ब्रेकिंग न्यूज़
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पद्मश्री मोहन रानडेंचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पद्मश्री मोहन रानडेंचे निधन

>> पुण्यात घेतला अखेरचा श्‍वास
>> शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गोवा मुक्ती लढ्याचे सेनानी पद्मश्री मोहन रानडे (९० वर्षे) यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी पहाटे निधन झाले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गोव्याचे नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी गोवा सरकारच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.
रानडे यांचा जन्म १९२९ साली सांगली, महाराष्ट्र येथे झाला. रानडे गेल्या काही महिन्यांपासून अन्ननलिकेच्या विकाराने त्रस्त होते. दरम्यान, त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारांदरम्यान ते अत्यवस्थ होते, दरम्यान काल मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
मोहन रानडे यांनी गोवा मुक्तीलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांची गोवा मुक्ती लढ्यामध्ये आझाद गोमंतक दलाचे नेते अशी ओळख होती. पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याला मुक्त करण्यासाठी लढणार्‍या रानडे यांना पोर्तुगाल सरकारने २६ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच गोवा मुक्त झाल्यानंतरही १४ वर्षे तुरुंगात राहावे लागले होते.
गोवा मुक्ती संग्रामातील रानडे यांनी धाडसी कामगिरी बजावली. त्यांनी पोर्तुगिजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. या कारवायांमध्ये बेती येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर या हल्ल्याच्या कारवाईविरोधात १९५५ मध्ये अटक करण्यात आली. पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना पोर्तुगालमधील लिस्बन येथे तुरुंगात ठेवले होते.
रानडे यांची पोर्तुगाल सरकारच्या तावडीतून सुटकेसाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आवाज उठवला होता. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांनी व्हॅटिकन सिटी येथे पोपची भेट घेऊन रानडे यांच्या सुटकेची मागणी केली होती. त्यानंतर १९६९ मध्ये रानडे यांची सुटका करण्यात आली होती.
मोहन रानडे यांच्या गोवा मुक्ती लढ्यातील योगदानाबद्दल गोवा सरकारने त्यांना गोवा पुरस्काराने गौरविले आहे. तसेच केंद्र सरकारनेही त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव केला. रानडे यांना सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रानडे यांनी गोवा मुक्तिसंग्रामावर ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र तर ‘स्ट्रगल अनङ्गिनिश्ड’ हे पुस्तकही लिहिले आहे.
रानडे यांचे जीवन प्रेरणादायी : मुख्यमंत्री 
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे जीवन  प्रेरणादायी असून गोवा मुक्ती लढ्यात त्यांनी खूपच मोठे योगदान दिले. गोव्याला पोर्तुगिजांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी खूप त्रास सहन केले. हालअपेष्टा भोगल्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रानडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. गोवा व पोर्तुगालच्या तुरुंगात रानडे यांनी चौदा वर्षे घालवली. रानडे यांचा त्याग आणि संघर्ष गोवा राज्य कधीच विसरणार नाही. रानडे यांनी आपले पूर्ण जीवन समाजाच्या सेवेसाठी दिले, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
नेहमीच आठवणीत राहतील : श्रीपाद
मोहन रानडे यांचे महान कार्य नेहमीच गोमंतकीयांच्या आठवणीत राहील. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य युवकांना स्फूर्तिदायक ठरेल, अशा शब्दांत केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली. गोवा स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम घेणारे, पोर्तुगिजांच्या अमानुष मारहाण, हाल-अपेष्टा सहन करणार्‍या रानडे यांना कित्येक वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. त्यांनी तुरुंगातील छळही हसत मुखाने सहन केला, असेही नाईक यांनी सांगितले.
कार्य नव्या पिढीसमोर नेणार : कला-संस्कृतीमंत्री
गोवा मुक्ती लढ्यातील अग्रणी स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांच्या निधनाने झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे. रानडे यांच्यावर कला व संस्कृती खात्याच्या सहकार्याने तयार केलेला माहितीपट लवकरच सर्व शाळांमध्ये दाखवून रानडे यांचे कार्य नव्या पिढी समोर नेले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केली.
धगधगता तारा अस्तंगत : गिरीश
गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता तारा अस्तंगत झाला आहे. पोर्तुगीज सत्तेचे गोव्यातून उच्चाटन करण्यासाठी सशस्त्र लढा उभारून ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली, त्या वीराग्रणींचे मोहन रानडे हे एक प्रमुख नेते होते. रानडे यांच्या त्यागी जीवनाच्या स्मृती प्रत्येक  गोमंतकीयांना सदैव देशभक्तीची प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात गिरीश चोडणकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
योगदान प्रेरणादायी : दिगंबर
समाजकारण, राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी प्रेरक शक्ती देणार्‍यांमध्ये स्वातंत्र्यसैनिक रानडे यांचा सहभाग होता. त्यांचे गोवा मुक्ती लढ्यातील योगदान अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनीही रानडे यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले.
रानडे प्रेरक शक्ती : बांदेकर
स्वातंत्र्यसैनिक रानडे प्रेरक शक्ती होते, अशा शब्दात माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर यांनी स्वातंत्र्यसैनिक रानडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. रानडे यांच्याशी ३५ वर्षांचा संबंध होता. समाजकारण, राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी प्रेरक शक्ती देणार्‍यामध्ये स्वातंत्र्यसैनिक रानडे यांचा सहभाग होता.
श्री. मोहन रानडे यांचा जीवनपट
र्े जन्मदिनांक – २५/१२/१९३०
र्े जन्मस्थान – सांगली
र्े शिक्षण – बी.कॉम.एल.एल.बी.
र्े व्यवसाय – वकिली
र्े गोवा स्वातंत्र्यलढ्यातील कार्य :
– १९४९ ते १९५४ संघटनात्मक कार्य
– १९५४ नगर हवेली मुक्तिलढ्यात सहभागी
– १/१/१९५५ सशस्त्र आंदोलनास गोव्यात सुरुवात
– २६/१०/१९५५ बेती चौकीवरील हल्ल्यात गंभीर जखमी व अटक
– २९/१२/१९५६ पोर्तुगीज लष्करी न्यायालयाकडून २६ वर्षे कारावासाची शिक्षा
– २३/८/१९६० पोर्तुगालला पुढील शिक्षा भोगण्यासाठी रवानगी
– १९६० ते १९६९ पोर्तुगालमध्ये कारावास
– त्यापैकी ६ वर्षे एकांतवास
– २५ जानेवारी १९६९ रोजी सुटका
– १ फेब्रुवारी १९६९ मायदेशी आगमन
र्े स्वातंत्र्योत्तर काळातील कार्य ः
– सुटका होऊन मायदेशी आल्यावर गोव्यात स्थायिक.
– गोमंतक मराठी शिक्षण परिषद या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक व कार्यवाह.
– १९८६ मध्ये महिला व बालक कल्याणगृह या संस्थेची स्थापना. त्या संस्थेतर्फे चिंबल येथील झोपडपट्टीत गरीब व गरजू व उपेक्षित महिला व बालकांसाठी कार्य. याच कामाबद्दल १९८७ साली गोवा शासनाकडून पुरस्कार.
– जानेवारी १९८८ ते डिसेंबर १९९२ अखिल भारतीय रेडक्रॉस गोवा शाखेचे चेअरमन.
– पुणे येथे वास्तव्य व जीवनज्योत संस्थेमार्फत सामाजिक कार्य.