ब्रेकिंग न्यूज़

‘ज्ञानदीप प्रतिष्ठान’ ः एक सेवाभावी संस्था

  • अनुराधा गानू (आल्त सांताक्रूझ)

प्रतिष्ठानतर्फे योगासनाचे वर्ग चालतात. निसर्गोपचार पद्धतीच्या माहितीसाठी शिबिरं भरवली जातात. लोकांना निसर्गाबद्दल ओढ निर्माण व्हावी, पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी यासाठी दूधसागर आणि वाळपईच्या जंगलात तीन ते चार वेळा पदभ्रमणाच्या मोहिमासुद्धा काढल्या. प्लॅस्टिकमुक्त देश ही चळवळ त्यांनी सुरू केली.

‘अहो, आई-बाबांना नको हं बरोबर, चालवणारेय का त्यांना? हळुहळू चालणार. किती वेळ लागेल आणि परत प्रवासात त्यांना काही व्हायला लागलं तर काय करणार?’ ….अशी वाक्यं हल्ली कुठेही लांब फिरायला म्हणजे टूरवर जाताना बहुतांशी घरातून ऐकायला मिळतात. थोड्याफार प्रमाणात ते खरंही आहे. पण म्हणून आई-बाबांनी कुठे फिरायला जायचंच नाही का? संसाराच्या सुरुवातीच्या काळात जम बसलेला नसतो, पैशांची अडचण असू शकते. त्याशिवाय मुलांची शिक्षणं, त्यांच्या सुट्‌ट्या, त्यांच्या शिक्षणाचा वाढता खर्च म्हणून त्यांना कुठे फिरता येत नाही. आता वय झालं असलं तरी वेळ आहे, थोडाफार पैसा आहे, पण सोबतीला कुणी बरोबर यावं असं वाटतं तर बरोबर यायला कुणी नाही… असा प्रश्‍न पुष्कळदा ज्येष्ठ नागरिकांना पडतो.

पण काळजी करू नका. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्ञानदीप प्रतिष्ठान’ ही सेवाभावी संस्था कार्यरत आहे. तीर्थाटन या त्यांच्या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी टूर(सहल)चे आयोजन केले जाते. अगदी भारतातल्या स्थळांपासून ते दुबई, नेपाळ, श्रीलंका इ. भारताबाहेरच्या ठिकाणीही ज्ञानदीप प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहलीचे आयोजन करतात. एकदा मुद्दाम त्यांच्याबरोबर जाऊन बघा. तुमची इतकी उत्तम काळजी घेतली जाईल की तुमच्याबरोबर घरचे कुणी नाहीयेत याची जाणीवही तुम्हाला होणार नाही. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तुमच्या घरचेच आहेत असं तुम्हाला वाटेल, यात शंकाच नाही. तुमचं राहणं, वेळेवर खाण-पिणं, तुमच्या औषधांची आठवण, तुमच्याबरोबर फिरणं या सगळ्याची उत्तम काळजी घेतली जाते. इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल त्या ठिकाणी कोणी विमानाने जाऊ इच्छितात तर कुणी रेल्वेने. त्याही लोकांची तिकिटे काढण्यापासून ते त्यांना एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशनवर उतरवून घेण्याची व्यवस्थाही केली जाते.

प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि सफर करणारे तुम्ही यांच्यात एक अतूट नाते निर्माण होऊन जाते. हे सगळं मी ऐकीव माहितीवरून सांगत नाहीये. तर मी स्वतः अनुभव घेतलाय म्हणूनच खात्रीने सांगतेय. मी आणि माझ्या सहकारी आम्ही ओरीसाला त्यांच्याबरोबर गेलो होतो. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राखी पालेकर व त्यांची मुलगी तन्वी आमच्याबरोबर होत्या. आम्ही १५-१६ महिला होतो आणि आमच्यांत सगळ्यांत लहान कोण तर राखी आणि तन्वी. इतक्या लहान वयात त्या आम्हा ज्येष्ठ महिलांची काळजी घेत होत्या. खरंच खूप कौतुक वाटलं. त्यांच्यात आणि आमच्यात एक हक्काचे बंध निर्माण झालेतच. शिवाय आम्ही सगळ्याजणी एकमेकींच्या ताई-माईही झालो आणि शिवाय एकमेकींच्या छान मैत्रिणीही झालोय.

‘तीर्थाटन’ एवढाच विषय घेऊन ही संस्था थांबलेली नाही. प्रतिष्ठानतर्फे योगासनाचे वर्ग चालतात. निसर्गोपचार पद्धतीच्या माहितीसाठी शिबिरं भरवली जातात. लोकांना निसर्गाबद्दल ओढ निर्माण व्हावी, पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी यासाठी दूधसागर आणि वाळपईच्या जंगलात तीन ते चार वेळा पदभ्रमणाच्या मोहिमासुद्धा काढल्या. प्लॅस्टिकमुक्त देश ही चळवळ त्यांनी सुरू केली. ही चळवळ असल्यामुळे ती अजूनही चालूच आहे. तिला शेवट नाही. त्यासाठी कारवार ते सावंतवाडीपर्यंत घराघरांतून पाच लाखांच्या वर पिशव्यांचे वाटपही केले गेले.
आज सगळं जग असुरक्षित आहे. बुद्ध्यांक वाढलाय पण भावनांक कमी होतोय. माणसं कोणत्यातरी अनामिक भीतिखाली, दडपणाखाली वावरत आहेत. त्यासाठी मुकुंदमहाराज मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधून मधून ज्ञानसाधनेचे वर्ग घेतले जातात.

अशा या लोकांसाठी तळमळीने काम करणार्‍या ‘ज्ञानदीप प्रतिष्ठान’चा ४ था वर्धापनदिन नुकताच म्हापसा येथे संपन्न झाला. ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन’ या विषयावर प्रतिष्ठानने निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांना त्या दिवशी बक्षिसे वितरित केली गेलीत. यांच्यातर्फे सतत सहलीला जाणार्‍या काही दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. मातृछाया-रुग्णाश्रयाच्या प्रमुख अनुराधा गानू यांनी मातृछाया व रुग्णाश्रयाच्या कार्याचा परिचय करून दिला. त्यांचा व त्यांच्या बरोबरीने मातृछाया रुग्णसेवा केंद्र, गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये तळमळीने काम करणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरीता नाईक यांचाही सत्कार करण्यात आला.
ज्ञानप्रतिष्ठानच्या अध्यक्ष राखी पालेकर, त्यांचे सहकारी विनय चोपडेकर, सुशांत तांडेल, माया भाटकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा उद्देश व माहिती सांगितली. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आणखीही उपक्रम राबवता येणे प्रतिष्ठानला शक्य होईल असा मानस या पदाधिकार्‍यांनी बोलून दाखवला. शुभांगी शिरोडकर यांचे सूत्रसंचालन उत्तम होते.

प्रतिष्ठानच्या ४ थ्या वर्धापनदिनी त्यांच्या सदस्यांची संख्या ४ वरून १४ वर पोहचली आहे. हे यशही थोडे-थोडके नाही. त्यांच्या कार्यासाठी व त्यांच्या सामाजिक चळवळीसाठी व्यक्तिशः माझ्यातर्फे आणि आपली परवानगी न घेता (क्षमस्व) समाजातील आपल्या सर्वांतर्फे अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!