेत सर्वाधिक षटकार लगावणार्‍यांमध्ये पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ३५१ षटकारांसह प्रथम क्रमांकावर आहे.