ब्रेकिंग न्यूज़
ज्येष्ठ कॉंग्रेस नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

>> शासकीय इतमामात आज होणार अंत्यसंस्कार; पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून दु:ख व्यक्त

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी येथील एका इस्पितळात उपचारांदरम्यान निधन झाले. उत्कृष्ट वक्ते म्हणून नावाजलेले रेड्डी पाच वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. तसेच राज्यसभेचे दोन वेळा खासदार होण्यासह आंध्रप्रदेशचे चार वेळा ते आमदारही बनले. आणिबाणी लागू करण्यास विरोध करून ते पक्षाबाहेरही पडले होते. व जनता पार्टीत दाखल झाले होते. जनता पार्टीच्या उमेदवारीवरून १९८० साली ते इंदिरा गांधी विरोधात मेडक लोकसभा मतदारसंघातून लढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद व उपराष्ट्रपती व्यंकय्या नाडयू यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
रेड्डी यांनी तेलंगण राज्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. १९९८ साली उत्कृष्ट संसदपटूचा सन्मान त्यांना प्राप्त झाला होता.

राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की जयपाल रेड्डी यांच्या निधनामुळे आपल्याला तीव्र दु:ख झाले. ते एक विचारवंत राजकारणी होते, असे कोविंद यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की जयपाल रेड्डी यांचा सार्वजनिक जीवनातील अनुभव समृद्ध होता. ते एक आदरणीय असे फर्डे वक्ते व प्रभावी प्रशासक होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहूल गांधी, पी. चिंदबरम आदींनी रेड्डी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल सरकारात माहिती व प्रसारण मंत्री तसेच युपीए-२ सरकारात त्यांनी शहर विकासमंत्री म्हणून काम केले होते. पेट्रोलियम, विज्ञान, तंत्रज्ञान अशा खात्यांचे मंत्री म्हणून रेड्डी यांनी काम केले होते.