टीम इंडियाने उभारला ६०० धावांचा पर्वत

>> विराट कोहलीचे नाबाद द्विशतक

>> दक्षिण आफ्रिका ३ बाद ३६

कर्णधार विराट कोहली याने ठोकलेले नाबाद द्विशतकाच्या बळावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी आपला पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला.

दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेचा संघ ३ बाद ३६ असा चाचपडत होता. ऐडन मार्क्रम, डीन एल्गार आणि तेंबा बवुमा या आघाडी फळीतील खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. भारताकडून उमेश यादवने २ तर शमीने १ बळी टिपला. तत्पूर्वी, पहिल्या दिवसाच्या ३ बाद २७३ धावांवरून काल पुढे खेळताना चौथ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेसोबत कोहलीने १७८ धावांची दमदार भागीदारी रचली. आपले विसावे कसोटी अर्धशतक केल्यानंतर अजिंक्य रहाणे महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर विराटने रवींद्र जडेजाच्या सोबतीने मुक्तपणे फटकेबाजी करत वेगाने धावा जमवल्या. चहापानापर्यंत भारतीय संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात ४७३ धावांपर्यंत मजल मारली होती. जडेजाने १०४ चेंडूत ९१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. आपल्या दुसर्‍या कसोटी शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना तो बाद झाला. जडेजा परतताच कोहलीने डाव घोषित केला.

धावफलक
भारत पहिला डाव ः (३ बाद २७३ वरून) ः विराट कोहली नाबाद २५४ (३३६ चेंडू, ३३ चौकार, २ षटकार), अजिंक्य रहाणे झे. डी कॉक गो. महाराज ५९, रवींद्र जडेजा झे. डी ब्रुईन गो. मुथूसामी ९१, अवांतर १७, एकूण १५६.३ षटकांत ५ बाद ६०१ घोषित
गोलंदाजी ः व्हर्नोन फिलेंडर २६-६-६६-०, कगिसो रबाडा ३०-३-९३-३, ऍन्रिक नॉर्के २५-५-१००-०, केशव महाराज ५०-१०-१९६-१, सेनुरन मुथूसामी १९.३-१-९७-१, डीन एल्गार ४-०-२६-०, ऐडन मार्करम २-०-१७-०
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार त्रि. गो. यादव ६, ऐडन मार्करम पायचीत गो. यादव ०, थ्युनिस डी ब्रुईन नाबाद २०, तेंबा बवुमा झे. साहा गो. शमी ८, ऍन्रिक नॉर्के नाबाद २, अवांतर ०, एकूण १५ षटकांत ३ बाद ३६
गोलंदाजी ः इशांत शर्मा ४-०-१७-०, उमेश यादव ४-१-१६-२, रवींद्र जडेजा ४-४-०-०, मोहम्मद शमी ३-१-३-१

‘किंग कोहली’ची कमाल
कसोटी क्रिकेटच्या एका डावात २५० किंवा जास्त धावा करणारा विराट कोहली हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला. वीरेंद्र सेहवाग, करुण नायर, व्हीव्हीएस लक्ष्मण व राहुल द्रविड यांनी अशी कामगिरी केली आहे. विराट कोहलीचे हे विक्रमी सातवे कसोटी द्विशतक ठरले. कर्णधार या नात्याने २५० धावा करणारा कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर प्रत्येकी सहा कसोटी द्विशतके आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज डॉन ब्रॅडमन (१२) पहिल्या स्थानी आहेत. यानंतर कुमार संगकारा (११), ब्रायन लारा (९), वॉली हॅमंड व माहेला जयवर्धने (७) यांचा क्रमांक लागतो. कसोटी कर्णधार या नात्याने सर्वाधिक १५०+ धावा करण्याचा ब्रॅडमन यांचा विक्रम विराटने मोडला. ब्रॅडमन यांनी आठवेळा तर कोहलीने आता नऊ वेळी अशी कामगिरी केली आहे. कसोटी कर्णधार या नात्याने १९ शतके लगावणार्‍या रिकी पॉंटिंगच्या विक्रमाचीदेखील कोहलीने बरोबरी केली.