झेडपी निवडणुका २० एप्रिलनंतर घ्याव्यात

>> मार्चमधील परीक्षांकडे ढवळीकरांनी वेधले लक्ष

गोवा सरकारने जिल्हा पंचायत निवडणुकांचा सगळा घोळच केलेला असून या निवडणुका २२ फेब्रुवारी रोजी घेण्याऐवजी आता सरकारने २० एप्रिलनंतरच घ्याव्यात अशी मागणी काल मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी परिषदेत केली.

सरकारने प्रथम या निवडणुका १५ मार्च रोजी घेण्याचे ठरवले होते. नंतर कार्निव्हल व शिगम्यामुळे सरकारने या निवडणुका २२ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेतला. पण तारखेतील हा बदल घडवून आणताना सरकार विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत हे विसरल्याचे ढवळीकर म्हणाले. मुलांच्या परीक्षेपेक्षा कार्निव्हल व शिगमा जास्त महत्त्वाचा आहे काय, असा प्रश्‍न ढवळीकर यांनी यावेळी केला. दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर २० एप्रिलनंतर कधीही सरकारने या निवडणुका घ्याव्यात अशी सूचना ढवळीकर यांनी केली.

आरक्षणाच्याबाबतीत मोठा घोळ
गोवा सरकारने जिल्हा निवडणूक पंचायतीच्या आरक्षणाबाबत मोठा घोळ केल्याचा आरोप करताना आतापर्यंत अनुसूचित जाती, जमाती व ओबीसीसाठीच्या आरक्षणासाठीचे तपशील सरकारने जाहीर करायला हवे होते. आम्ही त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे चौकशी केली असता आरक्षणासाठीची फाईल सरकारकडे असल्याचे आयोगाने सांगितल्याचे ढवळीकर म्हणाले. सरकारने विनाविलंब येत्या चार दिवसांत मतदारसंघाचे आरक्षण जाहीर करावे, अशी मागणीही ढवळीकर यांनी यावेळी केली.