टीकेआरकडून खेळू शकतो तांबे

>> बीसीसीआयच्या ‘ना हरकत’ दाखल्याची आवश्यकता

मुंबईचा ४८ वर्षीय लेगस्पिन गोलंदाज प्रवीण तांबे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. तांबे राजस्थान रॉयल्स या आयपीएलमधील फ्रेंचायझीकडून २०१३ ते २०१५ या कालावधीत खेळला होता.

‘टीकेआर’ने मला स्पर्धेत खेळण्याविषयी विचारले असून अधिकृत त्यांच्याशी अजून करार झालेला नसल्याचे तांबे याने सांगितले. टीकेआरकडून खेळण्यासाठी तांबे याला सर्वप्रथम निवृत्ती जाहीर करावी लागणार आहे. यानंतरच त्याला बीसीसीआयकडून स्पर्धेत खेळण्यासाठी ‘ना हरकत’ दाखला मिळू शकतो.

मागील वर्षी कोलकाता नाइट रायडर्सने त्याला आपल्या संघात घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता. २०१८ साली तांबे याने निवृत्ती जाहीर करत संयुक्त अरब अमिरातीमधील टी-टेन लीग खेळली होती. बीसीसीआयच्या नियमानुसार केवळ निवृत्त खेळाडूच विदेशी लीगमध्ये खेळू शकतात. तांबे याने यानंतर आपली निवृत्ती मागे घेत मुंबईतील टी-ट्वेंटी लीग स्पर्धा खेळली होती. तांबेने यानंतर आयपीएलसाठी स्वतःची नोंदणीदेखील केली होती. लिलावात केकेआरने त्याला २० लाख रुपयांना खरेदीदेखील केले होते.
तांबेचे विदेशी लीगमधील खेळणे बीसीसीआयला समजल्यानंतर त्यांनी तांबेला तातडीने निलंबित केले होते व केकेआरला बदली खेळाडू निवडण्याची मुभा दिली होती. यंदाची सीपीएल १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत त्रिनिदाद अँड टोबेगो बेटांवर प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे.
टीकेआरने तांबेला करारबद्ध केल्यास तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत वयस्क खेळाडू ठरणार आहे.