झिंबाब्वेचा ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर

ऑस्ट्रेलिया व झिंबाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिका दोन्ही मंडळांनी सहमतीने पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला. तीन सामन्यांच्या मालिका ऑगस्ट महिन्यात होणार होती. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात एकूण कोरोनाची ७५०० प्रकरणे झाली असून ७ हजारांहून जास्त लोकांनी यावर मात केली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १०४ झाली आहे.

मालिकेचे अल्प स्वरूप, ऑगस्ट महिन्यापूर्वी जैव सुरक्षिततेसाठी उचलावी लागणारी पावले, खेळाडू, अधिकारी, सपोर्ट स्टाफ तसेच स्वयंसेवकाच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन मालिका पुढे ढकलण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी प्रमुख निक हॉकले यांनी स्पष्ट केले आहे. हॉकले पुढे बोलताना म्हणाले की, मालिका लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगताना आम्हाला दुःख होत असून नवीन तारखांबाबत झिंबाब्वे क्रिकेट मंडळाशी लवकरच बोलणी करण्यात येणार आहे.

सध्या ऑस्ट्रेलियात येणार्‍या आंतरराष्ट्रीय नागरिकांना १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे सक्तीचे आहे. २००३-०४ पासून झिंबाब्वेचा संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेला नाही. २०१४ साली हरारेत झालेल्या तिरंगी मालिकेत मात्र मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या कांगारूंना झिंबाब्वेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळण्यासाठी झिंबाब्वेचा संघ आतुर झाला होती. परंतु, वर्तमान परिस्थिती पाहता दौरा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता, असे झिंबाब्वे क्रिकेट मंडळाचे कार्यवाहू व्यवस्थापकीय संचालक गिव्हमोर माकोनी यांनी सांगितले.